- डॉ. कुमार सप्तर्षी
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, डॉ. कुमार सप्तर्षी (वय ८५) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे समाजवादी आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपला आहे. डॉ. सप्तर्षी यांचे `येरवडा विद्यापीठातील दिवस` हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या प्रारंभीच्या दिवसांबद्दल लिहिले आहे. त्यातील काही अंशः (Kumar Saptarshi Autobiography)
‘मी हार्वर्ड विद्यापीठात शिकलो’ किंवा ‘माझं शिक्षण केंब्रिजमध्ये झालं’ अशा वाक्यांचा केवढा दबदबा असतो! माणूस फारच विद्वान आहे हे आपण निःशंकपणं चटकन स्वीकारतो. हे झालं पुस्तकी शिक्षणाबाबत. पण जिथं माणूस नावाचा प्राणी वाचायला मिळतो, माणूस हाच जिथं सर्वात मोठा ग्रंथ असतो, जिथं दुसऱ्याला वाचता वाचता आपण स्वतःला वाचायला शिकतो असं एक अफलातून विद्यापीठ आहे. मानवी मनाचा अथांग आविष्कार शोधण्याची संधी तिथं लाभते. विशेष म्हणजे या विद्यापीठात वैश्विक स्वरूपाचं ज्ञान लाभतं. ह्या विद्यापीठाला आम्ही ‘येरवडा विद्यापीठ’ हे नाव दिलं होतं.
युवक क्रांती दलाच्या चळवळीमध्ये या विद्यापीठातून पदवीधर झालेले असंख्य युवक पुढं सामाजिक कार्यकर्ते, आमदार, मंत्री, विद्यापीठाचे कुलगुरू, संस्थाचालक, पत्रकार, सिनेमा दिग्दर्शक बनले. तुरुंगवास, सत्याग्रह या दोन गोष्टींना आम्ही युक्रांदीय पवित्र मानायचो. अन्यायाविरुद्ध सत्याग्रही मार्गानं संघर्ष करून स्वखुषीनं तुरुंगवास पत्करणं ही गोष्ट आम्ही आत्मगौरवाची मानीत असू. कोणत्याही तुरुंगाला ‘येरवडा विद्यापीठ’ म्हणून संबोधण्याची आमच्यात प्रथा पडली. अनेक चळवळींमध्ये तुरुंगात गेलो. वेगवेगळ्या ठिकाणच्या तुरुंगांमध्ये राहिलो. दर वेळी नवं शिकायला मिळालं. (Kumar Saptarshi Autobiography)
येरवडा विद्यापीठः महान आश्रम
येरवडा विद्यापीठ म्हणजे एक महान आश्रम! आश्रमात ऋषी राहतात. ऋषी म्हणजे संयमी माणसं. आत्मशुद्धी झालेली. इथं मात्र मनावर ताबा नसलेली माणसं येतात. माणसाचं जाडंभरडं, खरंखुरं नि अनघड रूप इथं पाहायला मिळतं. गुन्हेगार इथं खरं बोलतो. सर्व मुखवटे काढून वागतो. प्रत्येक गुन्हेगाराची कथा हे समाजदर्शनच असतं.
येरवडा विद्यापीठात मी जीवनाची गीता शिकलो. श्रीकृष्ण भेटला नाही. विश्वरूपदर्शन मात्र झालं. जीवनाच्या रणांगणात पाय लटपटण्याचा धोका उरला नाही.
गाव बदलण्याचा विचार
खेड्यात जन्मलेलो. बालपण तिथंच गेलं. नंतर शिक्षणाकरता शहरात आलो. दृष्टी बदलायला लागली. वाचन वाढलं. नगरला गांधी मैदानावर पुढाऱ्यांची भाषणं ऐकली. राजकीय विचारांची गोडी लागली. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू झालेली. गोवा मुक्ती आंदोलनही चालू होतं. कॉ. नाना पाटील, सेनापती बापट, आचार्य अत्रे, बॅ. नाथ पै, एसेम जोशी, कॉ. डांगे, कॉ. चितळे यांची भाषणं ऐकून मन भरल्यासारखं वाटायचं. बाहू फुरफुरायचे. राष्ट्र, समाज याबद्दल प्रेम वाढलं. समाजाकरता त्याग करावा, समर्पित जीवन जगावं, अन्यायाविरुद्ध झुंज द्यावी असे विचार मनात सारखे घुमत. दर वेळी सुट्टीत राशीनला गेलं की मनातले विचार पुढं गेलेले असत. गावातला अन्याय, जातीयवाद, अस्पृश्यता या गोष्टी पाहून चीड येऊ लागली. लहानपणी हे सारं सहज स्वीकारलेलं होतं. आता त्याच गोष्टी खटकू लागल्या. गावात काँग्रेसशिवाय दुसरा पक्ष नव्हता. मालकाशिवाय अन्य कायदा नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे लोक गावात आले, तर त्यांच्यावर मालकाचे गुंड दगडफेक करीत.
मी सुट्टीत मित्र जमवीत असे. त्यांना विचार सांगत असे. आपलं गाव सरंजामशाहीचं आहे, ते बदलायला पाहिजे हे पटविण्याचा प्रयत्न करीत असे. गाव बदलायचा आम्ही संकल्प केला. बावीस जण सायकलीवरून सिद्धटेकच्या गणपतीला गेले. सिद्धटेक राशीनहून तेवीस किलोमीटर अंतरावर. सिद्धिविनायकाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी मिळून त्याच्याकडे मागणं मागितलं. ‘हे गजानना, राशीनच्या मालकाची राजवट उलथून टाकण्यास आम्हांला सहाय्य कर, यश दे. राशीनच्या जनतेची मुक्ती होऊ दे.’ तेव्हा माझं वय होतं बावीस.
जीवनाचं अधिष्ठान त्याच प्रसंगात ठरून गेलं. पुढं मनातल्या बीजांचा विकास होत गेला. गाव बदलण्याचा विचार समाज, राष्ट्र बदलण्याच्या विचारापर्यंत रूपांतरित झाला, उत्क्रांत झाला. (Kumar Saptarshi Autobiography)
तुरुंगाचे लोखंडी गज
लहानपणी कथा-कीर्तनांमधून, दर वर्षी होणाऱ्या गोकुळाष्टमीच्या उत्सवात कृष्णजन्माची कथा ऐकायला मिळायची. राजसत्तेच्या विरोधातल्या, अनिष्टांविरुद्ध लढणाऱ्या, सामाजिक अरिष्टाविरुद्ध झुंजणाऱ्या शक्तीचा जन्म कारागृहातच होतो असं वारंवार कानावर पडलं होतं. तसा मनावर खोल संस्कार झालेला होता.
महाविद्यालयामध्ये शिकत असताना थोरो ह्या विचारवंताचे विचार वाचायला मिळाले. त्या विचारांनी अगदी भारावून गेलो. सरकारच्या अन्यायाच्या विरोधात विद्रोह किंवा आपला निषेध व्यक्त करण्यासाठी थोरो जाहीर भूमिका घ्यायचा. त्या भूमिकेचा जाहीर आविष्कार म्हणून तो सरकारचा कर भरायचा नाही. मग त्याला अटक व्हायची. तुरुंगातल्या खिडकीमधून जगाकडे विजयी मुद्रेनं पाहत तो म्हणायचा, ‘अन्यायाविरुद्ध न लढणारे लोक जुलूम सहन करतात. भयापोटी तुरुंगाबाहेर राहतात. त्यांच्याकडे पाहून मला वाटतं की, ह्या लोखंडी गजांच्या अलीकडे असणारा मीच खरा मुक्त! गजांच्या पलीकडे राहणारे लोकच एका प्रचंड महाकाय तुरुंगात आहेत. एखाद्याला तुरुंगात टाकणं म्हणजे त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेणं. तुरुंगाबाहेरचे लोकही मुक्त नसतात. त्यांना तुरुंगाचं भय वाटतं. अटक होण्याच्या भयापोटी स्वातंत्र्य गमवावंच लागतं. मी स्वेच्छेनं तुरुंगात राहतो आणि माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवतो.’
सामान्य जनता आणि सत्याग्रही यांच्यामध्ये फक्त तुरुंगाचे लोखंडी गज असतात. त्या गजांकडे तुरुंगाबाहेरील लोकांच्या भोवती बांधलेले गज म्हणून पाहणं ही कल्पना खूपच रोमांचक वाटली होती. (Kumar Saptarshi Autobiography)
तुरुंगात जाण्याचा विचार
महात्मा गांधींचं ‘सत्याग्रह-विचार’ हे पुस्तक वाचण्यात आलं, तेव्हा त्यातील ‘माझे जीवन हेच माझे हत्यार’ हे वाक्य वाचून मनात संघर्षाच्या नव्या पद्धतीविषयी आकर्षण निर्माण झालं. एकदा केव्हा तरी सत्याग्रह करून तुरुंगात जायचं असा सुप्त विचार मनात बळावत चालला.
स्वातंत्र्य लढ्यातल्या कथा लहानपणी सहज कानावर पडत. लहानपणापासून स्वातंत्र्यसैनिक पाहत आलो. स्वातंत्र्य लढ्यातल्या आणि आमच्या पिढीतलं अंतर वीस वर्षांचं. म्हणजे फक्त एका पिढीचं. आताच्या तरुणांना स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. शिवाय त्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकाच्या वयातलं अंतर चाळीस-पन्नास वर्षांपेक्षा जास्त. आमच्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीबद्दल जेवढा जिव्हाळा वाटतो, आकर्षण वाटतं, तेवढा जिव्हाळा आजच्या तरुणांना वाटणं कठीणच आहे. ते स्वाभाविकही आहे. (Kumar Saptarshi Autobiography)
महाविद्यालयीन जीवनाच्या काळात तुरुंगात जाण्याची संधी लाभेना. सत्याग्रह करून तुरुंगात जाता येईल अशी कोणतीही देशव्यापी चळवळ त्या काळात चालू नव्हती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप चालू झाली. त्याच काळात युवक क्रांती दलाची स्थापना झाली. युवकांची विद्रोही चळवळ म्हणून युक्रांदला स्वतंत्र आकार द्यायचा असं आम्ही ठरवलं होतं. राजकीय पक्षात न जाता, निवडणुका न लढवता अन्यायाविरुद्ध संघर्ष करायचा असा आमचा संकल्प होता.
सत्याग्रही संघर्षाचा संकल्प केला होता हे खरं, पण युक्रांदची स्वतंत्र अस्मिता, ओळख निर्माण व्हायची होती. स्वतंत्रपणं सत्याग्रहाची कृती आखणं जमत नव्हतं. रस्त्यावर येऊन संघर्ष करणं, तुरुंगाचा मार्ग अवलंबणं हे संघटनेतील सर्वांना मान्य नव्हतं. काही ज्येष्ठ मंडळींच्या साहचर्यामुळं असेल, संघटनेमधील बहुतेकांचा कल बिगरसंघर्षाचं विधायक काम करण्याकडे होता. काही लोकांवर मात्र आचार्य जावडेकरांच्या सत्याग्रही समाजवादाच्या विचारसरणीचा प्रभाव अधिक होता. तथापि आम्ही सत्याग्रहाच्या मानसिक प्रक्रियेमधून प्रत्यक्ष गेलेलो नव्हतो. त्या मुशीमधून स्वतःला अन् कार्यकर्त्यांना नेलं पाहिजे असं प्रकर्षानं वाटत होतं.

