Home » Blog » ३६५ धावा, ६ षटकार, तीन प्रकारची गोलंदाजी वगैरे

३६५ धावा, ६ षटकार, तीन प्रकारची गोलंदाजी वगैरे

सर गॅरी सोबर्स : सर्वकालीन महान क्रिकेटपटू

0 comments

क्रिकेटच्या इतिहासातील सार्वकालिक महान खेळाडू म्हणून ओळखले जाणारे वेस्ट इंडिजचे सर गारफिल्ड सोबर्स (वय ८९) यांचे निधन झाले. क्रिकेट विश्वात सर गॅरी सोबर्स म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीसंदर्भातील अनेक संस्मरणीय आठवणींना उजाळा मिळाला. (Garry Sobers all time great cricketer)

३६५ धावा नाबाद : विक्रमांची सुरुवात

१९५८ मध्ये अवघ्या २१ वर्षांच्या गॅरी सोबर्स यांनी पाकिस्तानविरुद्ध किंग्स्टन कसोटीत केलेली खेळी आजही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम डावांपैकी एक मानली जाते. ते ३६५ धावांवर नाबाद राहिले आणि लेन हट्टन यांचा ३६४ धावांचा जागतिक कसोटी विक्रम मोडला. या खेळीचे वैशिष्ट्य केवळ धावांची संख्या नव्हती, तर एका तरुण फलंदाजाने दाखवलेला संयम आणि मानसिक ताकद होती. हा विक्रम तब्बल ३६ वर्षे अबाधित राहिला. अखेर १९९४ मध्ये त्यांच्याच देशाच्या ब्रायन लाराने ३७५ धावा करून तो मोडला.

एका षटकात सहा षटकार

१९६८ मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना गॅरी सोबर्स यांनी ग्लॅमॉर्गनचा डावखुरा गोलंदाज मॅल्कम नॅश याच्या एका षटकातील सर्व सहा चेंडूंवर षटकार ठोकले. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सहा षटकार मारणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले. (Garry Sobers all time great cricketer)

सहाव्या चेंडूवर सीमारेषेवर झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू हातात घेऊन सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे तोही षटकारच ठरला. हा प्रसंग क्रिकेटमधील दंतकथांपैकी एक बनला.

अष्टपैलू

सोबर्स यांना केवळ महान फलंदाज नव्हते, तर वेगवान-मध्यमगती गोलंदाजीही करत. डावखुरी फिरकी गोलंदाजी टाकू शकत आणि मनगटी ‘चायनामन’ फिरकीही तेवढ्याच प्रभावीपणे टाकत. अनेकदा ते सामन्याच्या परिस्थितीनुसार एकाच सामन्यात गोलंदाजीची शैली बदलत असत. याशिवाय ते स्लिपमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षक होते.

धाडसी निर्णयाचा फटका

१९६८ मध्ये वेस्ट इंडिजचे कर्णधार असताना पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत त्यांनी इंग्लंडसमोर विजयासाठी सहज गाठता येईल असे लक्ष्य ठेवून डाव घोषित केला. सामना बरोबरीत सोडण्यापेक्षा निकाल लागावा, हा त्यामागचा दृष्टिकोन होता. मात्र इंग्लंडने लक्ष्य गाठले आणि सामना जिंकला. या निर्णयामुळे सोबर्स यांच्यावर वेस्ट इंडिजमध्ये मोठी टीका झाली. आजही हा निर्णय क्रिकेटमधील सर्वात धाडसी कर्णधाराच्या निर्णयांपैकी एक मानला जातो.

१९७५ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना ‘नाईटहूड’ बहाल केले. विशेष म्हणजे हा सन्मान बकिंगहॅम पॅलेसमध्ये नव्हे, तर बार्बाडोसमध्येच देण्यात आला. देशासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा तो दुर्मीळ गौरव मानला जातो. (Garry Sobers all time great cricketer)

आयुष्यभराची वेदना

१९५९ मध्ये झालेल्या कार अपघातात त्यांचे जिवलग मित्र आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू कॉली स्मिथ यांचा मृत्यू झाला. त्या वेळी गाडी सोबर्स चालवत होते. नंतर आत्मचरित्रात त्यांनी लिहिले की, “लोक मला ग्रेट खेळाडू म्हणतात; पण कॉली ग्रेटेस्ट खेळाडू होता. मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरलो, तेव्हा तो माझ्यासोबत खेळत असल्याची भावना माझ्या मनात कायम होती.”

ब्रॅडमन आणि सोबर्स : परस्पर आदराचे नाते

डॉन ब्रॅडमन आणि गॅरी सोबर्स यांच्यात कधीच प्रत्यक्ष स्पर्धा झाली नाही. ब्रॅडमन १९४८ मध्ये निवृत्त झाले, तर सोबर्स यांनी १९५४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

हेही वाचाः मेस्सीः आमच्या स्वप्नभूमीचा नागरिक

तरीही दोघांमध्ये विलक्षण परस्पर आदराचे नाते होते. ब्रॅडमन यांनी सोबर्स यांना “फाइव्ह-इन-वन क्रिकेटर” असे संबोधले. त्यांच्या मते, एका खेळाडूमध्ये पाच भूमिका होत्या—फलंदाज, तीन प्रकारचे गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. (Garry Sobers all time great cricketer)

१९७१-७२ मध्ये मेलबर्न येथे ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सोबर्स यांनी केलेल्या २५४ धावांच्या खेळीबद्दल ब्रॅडमन म्हणाले होते, “ऑस्ट्रेलियात मी पाहिलेल्या सर्वोत्तम डावांपैकी हा एक आहे.” याच मालिकेत त्यांच्या १३२ धावांच्या खेळीने प्रभावित होऊन ब्रॅडमन यांनीच त्यांना ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.

जीवनाच्या उत्तरार्धात ब्रॅडमन यांनी सोबर्स यांच्याबद्दल सर्वोच्च गौरवोद्गार काढले. त्यांच्या मते, “गॅरी सोबर्स हे सर्वकालीन महान क्रिकेटपटू आहेत.”

क्रिकेटचे दोन सर्वोच्च मानदंड

क्रिकेट तज्ज्ञांच्या मते विसाव्या शतकातील सर्वात महान क्रिकेटपटूंमध्ये दोन नावे अग्रस्थानी घेतली जातात—सर डॉन ब्रॅडमन आणि सर गॅरी सोबर्स.

१९९९ मध्ये विस्डेनने घेतलेल्या “शतकातील पाच महान क्रिकेटपटू” या मतदानात ब्रॅडमन यांना १०० मते मिळाली, तर सोबर्स यांना ९० मते मिळाली. इतर सर्व क्रिकेटपटूंना यापेक्षा कमी मते मिळाली. हा सन्मानच गॅरी सोबर्स यांच्या क्रिकेटमधील अद्वितीय स्थानाची साक्ष देतो. त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेची तुलना आजही कोणाशीच करता येत नाही.

सोबर्स कधी मरत नाहीत

ज्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये ४० पेक्षा जास्त सरासरी असामान्य मानली जायची, त्या काळात सोबर्स यांची सरासरी होती तब्बल ५७. त्यांच्या नावावर २६ शतके, आठ हजारांहून अधिक धावा होत्या. त्यांनी २३५ बळी घेतले आणि १०९ झेलही पकडले. (Garry Sobers all time great cricketer)

तो काळच वेगळा होता. कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा आणि दोनशे बळींचा दुहेरी टप्पा गाठणे ही कोणत्याही अष्टपैलू खेळाडूसाठी महान कामगिरी समजली जायची. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात बॉथम, कपिल देव, इम्रान खान आणि रिचर्ड हॅडली ही महान अष्टपैलू चौकडी येण्यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा आणि दोनशे बळी हा जादुई टप्पा गाठणारे फक्त दोनच खेळाडू होते. एक रिची बेनॉ आणि दुसरे गॅरी सोबर्स.

हेही वाचाः Sunil Gavaskar : सुनील गावस्करांनी पंतप्रधानांना भेटण्याचे टाळले

असेही सांगितले जाते की, एखादा फलंदाज नव्वदीत खेळत असेल, तर वेस्ट इंडिजचे कर्णधार असताना सोबर्स स्वतः गोलंदाजीसाठी येत आणि समोरच्या फलंदाजाने शतक पूर्ण करावे, अशीच त्यांची मनापासून इच्छा असे.

काही माणसे शरीराने जातात, पण त्यांच्या आठवणी, त्यांची कर्तृत्वगाथा आणि त्यांच्याभोवती निर्माण झालेल्या दंतकथा कधीच मरत नाहीत. गॅरी सोबर्स हे त्यापैकीच एक. ते कधी मरत नाहीत.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!