कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. तोकडे कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पत्रक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रसिद्ध केले आहे. तसेच मंदिरात ड्रेस कोड संदर्भातील सूचनांचे फलकही लावण्यात आले आहेत. यापुढे तोकडे कपडे परिधान करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे. (Dress code)
राज्यात अनेक मंदिरात तेथील व्यवस्थापनाने भाविकांसाठी ड्रेसकोड लागू केले आहेत. कोल्हापूरातही अंबाबाई मंदिरात ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केली होती. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू केला आहे. देवस्थान समितीने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करुन मंदिरात प्रवेश करतात. काही मंदिरामध्ये दर्शन घेणाऱ्या भाविकासाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. करवीर अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. या मंदिराचे महत्व मोठे असून मंदिरात येणाऱ्या भाविकांनी दर्शनास येताना धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावे. मंदिरामध्ये येणाऱ्या स्त्री आणि पुरुष भक्तांनी पारंपरिक कपडे परिधान करावेत, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. (Dress code)
या संदर्भात देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे म्हणाले, मंदिरात काही भाविक तोकडे कपडे घालून येतात. मंदिराचे धार्मिक महत्व लक्षात घेत पारंपरिक पद्धतीने कपडे घालून यावेत यासाठी आम्ही भाविकांना आवाहन केले आहे. त्यासंदर्भात मंदिरात फलक लावले आहेत. यापुढे तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे शिवराज नायकवडे यांनी सांगितले. (Dress code)