कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला माहितीपट १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डॉ गोपाळ गुरू, डॉ माया पंडित, प्रा निसर्गगंध आणि डॉ भारत पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सोमनाथ वाघमारे यांनी दिग्दर्शित केलेला ‘गेल अन्ड भारत’ हा माहितीपट ८० मिनिटांचा असून मराठी आणि इंगजी दोन्ही भाषेत तयार केला आहे.
अमेरिकन–जन्माची भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि दलित हक्कांची कार्यकर्ती प्रा. गेल ओम्वेट (१९४१–२०२१) आणि त्यांचे साथीदार, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट आहे. चित्रपटात अवघड शैक्षणिक भाषा टाळून त्यांच्या वैयक्तिक जीवनकथेवर भर दिला आहे आणि त्याच बरोबर भारतातील व्यापक सामाजिक राजकीय चळवळींची पार्श्वभूमीही जिवंत होते. (Gail Omvedt, Bharat Patankar documentary)
भारतातील अस्पृश्यता–विरोधी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यांचे सखोल दस्तऐवजीकरण फारसे उपलब्ध नसताना हा चित्रपट त्यांचे काम पुढील पिढ्यांसाठी जतन करणारा एक महत्त्वाचा दुवा ठरतो. हा माहितीपट विचार करायला लावणारा असून गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या अनेक दशकांच्या कार्य आणि योगदानाचा सुंदर मागोवा घेते. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट यूके आणि युरोपमधील अनेक ठिकाणी माहितीपट प्रदर्शित झाला आहे. त्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स , ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लीड्स युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स, लीसेस्टर सेक्युलर सोसायटी, पेन्शन हाऊस, लंडन यांचा समावेश आहे. याशिवाय जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ हायडेलबर्ग, सबकॉन्टिनेंट बर्लिन आणि नेदरलँड्समधील लाईडन युनिव्हर्सिटी येथेही हा चित्रपट दाखवण्यात आला.आणखी एक विशेष बाब म्हणजे हा चित्रपट आता दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या कला महोत्सव कोची बिएनालेमध्येही प्रदर्शित होणार आहे. (Gail Omvedt, Bharat Patankar documentary)
कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील चळवळीतील कार्यकर्त्यांनी, युवक युवतीनी, संशोधक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संपत देसाई, डी. के. बोडके, मारुती पाटील यांनी केले आहे.