जमीर काझी : मुंबई : दीड वर्षांपूर्वी बालिकावर झालेल्या लैगिक अत्याचार मुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर हादरले होते. मात्र त्यानंतरही या परिसरातील मुली, महिलाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे. एका खासगी शाळेतील चार वर्षीय चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झालं आहे. कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयानं संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयानं संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत स्कूल व्हॅन मालकाला २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. (A young girl was assaulted in Badlapur)
बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत शिकणारी चार वर्षीय चिमुरडी शाळा सुटल्यानंतर खासगी स्कूल व्हॅनमधून आपल्या घरी जात होती. त्यावेळी व्हॅनमध्ये कुणीही महिला मदतनीस नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत नराधम व्हॅन चालकानं चिमुरडीवर अत्याचार केला. मुलगी दुपारी वेळेत शाळेतून घरी न परतल्यानं तिच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली, तसंच शाळेतही फोन केला. उशिरानं पीडित चिमुरडी घरी आल्यावर तिनं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. हा प्रकार ऐकून पालकांना धक्काच बसला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तत्काळ बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली.
सुमारे दीड वर्षापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. बदलापूरकरांच्या उद्रेकानंतर त्याच शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. नंतर पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा असा प्रकार घडलेल्या बदलापूर शाळेत लहान मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दुष्टीनं उपाययोजना नाहीत. दरम्यान, ही शाळा अनधिकृत असल्याचा आरोप बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती प्रियंका दामले यांनी केला आहे. (A young girl was assaulted in Badlapur)
“व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करताना शिक्षण विभागाच्या आवश्यक नियमावलीचं पालन केले जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच काही स्वयंसेवी कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती. आज आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर 27 जानेवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. (A young girl was assaulted in Badlapur)