महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी मैदान गाजवले. जवळपास तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विनच्या फिरकीपुढे किवी फलंदाजांनी लोटांगण घातले. सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने सात तर, आर. अश्विनने तीन फलंदाज बाद करत शानदार कामगिरी केली. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान टीम इंडियाने एक गडी गमावून १६ धावा केल्या. शुभमन गिल १० आणि यशस्वी जैस्वाल ५ धावांवर नाबाद आहे. रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. (IND vs NZ 2nd Test)
पुणे कसोटीत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकी गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघ ३-३ फिरकीपटू घेऊन मैदानावर उतरले. सुरूवातीला किवी फलंदाजांनी शानदार खेळी करत धावा गोळा केल्या. परंतु, वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात यश मिळत नसल्याचे लक्षात येताच कर्णधार रोहितने गोलंदाजीसाठी फिरकीपटूंना पाचारण केले. सामन्यातील आठवे षटक करण्यासाठी आलेल्या आर. अश्विनने टॉम लेथमला (१५) बाद करत न्यूझीलंडला पहिला झटका दिला. यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवला.
सामन्याच्या २४ व्या षटकात आर. अश्विनने विल यंगला (१८) बाद केले. यावेळी सर्फराज खानच्या हट्टामुळे कर्णधार रोहितने डीआरएस (DRS) घेतला. यात यंगची विकेट मिळाली. या विकेटनंतर रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू अश्विनकडे सोपवण्यात आला. यावेळी अश्विनने कॉनवेला बाद करत भागिदारी फोडली. कॉनवने आपल्या खेळीत १४१ चेंडूत ११ चौकारांच्या सहाय्याने ७६ धावांची खेळी केली. यानंतर तीन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने अप्रतिम कामगिरी केली. त्याने उत्कृष्ट फिरकीवर रचिन रवींद्र आणि टॉल ब्लंडल यांना क्लीन बोल्ड केले. रचिनने १०५ चेंडूत महत्वाची ६५ धावांची खेळी केली. तर ब्लंडल अवघ्या तीन धावांवर तंबूत परतला. त्यानंतर सुंदरने डॅरिल मिशेलला (१८) एलबीडब्ल्यू बाद करून न्यूझीलंडला सहावा धक्का दिला.
ग्लेन फिलिप्स मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. त्यालाही सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फिलिप्स बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या २३६/७ अशी होती. यानंतर सुंदरने टीम साऊदी (५), एजाज पटेल (४) आणि मिचेल सँटनर (३३) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. सुंदरने ५९ धावांत सात गडी बाद केले. सुंदरने पहिल्यांदाच कसोटी डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्याच्या सुरूवातीला ३ बाद १९६ अशा मजबूत स्थितीत असलेल्या न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. गोलंदाजीमध्ये भारतीय संघाकडून किवी संघाचे सर्व फलंदाज फिरकीपटूंनी बाद केले. यामध्ये वॉशिंग्टन सुंदरने सात तर आर. अश्विनने तीन फलंदाजांना बाद केले.
वॉशिंग्टनच्या फिरकीत अडकले सात फलंदाज
पुणे कसोटीतून सुमारे तीन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करण्याऱ्या वॉशिंग्टनने किवी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर चांगलेच नाचवले. सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सेशनमध्ये दोन तर, तिसऱ्या सेशन न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना बाद केले. त्याने रचिन रविंद्र, डॅरील मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स,मिचेल सँटनर, टीम साऊदी आणि एजाच पटेलला बाद करत तंबूत पाठवले. त्याच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर आटोपला.
भारत आणि न्यूझीलंडचा कसोटी इतिहास
न्यूझीलंड संघाला भारतीय भूमीवर आतापर्यंत एकही द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. किवी संघाने १९५५ मध्ये पहिल्यांदा भारताचा दौरा केला होता, तेव्हा ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला २-० असा पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेतील तीन सामने अनिर्णित राहिले. (IND vs NZ 2nd Test)
भारतात पहिल्या दिवशी सर्वबाद झालेले संघ
- भारत विरुद्ध न्यूझीलंड २०२४, पुणे
- भारत विरुद्ध इंग्लंड २०२४, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड १९७३, चेन्नई
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९६४, चेन्नई
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९५६, कोलकाता
- इंग्लंड विरुद्ध भारत १९५२, कानपूर
न्यूझीलंडविरूद्ध सर्वोत्तम कामगिरी केलेले गोलंदाज
- ८/७२ एस. वेंकटराघवन, दिल्ली (१९६५)
- ८/७६ एरापल्ली प्रसन्न, ऑकलंड (१९७५)
- ७/५९ आर. अश्विन, इंदूर (२०१७)
- ७/५९ वॉशिंग्टन सुंदर, पुणे (२०२४)
L. B. W!
Washington Sundar is on a roll! 👏 👏
He scalps his 3⃣rd wicket 👌 👌
Live ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/i3B0izJbQ6
— BCCI (@BCCI) October 24, 2024
हेही वाचा :