मुंबई : प्रतिनिधी : बाजारपेठेत साखरेचे वाढते दर आणि सणासुदीनंतर साखर बाजारपेठेत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाळप हंगाम लवकर सुरू होणार असल्याने साखर उताऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sugarcane crushing season to begin on October 15)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. साखर उतारा कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.
गतवर्षी २०२५ मध्ये गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला होता. पण साखरेच्या वाढत्या दरामुळे यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे तगादा सुरू होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्री समितीने गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Sugarcane crushing season to begin on October 15)
बैठकीत राज्यातील उसाची उपलब्धता, गाळप हंगामाचे नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा दर याबाबत चर्चा झाली. तसेच साखर उद्योगासंबधीत केंद्राकडे असलेल्या प्रलिंत प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. साखरेच्या किमान दरात वाढ करणे, इथेनॉलचा दर वाढवणे या मागण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Sugarcane crushing season to begin on October 15)