संशयाच्या भोवऱ्यात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ६६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावून अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिक स्पर्धेत इमानने इटलीच्या बॉक्सरला अवघ्या ४६ सेकंदात पराभूत केले होते. यामुळे तिच्यावर पुरुष असल्याचा आरोप झाला आणि चौकशीअंती तो सिद्धही झाला.

२०२४ चे ऑलिम्पिक सामन्यांदरम्यान पुरूष असल्याचा आरोप होत असूनही इमानने स्पर्धा पूर्ण केली. सुवर्णपदक पटकावले. आता वैद्यकीय अहवालातून इमाने महिला पुरुषच असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय चाचणीत इमाने खलीफच्या शरीरात XY गुणसूत्र असल्याचे सिद्ध झाले.

इमाने अल्जेरियाची. तिचा जन्म २ मे १९९९ सालचा.  लहानपणपासून तिला खेळाची आवड. फुटबॉल तिचा आवडता खेळ. सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण सत्रात सहभागी होण्यासाठी ती टियारेटला जात असे. तेथेच तिने बॉक्सिंगमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. परंतु, वडिलांनी परवानगी दिली नाही.  इमानेला जगातील सर्वात मोठ्या मंचावर सुवर्णपदक जिंकून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवायचा होता. ती सराव करीत राहिली आणि बॉक्सिंग करिअरची सुरुवात २०१८ साली वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून केली. या स्पर्धेत ती १७ व्या स्थानावर राहिली. पाठोपाठ २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या लाइटवेट स्पर्धेत अल्जेरियाचे प्रतिनिधित्व केले. उपांत्यपूर्व फेरीत ती आयर्लंडच्या केली हॅरिंग्टनकडून पराभूत झाली. मात्र ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियाचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली महिला बॉक्सर ठरली. मात्र तिची शरीरयष्टी आणि ताकद पाहता ती पुरूष असल्याचा आरोप सातत्याने होत राहिला. याच वादातून मार्च २०२३ मध्य् झालेल्या आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपूर्वी तिला अपात्र ठरवण्यात आले. डीएनए चाचण्यांमध्ये तिच्यात XY गुणसूत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे ही कारवाई केल्याचा खुलासा आयबीएचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी त्यावेळी केला होता. मात्र हा आरोप फेटाळताना इमानेने आपण मोठ्या षडयंत्राची बळी असल्याचे सांगितले होते.

सातत्याने होत असलेल्या आरोपांना तोंड देत ती चिवटपणे खेळत राहिली. याच जोरावर ती नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक सामन्यासाठीही पात्र ठरली. अल्जेरियाचे प्रतिनिधीत्व केले. २०२३ ला ती पुरूष असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा करण्यात आलेला असतानाही ती ऑलिम्पिकसाठी पात्र कशी ठरली, हा वादाचा मुद्दा आहे. तथापि, आरोपांचे ओझे घेऊनही तिने अंतिम सामन्यात देशासाठी सुवर्णपदक जिंकले. आता तिच्या वैद्यकीय चाचणीबाबतचा २०२३ चा अहवाल फ्रेंच पत्रकाराने उघडकीस आणला आहे. त्यातही ती पुरूष असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. खलीफने क्रोमोसोमल चाचणी केली होती. खलीफमध्ये XY क्रोमोसोम असल्याचे सिद्ध होते, असेही त्यात म्हटले आहे.

इमाने खलिफ अनेकदा वादाची धनी झाली आहे. त्यामुळे तिच्याभोवती नेहमीच वादळ घोंगावत राहिले आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या सूचनेनुसार केलेल्या लिंग चाचणीत इमाने महिला असल्याचे सिद्ध झालेले नव्हते. दिल्लीतील बॉक्सिंग असोसिएशनने इमानेला जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदकाच्या सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती. इमाने मात्र आपण महिलाच असल्याचे ठासून सांगते. मी स्त्री म्हणून जन्माला आले, मी स्त्रीप्रमाणे जगते. पण काही लोक माझ्या यशाचे शत्रू आहेत. ते माझे यश पचवू शकत नाहीत. त्यामुळेच मला नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात अडकवले जाते, असा तिचा आरोप आहे. आता तिच्या कारकीर्दीचे काय होणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम