पर्थ कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी मात

पर्थ, वृत्तसंस्था : फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सोमवारी चौथ्या दिवशीच २९५ धावांनी पराभव केला. याबरोबर, भारताने मालिकेची सुरुवात विजयाने केली असून पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने विजयासाठी दिलेल्या ५३४ धावांच्या खडतर आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावामध्ये ३ बाद १२ अशी झाली होती. चौथ्या दिवशी दुसऱ्याच षटकात महंमद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद केले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पाचव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिराजनेच स्मिथला बाद १७ धावांवर करत ही जोडी फोडली. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद १०४ धावा झाल्या होत्या.

दुसऱ्या सत्रात, हेड आणि मिचेल मार्श यांनी सहाव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दीडशेपार पोहचवली. ही जोडी भारतासाठी त्रासदायक ठरते आहे, असे वाटत असतानाच जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर हेडला बाद केले. हेड १०१ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ८९ धावांवर बाद झाला. नितीश कुमार रेड्डीने मार्शचा त्रिफळा उडवून कसोटी कारकिर्दीतील पहिलावहिला बळी मिळवला. मार्शने ६७ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. त्यानंतर, अलेक्स केरीने अखेरपर्यंत किल्ला लढवत ३६ धावा केल्या. हर्षित राणाने केरीचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाचा डाव २३८ धावांवर संपवला. भारतातर्फे बुमराह व सिराजने प्रत्येकी ३, तर वॉशिंग्टन सुंदरने २ विकेट घेतल्या. दोन्ही डावांत मिळून ८ विकेट घेणारा बुमराह सामन्याचा मानकरी ठरला. या मलिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून अडलेड येथे रंगणार आहे.

दरम्यान, या विजयानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात पुन्हा अग्रस्थानी पोहोचला आहे. या स्पर्धेमधील भारताचा हा नववा विजय असून भारताची गुणांची टक्केवारी ६१.११ टक्के इतकी आहे. ऑस्ट्रेलिया ५७.६९ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक : भारत – पहिला डाव १५० आणि दुसरा डाव ६ बाद ४८७ (घोषित) विजयी विरुद्ध ऑस्ट्रेलिया – पहिला डाव १०४ आणि दुसरा डाव ५८.४ षटकांत सर्वबाद २३८ (ट्रॅव्हिस हेड ८९, मिचेल मार्श ४७, अलेक्स केरी ३६, जसप्रीत बुमराह ३-४२, महंमद सिराज ३-५१).

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत