हेमंत सोरेन पुन्हा आले

झारखंड विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. मंगळवारी २६ नोव्हेंबरला त्यांचा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंडचीही निवडणूक झाली. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये मात्र सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपचा पराभव केल्याने सोरेन सध्या अधिक चर्चेत आहेत. झारखंडमधील निवडणूकीला एक वेगळीच पार्श्वभूमी होती. कारण मुख्यमंत्रीपदावर असताना सोरेन यांना ईडीने एका जमीन गैरव्य्वहार प्रकारणात अटक केली होती. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही झाला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडल्यानंतर त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून चंपाई सोरेन यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवली होती. तथापि त्यानंतर काही नाट्यमय घडामोडी झाल्या. हेमंत सोरेन यांचं तुरुंगातून सुटणं, पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणं, त्यामुळे चंपाई सोरेन यांची नाराजी व पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करणं, या सगळ्या घटनांमुळे संपूर्ण देशाचं लक्ष झारखंड मधील घडामोडींनी वेधून घेतल होत. त्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील निवडणूक झाली होती. हेमंत सोरेन यांनी त्यात बाजी मारली त्यामुळे राज्याची सत्तासूत्रे पुन्हा एकदा त्यांच्या हाती आली आहेत.

  झारखंड हा पूर्वी बिहारचा भाग होता. विभाजन होवून नव्याने राज्याची निर्मिती झाल्यानंतर विद्यमान सत्ताधारी दुसऱ्यादा सत्तेवर येण्याची घटना यंदाच्या निवडणूक निकालाने प्रथमच होत आहे. राजकारणाचा वारसा हेमंत सोरेन यांना कुटुंबाकडून मिळाला. त्यांचे वडील शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक. राज्यातील सर्वात प्रभावी व शक्तीशाली पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते. हेमंत सोरेन यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ ला हजारीबागजवळच्या नेमरा गावात झाला. हायस्कूल व त्यानंतरचे सुरवातीचे महाविद्यालयीन शिक्षण पाटण्यात झाले. इंजिनिअर बनण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे मेसरा येथील बिर्ला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्र वेशही घेतला पण काही कारणांनी सदरचे शिक्षण मध्येच त्यांनी सोडले व वडील शिबू सोरेन यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक कार्यात भाग घेवू लागले. त्यावेळी राजकारणापासून मात्र ते दूर राहिले होते . शिबू सोरेन यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून त्यांचा थोरला मुलगा दुर्गा सोरेन यांच्याकडे पाहिले जात होते. तथापि दुर्गा सोरेन यांच्या आकस्मिक निधनानंतर हेमंत सोरेन तत्कालिन परिस्थितीमुळे आपसूक राजकारणात आले.  २००९ ते २०१० या कालावधीत त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. २०१३ मध्ये ते काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्यावर राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. मात्र २०१४ च्या निवडणूकीत त्याना पराभवाचा सामना करावा लागला. २०१९ ची निवडणूक मात्र त्यांचे पुनरागमन करणारी ठरली . काँग्रेस व राजदच्या पाठिंब्यावर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. मात्र त्यांची ही कारकीर्द वादग्रस्त ठरली. जमीन घोटाळा प्रकरणात अवैध धनस्त्रोताचा वापर केल्याचा ठपका आल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले व तुरुंगवासही झाला. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी भाजपविरुध्द राजकीय संघर्ष् करत २०२४ च्या निवडणूकीत निर्विवाद यश संपादन केले. त्यांच्या नेतृत्वाची लोकप्रियता सिध्द करणारा हा विजय मानला जात आहे. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चाला ३४ तर आघाडीतील अन्य पक्षांपैकी काँग्रेस १६, राजद -४, सीपीआय (एमएल) २ अशा तब्ब्ल ५६ जागा मिळाल्या आहेत.

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम