आयपीएल खेळण्याची जेम्स अँडरसनची इच्छा

वृत्तसंस्था : इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या चर्चेत आहे. त्याने सांगितले होते की, त्याला २०२५ मध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामात खेळायचे आहे. यासाठी अँडरसनने यंदाच्या आयपीएलसाठी होणाऱ्या मेगा लिलावात आपल्या नावाची नोंदणीही केली आहे. दरम्यान, त्याने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

‘मी ५० वर्षांचा होईपर्यंत खेळलो असतो’

एका मुलाखतीत बोलताना अँडरसनने सांगितले की, मला संधी मिळाली असती, तर मी वयाच्या पन्नाशीपर्यंत इंग्लंडकडून कसोटीत खेळलो असतो.  मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि चांगली कामगिरी करत आहे, असे मला वाटते. अँडरसन इंग्लंडच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत.

आयपीएल खेळण्याची अँडरसनची इच्छा

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जेम्स अँडरसनला नवी इनिंग सुरू करायची आहे. त्याला आपल्या नव्या इनिंगची सुरुवात आयपीएलच्या मैदानातून करायची आहे.  मुलाखतीत तो पुढे म्हणाला की, लिलावात जाण्याचा उद्देश हा आहे की, मला पुन्हा खेळायचे आहे. आयपीएल हंगामात माझी निवड होईल की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. मी  तंदुरुस्त आहे, मी अजूनही गोलंदाजी करत आहे आणि मला वाटते की, मी चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळे मला कुठेतरी खेळण्याची संधी मिळाली तर छान होईल.

अँडरसनने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा टी-२० सामना  २०१४ साली खेळला होता. याआधी अँडरसन  कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. त्याने २४ आणि २५ नोव्हेंबरला  होणाऱ्या लिलावासाठी स्वतःची नोंदणी केली आहे. यात त्याने स्वतःची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये ठेवली आहे. पुढे अँडरसन म्हणाला की, सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये खेळून, त्याला केवळ गोलंदाज म्हणून आपले ज्ञान वाढवायचे नाही, तर प्रशिक्षक म्हणून अनुभव आणि ज्ञान मिळवायचे आहे.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत