Home » Blog » Team India announced: गिल भारताचा नवा कसोटी कर्णधार

Team India announced: गिल भारताचा नवा कसोटी कर्णधार

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; सुदर्शन, नायरला संधी

by प्रतिनिधी
0 comments
Team India declared

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ अखेर शुभमन गिलच्या गळ्यात पडली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून शुभमनकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. आयपीएलमध्ये छाप पाडणारा साई सुदर्शन व देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणारा करुण नायर यांनाही या संघात स्थान देण्यात आले आहे. (Team India announced)

रोहितच्या निवृत्तीपासूनच भारताच्या कसोटी कर्णधारपदासाठी विविध खेळाडूंची नावे पुढे येत होती. अखेर बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी शुभमनचे नाव कर्णधार म्हणून जाहीर करत याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 20 जून ते 31 जुलैदरम्यान भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघामध्ये 18 जणांचा समावेश असून रिषभ पंत संघाचा उपकर्णधार आहे. भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये जसप्रीत बुमराह भारताचा उपकर्णधार होता. त्या दौऱ्यामध्ये रोहितच्या अनुपस्थितीत त्याने दोन कसोटींमध्ये संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. तथापि, त्याच्या फिटनेसचा विचार करता त्याला इंग्लंड दौऱ्यातील एक किंवा दोन कसोटींत विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यामुळे, त्याचा विचार कर्णधारपदासाठी झाला नसल्याचे आगरकर यांनी सांगितले. (Team India announced)

सहा पूर्णवेळ फलंदाज, चार अष्टपैलू, दोन यष्टिरक्षक, एक फिरकीपटू आणि पाच वेगवान गोलंदाज अशी भारतीय संघाची रचना आहे. यशस्वी जैस्वालसोबत सलामीवीर म्हणून रोहितच्या जागी लोकेश राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन असे दोघेजण संघात आहेत. अभिमन्यूला यापूर्वी 2021 च्या इंग्लंड दौऱ्यासाठी, तसेच मागील वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही संघामध्ये निवडण्यात आले होते. तथापि, त्यावेळी त्याला अंतिम अकरा जणांमध्ये स्थान न मिळाल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण अद्याप झालेले नाही. विराट कोहलीही कसोटीतून निवृत्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मधल्या फळीसाठी शुभमन व पंतसह साई सुदर्शन आणि करुण नायर यांना संधी देण्यात आली आहे. नायरने 2017 नंतर प्रथमच भारतीय संघामध्ये स्थान पटकावले आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या सुदर्शनसाठी प्रथमच कसोटी संघाची दारे खुली झाली आहेत. (Team India announced)

सुदर्शनप्रमाणेच वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचीही प्रथमच कसोटी संघामध्ये निवड करण्यात आली आहे. त्याच्यासह बुमराह, महंमद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाजीची आघाडी सांभाळतील. शार्दुलने मागील इंग्लंड दौऱ्यामध्ये फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याची अष्टपैलू म्हणून संघात निवड करण्यात आली. त्याच्यासह नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू संघात आहेत. पंत हा संघाचा मुख्य यष्टिरक्षक असून पर्यायी यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेल संघामध्ये आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीस २० जूनपासून हेंडिग्ले येथे सुरुवात होईल. तत्पूर्वी, भारतीय संघ लंडनमध्ये १३ ते १६ जूनदरम्यान भारत अ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, रिषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि अर्शदीप सिंग.

हेही वाचा :
आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00