कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग होणारच अशी घोषणा केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील १२ जिल्ह्यातील संतप्त शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर उतरले . शक्तीपीठ जाणाऱ्या मार्गावरील बारा जिल्हायातील शेतकऱ्यांनी उत्फुर्तपणे चक्काजाम आंदोलन करुन सरकारला इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या आंदोलनाची धग वाढली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Protests in 12 districts)
शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यातील नऊ हजार हेक्टर सुपिक जमिनीचे भूसंपादन होणार आहे. तसेच महामार्गामुळे दोन्ही बाजूच्या शेतीला फटका बसणार आहे. त्यामुळे १२ जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे. पण राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग होणारच असा निर्धार केला असल्याने त्या विरोधात आज शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले. कोल्हापूर, सांगली, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील चक्काजाम आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकीची कोंडी झाली होती. (Protests in 12 districts)
कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी झुगारुन चक्काजाम आंदोलनात शेतकरी रस्त्यांवर उतरले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. पोलिस प्रशासनाने आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता स्वत: महामार्गावर बंदोबस्तास उतरले आहेत. तावडे हॉटेल, शिरोली पुलावरील राष्ट्रीय महामार्गावर खासदार राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रवीकिरण इंगवले, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राहूल देसाई, शशांक बावचकर, राजू लाटकर, आर के पोवार, सचिन चव्हाण, राहूल देसाई, प्रकाश पाटील, शिवाजी मगदूम, बाबासो देवकर, अतुल दिघे, अजित पोवार सागर कोंडेकर, रघुनाथ कांबळे, सुयोग वाडकर, सुभाष देसाई यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते. (Protests in 12 districts)
पोलिसांकडून शेतकऱ्यांची अडवणूक .शेट्टीचा आरोप
आमचे आंदोलन संविधानाला धरुन आहे. सध्या पोलिस आषाढी वारीच्या बंदोबस्तात गुंतले आहे. त्यांची अडचण आम्हाला माहिती आहे. तरीही महामार्ग रोखण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिस अडवणूक करत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला. आम्ही आंदोलनासाठी एकच ठिकाण निश्चित केले आहे. जर पोलिस शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील तर आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर आंदोलन केले तर पोलिस प्रशासनाला जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तुम्ही आमच्या जमिनीवर पाय ठेवला तर आमचे शेतकरी फणा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असेही शेट्टी म्हणाले.
मोजक्याच शेतकऱ्यांचा नव्हे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध : राजू शेट्टी
शक्तीपीठ महामार्गाला मोजक्याच शेतकऱ्यांचा विरोध आहे असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारा जिल्ह्यातील शेतकरी महामार्गाला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर उतरले आहेत हे पहावे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. ज्या शेतकऱ्यांचा महामार्गाला पाठिंबा आहे असे सरकार म्हणते त्या शेतकऱ्यांनी पावसात उतरुन आंदोलन करावा, असा सल्लाही दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “मुख्यमंत्री हे आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी पूजेसाठी येणार आहेत. मात्र आम्ही देखील पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी जाणार अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे … शक्ती पीठ महामार्ग रद्द होऊ दे…असं साकडं घालणार आहे”. बारा जिल्ह्यातील शक्तिपीठ विरोधातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा शेट्टी यांनी केला.
शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यांवर यावे लागते हे दुर्दव्य : सतेज पाटील
आमदार सतेज पाटील मुंबईत पावसाळी अधिवेशनाला उपस्थित आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आज कृषीदिनानिमित्त शेतकऱ्यांना स्वत:ची शेती वाचवण्यासाठी रस्त्यांवर यावे लागते हे दुर्दव्य आहे. या रस्त्यांची गरज नाही. शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी सरकारला निवेदन देऊनही सरकार महामार्ग बांधणारच असे म्हणत आहे. त्यामुळे बारा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यांवर उतरला असून त्याच् दखल सरकारला घ्यावी लागेलच.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच महामार्ग होणार : हसन मुश्रीफ
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने तीन ते चार मार्ग सुचवले आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग होईल.