- विजय चोरमारे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात सध्या केंद्रसरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात असंतोष असताना पवार यांनी भेट घेऊन मोदी यांचा आत्मविश्वास वाढवल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. पवारांनी ज्या प्रश्नांसाठी भेट घेतली, ते महत्त्वाचे असले तरी त्यांची भेटीची वेळ मात्र चुकली आहे, असे ठामपणे म्हणता येते. पवार यांच्या पक्षाचे एकेकाळी घड्याळ हे चिन्ह असताना ते वेळेची अशी गफलत वारंवार का करतात, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. (Sharad Pawar-Narendra Modi Meeting)
पवारांच्या पक्षाभोवती संशय
गेले महिनाभर शरद पवारांचा पक्ष देशाच्या राजकारणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडल्यानंतर पुढचे टार्गेट शरद पवारांचा पक्ष असल्याची चर्चा होती. त्यांचे आठपैकी सहा खासदार फुटू शकतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यासंदर्भात वक्तव्य केले होते. अशातच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामध्ये सरसकट ५० टक्के जागा वाढवण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केला तर आम्ही पाठिंबा देण्यासंदर्भात विचार करू, असे विधान करून त्यांनी गोंधळ उडवून दिला होता. आणि त्यांचे जवळपास ठरले असल्याची चर्चा जोर धरू लागली. कारण आमचा पक्ष इंडिया आघाडीसोबतच राहील आणि कोणत्याही परिस्थितीत एनडीएला पाठिंबा देणार नाही, असे ठाम विधान सुप्रिया सुळे यांनी केले नाही.
हेही वाचाः शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?
हे सगळे घडत असताना सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी १८ जुलैला कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला भेट देऊन सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पोलिस लाठीमाराच्या दुस-या दिवशी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपकेची भेट घेतली. शिवाय सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसने केलेल्या आंदोलनातही त्या सहभागी झाल्या. प्रधानमंत्री कायर है, अशा घोषणा प्रियांका गांधी देत होत्या त्यावेळी त्या त्यांच्याशेजारी उभ्या होत्या. (Sharad Pawar-Narendra Modi Meeting)
संसदेत आणि संसदेबाहेर केंद्रसरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तापले असताना बुधवारी सकाळी अचानक शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. नंतर शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनाची प्रत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली. पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातील कृषी व जल क्षेत्राशी संबंधित प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी तसेच शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
पवारांच्या निवेदनाचा आशय
देशातील व महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र आणि अन्नदाता शेतकरी आज गंभीर संकटातून जात आहेत. अनियंत्रित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पाणीटंचाई, अपुरी सिंचन व्यवस्था व जल व्यवस्थापनातील त्रुटींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु, याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे प्रशासकीय उदासीनता, धोरणात्मक त्रुटी, योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश आणि प्रभावी व्यवस्थापन व उत्तरदायित्वाचा अभाव, ज्यामुळे शेतकरी असहाय्य झाला आहे. (Sharad Pawar-Narendra Modi Meeting)
हेही वाचाः शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?
महाराष्ट्रात सरासरी दर तीन तासांनी एक शेतकरी आत्महत्या करत असून विदर्भ आणि मराठवाडा भागात एका वर्षात २,७०० हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. दुर्दैवाने, अशा पीडित कुटुंबांना दिली जाणारी एक लाखाची सरकारी मदतही किचकट पात्रता अटी, चौकशी प्रक्रिया आणि प्रशासकीय विलंबामुळे वर्षांनुवर्षे प्रलंबित राहते. त्यामुळे या प्रकरणांचे तत्काळ डिजिटल व्हेरिफिकेशन करून मदतीची रक्कम थेट आणि त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी.
जलजीवन मिशनचे अपयश
राज्यात सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी हजारो कोटी रुपये मंजूर होऊनही नियोजनबद्ध अंमलबजावणीचा अभाव, प्रशासकीय भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे ‘जल जीवन मिशन’सह अनेक महत्त्वाचे सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. केंद्र सरकार २३ पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य (MSP) घोषित करते, परंतु महाराष्ट्रात खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहतात. त्याचबरोबर बनावट बियाण्यांचा प्रश्न, राष्ट्रीय पातळीवर सर्व पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य लागू करावे अशा मागण्याही पवार यांनी केल्या आहेत.
शेतकऱ्याला केवळ मदत, अनुदान किंवा कर्जमाफी नको आहे, तर त्याला त्याच्या कष्टाचे योग्य मूल्य आणि पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन हवे आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar-Narendra Modi Meeting)
मोदींच्या अडचणीत पवारांची साथ
म्हणजे एकीकडे हजारो तरुण आणि आंदोलक शिक्षण व्यवस्थेबाबत उत्तरदायीत्वाची मागणी करीत असताना शरद पवार यांनी शेतक-यांच्यासंदर्भात त्याच उत्तरदायित्वाची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीबाबत कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु सध्याच्या वातावरणात पवार यांच्यासारख्या नेत्याने मोदींची भेट घेणे टीकेचे लक्ष्य बनले आहे. शरद पवार यांच्या राजकारणाचा इतिहास पाहिला, तर ते संवादाची दारे कधीही बंद ठेवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक भेटीचा अर्थ लगेच राजकीय समीकरणांमध्ये बदल असा लावणे योग्य ठरत नाही. मात्र, अशा भेटींचा राजकीय संदेश नक्कीच असतो. आणि पवार त्याबाबत माहीर आहेत.
ज्या ज्या वेळी नरेंद्र मोदी प्रचंड अडचणीत असतात तेव्हा शरद पवार त्यांच्या मदतीला धावतात, असा इतिहास आहे. अशी भेट अडचणीत असलेल्या मोदींचा आत्मविश्वास वाढवण्यास सहाय्यभूत ठरते. तसेच विरोधी इंडिया आघाडीतही त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. एकीकडे सरकारविरोधात विरोधकांना पहिल्यांदाच चांगला मुद्दा मिळाला आहे आणि सरकार बॅकफुटवर गेले आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीमारापाठोपाठ राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या अटकेमुळे राजकीय वातावरण सरकारच्या विरोधात गेले आहे. अशा वेळी शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने मोदींची भेट टाळायला हवी होती, अशीच सर्वसाधारण जनभावना आहे. शरद पवार यांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातही बेभरवशी नेते मानले जाते. अशा भेटींमुळे तो समज घट्ट होण्यास मदत होते. (Sharad Pawar-Narendra Modi Meeting)
निष्कर्षाची घाई नको
तरीसुद्धा या भेटीवरून काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरू शकेल. कारण पवारांच्या याआधीच्याही काही भेटींवरून तर्कवितर्क मांडण्यात आले. परंतु पवार यांनी त्या सर्वांना खोटे ठरवले. त्यामुळे संसदेत येणा-या विधेयकांच्यावेळी पवार यांच्या पक्षाचे खासदार काय निर्णय घेतात. ते इंडिया आघाडीसोबत ठाम राहतात की एनडीएला मदत करतात, हे उघड झाल्यानंतरच त्यासंदर्भात बोलणे इष्ट ठऱेल. तूर्तास एवढेच म्हणता येईल, पवार यांचे मुद्दे रास्त असले तरी त्यांची भेटीची वेळ चुकली आहे. अर्थात अशा वेळा चुकवत आणि भल्याभल्यांना चकवे देतच पवारांचे राजकारण इथपर्यंत आले आहे, हे विसरून चालणार नाही.