Home » Blog » सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात पशुधन संकटात

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात पशुधन संकटात

वन्यप्राण्यांच्या संकटामुळे गवळी धनगर समाजासमोर मोठे आव्हान

by प्रतिनिधी
0 comments
  • हिमांशू नितनवरे

महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत राहणाऱ्या गवळी धनगर समाजासमोर पशुधन वाचवण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. बिबटे, रानकुत्री (ढोल) आणि वाघ यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होत असून, ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक कुटुंबांना पारंपरिक पशुपालन व्यवसाय सोडावा लागू शकतो, असा इशारा एका नव्या अभ्यासातून देण्यात आला आहे. (Human–wildlife conflict)

पशुधनाच्या अस्तित्वालाच धोका

संशोधकांनी कोकण विभागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील २५ वाड्यांमधील १२२ कुटुंबांचा अभ्यास केला. या कुटुंबांकडे एकूण १,२८० जनावरे होती, त्यामध्ये ५६३ गायी आणि ७१७ म्हशींचा समावेश होता.

२०१९ ते २०२५ या काळात या परिसरात २५० जनावरांवर वन्यप्राण्यांचे हल्ले झाल्याची नोंद करण्यात आली. दरवर्षी हल्ल्यांचे प्रमाण वाढत गेले असून २०२५ मध्ये प्रति जनावर हल्ल्यांचा दर ०.०६३ पर्यंत पोहोचल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. (Human-wildlife conflict)

अभ्यासाचे सहलेखक आणि स्वतंत्र संशोधक मिलिंद वाटवे यांच्या मते, काही भागांमध्ये पशुधनाच्या नैसर्गिक पुनरुत्पादनाची क्षमता धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

 ‘टिपिंग पॉइंट’ म्हणजे काय?

पशुधन टिकून राहण्यासाठी प्रत्येक पिढीत पुरेशा प्रमाणात मादी वासरे जन्माला येणे आणि ती पुढे प्रजननक्षम होणे आवश्यक असते.

मिलिंद वाटवे म्हणाले, “फक्त मादी वासरू जन्माला येणे पुरेसे नाही. ते मोठे होऊन प्रजननक्षम झाले पाहिजे आणि पुढची पिढी निर्माण केली पाहिजे. तेव्हाच पशुधनाची संख्या स्थिर राहते किंवा वाढते.” (Human-wildlife conflict)

मात्र वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ही साखळी तुटत आहे. अभ्यासानुसार दरवर्षी प्रति जनावर ०.०४५ ते ०.०६ इतका शिकारीचा दर गाठला की पशुधनाची संख्या नैसर्गिकरीत्या भरून निघणे कठीण होते.

काही वाड्यांमध्ये हा दर ०.१४ इतका नोंदवण्यात आला आहे.

काही कुटुंबांनी पशुपालनच सोडले

संशोधकांच्या मते, परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही धनगर कुटुंबांनी जनावरे पाळणेच बंद केले आहे. (Human-wildlife conflict)

पशुधन कमी झाले की उत्पन्न घटते, त्यामुळे पशुपालन व्यवसाय परवडेनासा होतो. परिणामी अनेकांना मजुरीसाठी स्थलांतर करावे लागू शकते.

अत्यंत टोकाच्या परिस्थितीत वन्यप्राण्यांना विष देणे किंवा शिकारीला पाठिंबा देणे यासारख्या घटना वाढू शकतात, अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.

बिबट्यांबरोबर आता रानकुत्रे आणि वाघही

पूर्वी या भागात प्रामुख्याने बिबट्यांकडूनच पशुधनावर हल्ले होत असत. मात्र २०१९ नंतर परिस्थिती बदलली.

पश्चिम घाटाच्या उंच भागांत मर्यादित असलेली रानकुत्र्यांची टोळी (ढोल) आता खालच्या भागातही पोहोचली असून त्यांनी पशुधनावर हल्ले सुरू केले आहेत. (Human-wildlife conflict)

याशिवाय २०२५-२६ मध्ये पूर्व विदर्भातून तीन वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आल्यानंतर वाघांच्या हल्ल्यांच्याही घटना वाढल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

शेती घटली, पशुधनावर अवलंबित्व वाढले

गवळी धनगर समाज पूर्वी बाजरीसारखी लहान धान्ये आणि भाताची शेती करत होता. मात्र रानडुक्कर आणि गव्यांमुळे पिकांचे नुकसान वाढल्याने शेती करणे कठीण झाले आहे.

त्यामुळे आता पशुधन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनले आहे. अशा वेळी जनावरांवरील हल्ल्यांचा परिणाम अधिक गंभीर ठरत आहे.

मानवी अतिक्रमणाचे कारण अपुरे

वन्यजीव-मानव संघर्षाबाबत सामान्यतः मांडले जाणारे अनेक समज या अभ्यासाने प्रश्नांकित केले आहेत.

अनेकदा संघर्षाचे कारण वाढती लोकसंख्या, पशुधनाची संख्या किंवा जंगलातील अतिक्रमण असल्याचे सांगितले जाते. मात्र या भागात धनगर कुटुंबांची आणि त्यांच्या जनावरांची संख्या उलट कमी होत आहे.

व्याघ्र प्रकल्पामुळे झालेले विस्थापन आणि रोजगारासाठी झालेले स्थलांतर यामुळे अनेक कुटुंबे आधीच परिसर सोडून गेली आहेत. (Human-wildlife conflict)

गुरे बांधण्यासाठी धनगर वापरत असलेली मजबूत दगडी घरेही तुलनेने सुरक्षित आहेत. त्यामुळे केवळ निकृष्ट गोठ्यांमुळे हल्ले होत असल्याचा युक्तिवादही या अभ्यासात फेटाळण्यात आला आहे.

सहअस्तित्वाच्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह

संशोधकांच्या मते, वन्यप्राणी माणसांना कमी घाबरू लागले आहेत का, याचाही सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.

सह्याद्री परिसरातील गवळी धनगर आणि मोठे मांसाहारी वन्यप्राणी यांच्यातील दीर्घकालीन सहअस्तित्व आता तणावाच्या टप्प्यावर पोहोचल्याचे या अभ्यासातून दिसून येते. (Human-wildlife conflict)

वनसंवर्धनाच्या धोरणांमध्ये वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे आहेच. मात्र त्यांच्यासोबत राहणाऱ्या पारंपरिक पशुपालक समुदायांचे अस्तित्वही तितक्याच गांभीर्याने विचारात घेतले पाहिजे, असा निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.

(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) `डाऊन टू अर्थ ` च्या सौजन्याने)

You may also like

error: Content is protected !!