भारतीय महिला संघ अजिंक्य 

Indian Women Hockey

राजगीर, वृत्तसंस्था : दीपिकाने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर यजमान भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी महिला हॉकी स्पर्धेमध्ये अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात चीनचा १-० अशा गोलफरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकावले. भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. विशेष म्हणजे, भारताने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता सलग सात विजयांसह या अजिंक्यपदावर नाव कोरले.

या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघास अंतिम सामन्यातही विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यातच साखळी फेरीमध्ये भारताने चीनला ३-० अशा गोलफरकाने हरवल्याने भारताचे पारडे जड होते. मात्र, अंतिम सामन्यात चीनच्या खेळाडूंनी चिवट खेळ करत भारताला कडवी टक्कर दिली. या सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचांचा अंदाज घेत बचावत्मक खेळ केला. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय महिलांनी आक्रमणे रचण्यास सुरुवात केली. या क्वॉर्टरमध्ये भारताने एकूण चार पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु, त्यापैकी एकाही पेनल्टी कॉर्नरवर भारतीय संघास गोल करता आला नाही. दरम्यान, चीनला मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर भक्कम बचाव करून भारताने त्यांना गोल करण्याची संधी नाकारली. मध्यांतरावेळी दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती.

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सुरुवातीलाच भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या दीपिकाने अचूकपणे गोलजाळ्याचा वेध घेतला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. याच क्वॉर्टरमध्ये बाराव्या मिनिटास भारताला पेनल्टी स्ट्रोकही मिळाला होता. तथापि, यावेळी गोल करण्याची सुवर्णसंधी दीपिकाने वाया घालवली. चौथ्या व अखेरच्या क्वॉर्टरमध्ये चीनच्या खेळाडूंकडून बरोबरीचा गोल करण्यासाठी वारंवार भारतीय गोलपोस्टवर आक्रमणे रचण्यात आली. परंतु, भारताच्या बचावफळीने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दिले नाही. अखेर भारताने १-० ही आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान भारताच्या दीपिकाला मिळाला. तिने संपूर्ण स्पर्धेत ११ गोल नोंदवले असून त्यापैकी ४ मैदानी, ६ पेनल्टी कॉर्नरवर, तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला आहे. भारातने यापूर्वी २०१६ आणि २०२३ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच, सर्वाधिक तीनवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे. दरम्यान, बुधवारी ब्राँझपदकाच्या लढतीत जपानने मलेशियावर ४-१ अशा गोलफरकाने मात केली.

Related posts

Chinnaswamy

Chinnaswamy : एकाच मैदानावर कोहलीची सर्वाधिक अर्धशतके

Vaibhav

Vaibhav : वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला

BCCI Tribute

BCCI Tribute : पहेलगाममधील मृतांना आयपीएलमध्ये श्रद्धांजली