Home » Blog » मराठी माणसांची वज्रमूठ टिकवण्याचे ठाकरे बंधूंपुढे आव्हान

मराठी माणसांची वज्रमूठ टिकवण्याचे ठाकरे बंधूंपुढे आव्हान

by प्रतिनिधी
0 comments
A challenge for the Thackeray brothers

मुंबई महापालिकेवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीची सत्ता आली असली तरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीला मिळालेले यश मुंबईतील मराठी माणसांच्या एकीचे दर्शन घडवते. मुंबईतला मराठी माणूस ठाकरे बंधूंच्या मागे खंबीरपणे उभा आहेआणि महापालिकेवरील सत्ता गेली तरी मुंबईत मराठी माणसाला डावलता येणार नाहीअसा संदेश या निवडणुकीने दिला आहे. मात्र मराठी माणसांची वज्रमूठ टिकवण्याचे आव्हान भविष्यात ठाकरे बंधूंपुढे राहील.

विजय चोरमारे

ठाकरे बंधूंमुळे आशा पल्लवीत

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईच्या आर्थिक साम्राज्यामध्ये मराठी माणसाचा फारसा सहभाग नाही. असे असले तरी मुंबई महापालिकेची सत्ता दीर्घकाळ शिवसेनेकडे होती. २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळीही भाजपने जोरदार मुसंडी मारली होती, मात्र सत्ता शिवसेनेनेच मिळवली. त्यामुळे यावेळची महापालिका निवडणूक शिवसेनेला जड जाणार हे नक्की होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पन्नासहून अधिक नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून गेले. अशा परिस्थिती उद्धव आण राज ठाकरे एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला, त्याविरोधात ठाकरे बंधू जुलैमध्ये एकत्र आले. मात्र प्रत्यक्ष राजकीय युती जाहीर करण्यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी घेतला. त्याचाही काहीएक परिणाम झाला असण्याची शक्यता व्यक्त होते. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणूस एकवटला आणि तो या दोघांच्यामागे उभा राहिला, हे निकालातून दिसून आले. (A challenge for the Thackeray brothers)

मराठी माणसांची सत्ता संपुष्टात

या निकालामुळे मुंबईवरील मराठी माणसाची सत्ता संपुष्टात आली आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनामुळे त्यांना महापौर मराठीच करावा लागेल. परंतु त्याचे नियंत्रण नेमके कुणाकडे असेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे. राज्यातील भाजपच्या यशाचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देणे स्वाभाविक आहे. परंतु मुंबईतील यशाचे शिल्पकार म्हणून माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे नाव घ्यावे लागेल. अमित साटम हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असले तरी त्यांना मुंबई शहराचा तेवढा आवाका नाही. अलीकडच्या काळात त्यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. त्याआधी शेलार यांनी मुंबईचे अध्यक्ष असताना संघटनात्मक बांधणी केली होती. आणि निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांच्यावरच होती. उमेदवारी देतानाही प्रभागनिहाय गणिते जमवण्यात त्यांचाच प्रमुख सहभाग होता. त्यामुळे भाजपच्या यशामागे आशिष शेलार हा मराठी चेहराच आहे. ठाकरे बंधूंना मिळालेले यश पुरेसे आहे का, किंवा त्यांना अपेक्षित यश का मिळाले नाही असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जातो. (A challenge for the Thackeray brothers)

भावनिक मुद्द्याच्या मर्यादा

कोणत्याही निवडणुकीत भावनिक मुद्द्यावर वातावरण निर्माण करता येते. परंतु भावनिक मुद्द्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. विशेषतः जिथे मतदार हे जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या मुद्द्यावर विभागले आहेत अशा ठिकाणी. मुंबईत भाषिक मुद्द्यावर मतदारांच्यात विभागणी झाली होती. मराठी विरुद्ध अमराठी असे चित्र निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत ठाकरे बंधूंना मुंबईत विजय मिळणे कठीण होते. कारण मुंबईत मराठी मतांचा टक्का सुमारे तीस ते पस्तीसच्या आसपास आहे. त्यातले शंभर टक्के मतदार ठाकरे बंधूंच्या मागे येणार नाहीत. त्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेस यांच्याकडेही काही मतदार जाऊ शकतात. त्यामुळे कितीही ध्रुवीकरण झाले तरी पंचवीस टक्क्यांहून अधिक मतदार ठाकरे बंधूंच्या मागे येऊ शकत नाही. एवढ्या मतदारांच्या बळावर निवडणूक ताकदीने लढवता येऊ शकते, परंतु यशाला गवसणी घालणे कठीण असते.

बेरजेच्या राजकारणाकडे दुर्लक्ष

निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेले बेरजेचे राजकारण करायला हवे होते, ते ठाकरे बंधूंनी केले नाही. त्यातला पहिला सेल्फ गोल केला तो दाक्षिणात्य मतदारांच्याबाबतीत. तमिळनाडूचे भाजपचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईत येऊन मुंबई ही महाराष्ट्राची नसल्याचे विधान केले. ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवरची सभा त्याच एका मुद्दयावर गाजली. ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ या जुन्या घोषणेचा उच्चार करण्यात आला. खरेतर मुंबईतला दाक्षिणात्य मतदार हा पारंपरिक भाजपचा मतदार कधीच नव्हता. त्याची बेरीज ठाकरे बंधूंनी करायला हवी होती, परंतु त्याची वजाबाकी केली. (A challenge for the Thackeray brothers)

उद्धव ठाकरे यांचा २०१९ नंतर दिल्लीच्या राजकारणात वावर सुरू झाला आहे. इंडिया आघाडीच्या निमित्ताने विरोधी पक्षाच्या नेत्यांशी त्यांचा संवाद, संपर्क सुरू झाला होता. मुंबई महापालिका ही जर त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती, तर त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील संपर्काचा उपयोग करून घ्यायला हवा होता. काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून रणनीती ठरवायला हवी होती. अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासारख्या नेत्यांना मुंबईत आणून उत्तर भारतीय मतदारांसाठी प्रयत्न करायला हवे होते. राहुल गांधींच्या संबंधांचा उपयोग करून काँग्रेसशी आघाडी नसली तरी मैत्रीपूर्ण लढती व्हायला हव्या होत्या. परंतु यापैकी काहीच घडलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे यांचा भरवसा मुस्लिम मतदारांवर होता. तोही अपेक्षित प्रमाणात त्यांच्याकडे आलेला दिसत नाही. इथेही भाजपची रणनीती लक्षात घ्यावी लागेल. नवाब मलिक यांचे नाव पुढे करून भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवले. त्यामागे उद्धव ठाकरेंकडे जाणारी मुस्लिम मते काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे वळवण्याची रणनीती होती.

रणनीती विरुद्ध भावनिक मुद्दा

एकूण चित्र पाहिले तर भाजप रणनीतीवर निवडणूक लढत होता आणि ठाकरे बंधू भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढत होते. ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आले असते तर चित्र वेगळे असते का? नक्कीच चित्र वेगळे असते. परंतु मुंबईत मराठी माणसांची जी वज्रमूठ दिसली, ती दिसली नसती.या निवडणुकीने काही मुद्दे समोर आले आहेत.

मुंबई महापालिकेवरील मराठी माणसांचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे चित्र यामुळे उभे केले जात असले तरी मुंबईच्या राजकारण, समाजकारणात मराठी माणसाचा आवाज आधीसारखाच बुलंद राहील. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल. मुंबईतल्या मराठी माणसांचे अस्तित्व स्वाभिमानाने टिकवायचे असेल तर ठाकरे बंधूंना भविष्यातही एकत्र राहावे लागेल.

भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाकडे खूप बारकाईने पाहावे लागेल. देशात इतरत्र आपल्याला मुस्लिम मतांची गरज नाही, हे भाजपने दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत आम्हाला मराठी मतांची गरज नाही असा उर्मटपणा भाजपच्या नेतृत्वाकडे येऊ शकतो.

मुंबईतल्या मराठी माणसांच्या चळवळी संपल्या. राजकीय नेतृत्वाने नियोजनबद्धरीतीने त्या संपवल्या. त्याचा फटका मुंबईतल्या मराठी अस्तित्वाला बसत आहे. गिरणी कामगार आणि इतर कामगार संघटना होत्या तोपर्यंत मराठी माणसांमध्ये आत्मविश्वास होता. शिवसेनेने राजकीय सत्तेच्या माध्यमातून हा आत्मविश्वास टिकवून ठेवला. तो डळमळीत होण्याची शक्यता आहे. तो डळमळीत होऊ नये, यासाठी एकीची वज्रमूठ कायम ठेवण्याचे आव्हान ठाकरे बंधूंपुढे असेल.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00