मुंबई : विशेष प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Congress slams CM Fadanvis)
फडणवीस यांच्यातील अहंकराचा हा दर्प नाही तर दुर्गंधी बोलण्यातून दिसली. हे ‘चिफ मिनिस्टर’ नाही चर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेव्हा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते अशी टीकाही त्यांनी केली. (Congress slams CM Fadanvis)
प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,’ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व फडणवीस आयोगाचा बचाव करण्यास का येतात? कारण ‘दाल में कुछ काला है’ असे नाही तर सर्व दालच काळी आहे. राहुल गांधी यांनी जो घोटाळा दाखवला त्यातून निवडणूक आयोगाबरोबरचे हितसंबंध उघडे पडतील याची भीती फडणवीस यांना वाटत असावी म्हणूनच त्यांची तडफड होते. मतदानावेळीच हरकत का घेतली नाही, या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपाकडून असे प्रश्न उपस्थित करून भ्रम पसरवला जात आहे. मतदानावेळी व त्यांनतरही काँग्रेसने आक्षेप घेतलेले होते व हरकतीही उपस्थित केल्या आहेत. पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाला भेटून घोटाळाचे पुरावेही त्याचवेळी दिले आहेत पण भाजपा केवळ बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहे. (Congress slams CM Fadanvis)
राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरु आहे हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी गठीत करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती. पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
मत चोरी विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आंदोलन करणार आहे. रॅली काढून, पदयात्रा व यात्रा अशा विविध प्रकारे हे आंदोलन करण्यात येणार आहे. शुक्रवारी (८ ऑगस्ट) सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.