मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Eid holiday)
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे एकाच कालावधीत येत असल्याने दोन्ही सण सोहार्दाने साजरे व्हावेत, यासाठी ५ ऐवजी ८ सप्टेंबरला मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्यामुळे ही मागणी केली आहे.
नसीम खान यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद आणि हिंदू समाजाचा अनंत चतुर्थी हे सण एका मागोमाग येत आहेत. त्यामुळे राज्यात बंधूभाव आणि हिंदू – मुस्लिम एकोपा अबाधित राखण्यासाठी मुंबईतील विविध मुस्लिम संघटनांच्या ऑल इंडिया खिलाफत कमिटीमध्ये बैठक घेण्यात आली. (Eid holiday)
या बैठकीत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी काढण्यात येणारी मिरवणूक ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही धर्माचे पवित्र असे सण प्रेम व सद्भावनेने साजरे होतील. गेल्यावर्षीही दोन्ही समाजाचे सण एका मागोमाग येत असल्याने ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. यावर्षीही दोन्ही धर्माचे सण एका मागोमाग येत असल्याने मिरवणूक दिनी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी शासनाने जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.