मुंबई : विशेष प्रतिनिधी : पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीच्या गाड्याची दोन चाके आहेत. ही दोन चाके एकमेकांसोबत चालली तरच लोकशाही योग्य रुळावर राहते. टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (८ सप्टेबर) केले. (CM honored with Award)
“अनेक लोकांना वाटलं की, माझी राख होत आहे, पण तेवढ्यात मी भरारी घेतली,” असे त्यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
फडणवीस यांनी यावेळी त्यांची राजकीय कारकीर्द आणि राजकारणात आलेल्या कठीण परिस्थितीवर भाष्य केले. जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला, तेव्हा त्याला सकारात्मकतेने सामोरा गेलो. आव्हानांपासून कधी पलायन केले नाही. त्यांचा सामना केला. माणसे झुंजवली नाहीत, त्यांचा द्वेष केला नाही आणि टोकाचे राजकारणही केले नाही. यामुळेच या कठीण परिस्थितीत मी एकेक पाऊल पुढे जात गेलो,” असे सांगितले. (CM honored with Award)
मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे त्यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुकचे प्रकाशन करण्यात आले. या पुरस्कार सन्मानाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बळ द्विगुणित झाले असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारिता अधिक कठीण झाली आहे. कोविडनंतर तर आव्हान अधिक वाढले. पत्रकार दिवस-रात्र रस्त्यावर असतात. हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ मजबूत राहावा म्हणून सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (CM honored with Award)
सकारात्मक विचारसरणीने अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारी कामे करता आली. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांची निराशा दूर करणारे उपक्रम ही गुरुदेवांच्या प्रेरणेतून शक्य झाली. असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यावेळी पत्रकार यांनी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरण जोशी आदी उपस्थित होते.