महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. यामुळे नाणेफेक दुसऱ्या दिवशी झाली. नाणेफेक जिंकत फलंदाजीसाठी आलेला भारतीय संघ अवघ्या ४६ धावांत तंबूत परतला. भारताची ही तिसरी निचांकी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने खेळ दुसऱ्या दिवशी ३ गडी गमावत १८० धावा केल्या. यामुळे सध्या न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी आहे. डॅरिल मिशेल १४ आणि रचिन रवींद्र २२ धावांवर नाबाद आहेत. (IND vs NZ 1 Test)
न्यूझीलंड संघाला भारतात आजपर्यंत एकही द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी दोन्ही संघांमध्ये १३वी कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हाती आहे. तर टॉम लॅथम किवी संघाची कमान सांभाळत आहे.
भारताचा पहिला डाव
बंगळुरू कसोटीमध्ये टीम इंडियाने सुमार कामगिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ३१.२ षटकात अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला. भारताची ही तिसरी निचांकी धावसंख्या आहे. भारतीय भूमीवर कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
सामन्यात फलंदाजी करतान भारतीय सलामीवीरांनी पहिल्या ६ षटकात अवघ्या ९ धावा केल्या. यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मावर दबाव आला. दबाव कमी करण्यासाठी रोहितने टीम साउदीच्या षटकात आक्रमक फटका मारण्याच्या नादात क्लीन बोल्ड झाला. सामन्यात तो अवघ्या २ धावा करून बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेला कोहली आल्या पावली तंबूत परतला. त्याला विल्यम ओरूकेने बाद केले. त्याच्यासह सर्फराज खानही भोपळा न फोडता तंबूत परतला. बिनबाद ९ धावा असणाऱ्या भारताची अवस्था ३ बाद १० धावा झाली. (IND vs NZ 1 Test)
यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी काही काळ डावाची धुरा सांभाळली. मात्र, विल्यम ओरूर्केने जयस्वालला एजाज पटेलकरवी झेलबाद केले. यानंतर फलंदाजीसाठी आलेला केएल राहुलही शून्य धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ रवींद्र जडेजा बेजबाबदार शॉट खेळून शून्यावर आऊट झाला. उपाहारानंतर आलेल्या रविचंद्रन अश्विनला (0) पहिल्याच चेंडूवर मॅट हेन्रीने बाद केले.
भारताकडून फलंदाजीमध्ये रिषभ पंतने सर्वाधिक २० धावांची खेळी केली. परंतु, त्यालाही मॅट हेन्रीने टॉम लॅथमकरवी झेलबाद केले. जसप्रीत बुमराह ही स्वस्तात बाद झाला. कुलदीप २ धावा करून बाद झाला. गोलंदाजीत न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ५, टीम साऊथीने १ आणि विल्यम ओरूर्कने ४ विकेट्स घेतल्या.
न्यझीलंडचा पहिला डाव
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली. कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने लॅथमला बाद करत ही भागीदारी तोडली. लॅथमने १३ धावाकरून तंबूत परतला. यानंतर कॉनवे आणि विल यंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. ही अर्धशतकी भागीदारी रवींद्र जडेजाने संपुष्टात आणली, त्याने यंगला कुलदीप यादवकरवी झेलबाद केले.
यानंतर डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने भारतीय संघाला तिसरे यश मिळाले. कॉनवेला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने उत्कृष्ट चेंडूवर बाद केले. कॉनवेने १०५ चेंडूमध्ये सामना करत ९१ धावांची खेळी केली. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले. कॉनवे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १५४/३ अशी होती. सध्या न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी आहे.
हेही वाचा :