मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅस वाहतूक करणारा टँकरचा अपघात झाल्याने १८ तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातातील टँकरमधून ज्वलनशील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरू आहे. तरीही वाहतूक सुरळीत होण्यास चार ते पाच तासांचा कालावधी लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहतूक ठप्प झाल्याने महिला, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृध्दांचे प्रचंड हाल झाले आहेत. (Traffic was halted for 18 hours on the Pune-Mumbai Express Highway)
हायवेवर २५ किलोमीटरच्या रांगा
मंगळवारी तीन फेब्रुवारीला सायंकाळी खोपोलीजवळी आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. अपघातानंतर गॅसची गळती सुरू झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. एक्सप्रेस हायवे बंद झाल्याने जुना मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक सुरू झाली. पण त्या मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली. सुमारे २५ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी मुंबई पुणे महामार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबई आगारातून बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्याकडे एसटी बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. सुमारे १२० हून अधिक बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. खासगी प्रवासी बसेस, मालवाहतूक करणारी वाहने, कार या मार्गावर अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. महामार्गावरील गावातील कार्यकर्त्यांनी पाणी आणि खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात येत आहे. (Traffic was halted for 18 hours on the Pune-Mumbai Express Highway)
प्रवाशांची प्रशासनावर टीका
वाहतूक कोंडीने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. पोलीस प्रशासन आणि आयआरबी कंपनीवर प्रवाशांकडून टीका होत आहे. अशा घटना सातत्याने घडत असताना प्रशासन कोणतीच काळजी घेत नसल्याचा आरोप होत आहे. अवजड वाहतूक करणारी वाहने विशिष्ट लेनवरुन प्रवास करण्याचे टाळत असूनही पोलिस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Traffic was halted for 18 hours on the Pune-Mumbai Express Highway)