Home » Blog » Gokul : महायुतीचा ‘गोकुळ’ वर ताबा?

Gokul : महायुतीचा ‘गोकुळ’ वर ताबा?

डोंगळेंना अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याची सूचना

by प्रतिनिधी
0 comments
Gokul

कोल्हापूर : प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटीची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ वर थेट ताबा मिळवण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोकुळवरील एकहाती सत्ता असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्याकडून गोकुळच्या सत्तेची सुत्रे जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

गोकुळवर अडीच दशकाहून अधिककाळ सत्ता माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील, आणि अरुण नरके यांच्याकडे होती. पण २०२१ मध्ये सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी गोकुळ ची सत्ता हस्तगत केली. सत्ता हातात घेतल्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदाची विभागणी करण्यात आली होती. पहिली दोन वर्षे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांना संधी दिली. त्यानंतर ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांना संधी दिली. शेवटचे वर्षे सतेज पाटील गटाला देण्याचे ठरले होते. त्यानंतर आज १५ मे रोजी संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष डोंगळे राजीनामा देणार होते. पण त्यांनी आजच्या बैठकीला रजा घेत राजीनामा देण्याचे टाळले.

गोकुळचे अध्यक्षपद सतेज पाटील गटाकडे जाऊ नये यासाठी भाजप खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांचे प्रयत्न सुरू होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीनंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत. लोकसभा निवडणूकीत महायुती आणि इंडिया आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळाली. पण विधानसभा निवडणूकीत दहा पैकी दहा जागा महायुतीने जिंकल्याने जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडी पिछाडीवर पडली आहे. सहकारात पक्षीय राजकारण आणणार नाही अशी घोषणा जिल्ह्यातील नेत्यांनी केली होती. त्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे गोकुळमध्ये पक्षीय राजकारण होणार नाही असे वाटत असताना बुधवारी मुंबईतून सुत्रे हलली.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन करत डोंगळे यांनी आजच्या संचालकांच्या बैठकीत रजा घेतल्याने राजीनाम्याचा प्रश्न निकालात निघाला. या संदर्भात डोंगळे यांना पत्रकारांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्याला राजीनामा देण्यास सांगितले होते. पण मुख्यमंत्री फडणवीस आणि  उप मुख्यमंत्री शिंदे  यांनी राजीनामा देऊ नये अशी सूचना केली आहे. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने आणि गोकुळचे हित लक्षात घेऊन त्यांचा आदेश आपण डावलू शकत नाही असेही ते म्हणाले. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका असल्याने गोकुळवर महायुतीची सत्ता असावी असे महायुतीच्या नेत्यांचे म्ह्णणे आहे. आजही आपण स्थानिक नेत्यांसोबतच आहे. गोकुळवर महायुतीची सत्ता असावी याबाबत मुश्रीफ आणि कोरे यांनी निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00