Naga Sadhu : कसा बनतो नागा साधू ?

Naga Sadhu

सतीश घाटगे : कोल्हापूर : प्रयागराज येथे पहिल्या अमृतस्नानाचा मान नागा साधूंना मिळाला. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर पहाटे साडेतीन वाजता सुरू झालेल्या नागा साधूंच्या मिरवणुकीत श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि शंभू पंचायती अटल आखाड्याच्या नागा साधूंना मान्यता मिळाली. अंगाला भस्म, हातात त्रिशूल, भाले घेऊन निघालेल्या साधूंनी गंगा नदीत डुबकी मारुन अमृत स्नान केले. काही नागा साधू थेट घोड्यावरुन आले होते. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने नदी परिसर दुमदुमून गेला. नागा साधूंची मिरवणूक आणि शाही स्थान पाहण्यासाठी देश-विदेशांतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नागा साधूंच्या शाही स्नानानंतर भाविकांनी डुबकी मारुन महाकुंभ मेळाव्याचा लाभ घेतला. महाकुंभच्या शाही स्नानाचा मान नागा साधूंना का दिला जातो, नागा साधूंची कडक साधना कशी असते? जाणून घेऊया त्याविषयी…(Naga Sadhu)

वस्त्रहीन, दिंगबर अवस्थेतील नागा साधू किंवा नागा संन्याश्यांना महाकुंभात पहिल्या शाही स्नानाचा मान असतो. संस्कृतमधील नग या शब्दापासून नागा शब्द बनला आहे. नग याचा अर्थ पर्वत. पर्वतातील गुहांमध्ये राहणाऱ्यांना नागा संबोधले जाते. नवव्या शतकात शंकराचार्यांनी दशनामी संप्रदायाची सुरुवात केली. बहुतांशी नागा साधू या संप्रदायातून येतात. या संन्याश्यांना दहा नावांनी जोडले जाते म्हणून त्यांना दशनामी म्हटले जाते. गिरी, पुरी, भारती, वन, अरण्य, पर्वत, सागर, तीर्थ, आश्रम, आणि सरस्वती अशी ही दहा नावे आहेत.(Naga Sadhu)

दोन प्रकार

नागा साधू दोन प्रकाराचे असतात. एक शास्त्रधारी आणि दुसरे शस्त्रधारी. मुघलांच्या आक्रमणानंतर सैनिकांची शाखा सुरू करण्याची योजना बनवली. सुरुवातीला नागा साधू अध्यात्मिक असल्याने त्यांना शस्त्राची गरज नाही असे एका गटाचे म्हणणे होते. पण शृंगेरी मठाने शस्त्राधारी नागा साधूंची पलटण तयार केली. त्यामध्ये फक्त क्षत्रियांना प्रवेश होता. नंतर जातीचा मुद्दा हटवण्यात आला.(Naga Sadhu)

कठोर साधना

नागा बनण्याची प्रक्रिया वयाच्या १७ ते १९ व्या वर्षापासून सुरू होते. महापुरुष, अवधूत आणि दिगंबर अशा नागा साधू बनण्याच्या तीन अवस्था किंवा पायऱ्या असतात. नागा बनण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना आखाड्याला अर्ज द्याव्या लागतो, पण नागा बनू इच्छिणाऱ्याला प्रवेश देण्यास नकार दिला जातो. तरीही त्याने नागा बनण्याचा हट्ट धरला तर आखाड्याकडून कठोर परीक्षा घेतली जाते. उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांशी चर्चा केली जाते. घरच्या लोकांनी संमती दिल्यानंतर आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते. त्यानंतर पहिल्या पायरीतील ‘महापुरुष’साठी त्याची परीक्षा घेतली जाते. (Naga Sadhu)

गुरुची सेवा

नागा साधू बनण्याची पहिली पायरी म्हणजे महापुरुष. महापुरुष बनण्यासाठी उमेदवाराला गुरु बनवावा लागतो. एखाद्या आखाड्यात दोन ते तीन वर्षे सेवा करावी लागते. ज्येष्ठ साधू संन्याशांसाठी जेवण बनवणे, स्वच्छतेसारखी कामे करावी लागतात. कडक साधना आणि शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. ही सेवा करत असताना एकवेळच जेवण करण्याची अट असते. कामवासना, झोप आणि भुकेवर नियंत्रण ठेवायला शिकवले जाते. या कालावधीत तो मोह-माया, कुटुंबाची आठवण होते का, याकडे गुरु आणि आखाड्याचे लक्ष असते. उमेदवाराचे मन विचलित झाले तर त्याची रवानगी त्यांच्या घरी केली जाते.

संन्यासी राहण्याची प्रतिज्ञा

गुरुच्या पारखी नजरेत उत्तीर्ण झालेल्या नागा उमेदवाराला संसारी विश्वात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्याने नकार दिल्यानंतर त्याला संन्यास जीवनात राहण्याची प्रतिज्ञा दिली जाते आणि त्याला ‘महापुरुष’ घोषीत केले जाते. उमेदवाराला शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश या देवतांना गुरू करावे लागते. आखाड्याकडून त्यांना नारळ, भगवे वस्त्र, रुद्राक्षांसह नागा साधूंचे प्रतिक आणि आभूषण दिले जाते. त्यानंतर गुरूशिष्याची शिखा कापतात. या विधीनंतर प्रसाद म्हणून शिरा वाटला जातो.(Naga Sadhu)

अवधूत, स्वत:चे पिंडदान आणि १०८ डुबक्या

नागा बनण्याची दुसरी पायरी असते अवधूत. या विधीसाठी पहाटे चार वाजता उठावे लागते. नित्य कर्म आणि साधनेनंतर गुरु त्यांना नदीकिनारी घेऊन जातात. त्यांच्या शरीरावरील सर्व केस कापून त्यांना नवजात बालकांप्रमाणे बनवले जाते. नदीत स्नान केल्यानंतर जुनी लंगोटी फेकून नवी लंगोटी परिधान केली जाते. त्यानंतर गुरु त्यांना दंड, कमंडल आणि भस्म देतात. अलाहाबाद विद्यापीठाचे प्रा. धनंजय चोपडा यांनी आपल्या ‘भारत के कुंभ’ या पुस्तकात या प्रकियेची माहिती दिली आहे. महापुरुष नागांना तीन दिवस उपवास करावा लागतो. त्यानंतर स्वत:चेच श्राद्ध घालावे लागते. त्याला १७ पिंडदान करावी लागतात. म्हणजे पूर्वजांचे १६ आणि स्वत:चे १७ वे पिंडदान करावे लागते. या विधीनंतर तो संसरातील बंधनातून मुक्त होतो. तो नवीन जीवन घेऊन आखाड्यात परततो. त्यानंतर मध्यरात्री विरजा म्हणजेच विजया यज्ञ केला जातो. गुरु पुन्हा महापुरुषाला आपल्या संसारात परत जाण्यास सांगतो. त्याने नकार दिल्यानंतर यज्ञानंतर आखाड्याचे आचार्य, महामंडलेश्वर, महापुरुष नागाला गुरुमंत्र देतात. त्यानंतर त्याला धर्म ध्वजाखाली बसून ‘ओम नम:शिवाय,’ हा जप करावा लागतो.(Naga Sadhu)

दुसऱ्या दिवशी ‘महापुरुषा’ला गंगा नदीकिनारी आणले जाते. त्याला नदीत १०८ वेळा डुबक्या मारण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्याला दंड आणि कमडंलूचा त्याग करायला सांगितले जाते. तो अवधूत साधू बनतो. या प्रकियेत नागा महापुरुषाला चोवीस तास उपवास करावा लागतो.

दिगंबर आणि शाही कुंभस्नानात बनतो नागा

महाकुंभमध्ये अवधूत असलेल्या उमेदवाराला दिगंबर दीक्षा दिली जाते. ही दीक्षा शाही स्नानाच्या आदल्या दिवशी दिली जाते. हा त्यांचा सर्वांत कठीण संस्कार असतो. या विधीवेळी मोजकेच साधू उपस्थित असतात. आखाड्याच्या धर्मध्वजाखाली २४ तास निरंकार उपवास करावा लागतो. त्यानंतर तंगतोड संस्कार केला जातो. पहाटे तीन वाजता आखाड्याच्या भाल्यासमोर जाळ केला जातो. आगीच्या ज्वालात भाला जाळून तो ‘अवधूत’च्या डोक्यावर शिंपडल्यासारखे केले जाते. तसेच गुप्तेंद्रियातील एक नस खेचली जाते. त्यामुळे साधक नपुंसक होतो. या विधिनंतर सर्वांना शाहीस्नानाला नेले जाते. महाकुंभच्या शाहीस्नानात डुबकी मारल्यातंतर तो नागा होतो.(Naga Sadhu)

महाकुंभ चार ठिकाणी होता. त्यानुसार नागा साधूंना वेगवेगळी नावे दिली जातात. प्रयागराजमधील नागा साधू बनणाऱ्यांना ‘नागा’, उज्जैनमधील महाकुंभमधील साधूंना ‘खुनी नागा’, हरिद्वारमध्ये ‘बर्फानी नागा’ तर नासिकमध्ये ‘खिचडिया नागा’ म्हणून ओळखले जाते.

महिलांही बनू शकतात नागा

महिलाही नागा साधू बनू शकतात. त्यांना नागीन, अवधूतनी किंवा माई असे संबोधले जाते. त्या वस्त्र वापरतात. काही महिला नागा वस्त्रांचा त्यागही करतात. जुना आखाडा हा सर्वांत मोठा आणि जुना आखाडा आहे. बहुतांशी नागा महिला या आखाड्याशी जोडल्या आहेत. वरिष्ठ नागा संन्याशींना श्रीमहंत संबोधले जाते. महिला नागा संन्यासी बनण्याची प्रकियाही पुरुष नागा साधूसारखीच आहे. त्यांना ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते आणि पुरुषांप्रमाणे जननांग निष्क्रिय केले जाते. त्यांना ब्रह्मचर्य पालन करण्याचा संकल्प करावा लागतो.

हेही वाचा :
लॉरेन पॉवेल झाल्या कमला !
 आयआयटीयन बाबा सत्याच्या शोधात

Related posts

Shahi Snan : शाही स्नान आणि प्रमुख दिवस

Lauren Powell : लॉरेन पॉवेल झाल्या कमला !

IITian Baba : आयआयटीयन बाबा सत्याच्या शोधात