- विजय चोरमारे
“एका शब्दानं… देशातील बेरोजगार तरुण पेटून उठू शकतात का? एका मीममधून… चळवळ निर्माण होऊ शकते का? आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणा-या गोष्टीतून रस्त्यावरचं जनआंदोलन उभं राहू शकतं का? असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांत उभे राहिले होते. गेल्या काही आठवड्यांपासून देशभर चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या संदर्भानं होणा-या या चर्चेत अनेक मतमतांतरेही होती. या कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP च्या पहिल्या आंदोलनानं कॉक्रोच जनता पार्टीचा फुगा फुटलाय का? कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला शो फ्लॉप झालाय का? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एक नाव अचानक प्रचंड व्हायरल झालं-
कॉक्रोच जनता पार्टी. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)
काही लोकांना हा विनोद वाटला…काहींना हा तरुणांच्या संतापाचा उद्रेक वाटला. तर काहींनी याकडं देशातील बेरोजगार तरुणांच्या नव्या बंडाची सुरुवात म्हणून पाहिलं. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)
ही संपूर्ण कथा सुरू झाली सर्वोच्च न्यायालयातील एका चर्चेनंतर. बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा आणि तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणजे झुरळ संबोधल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. सामान्यतः अपमानास्पद मानला जाणारा “कॉक्रोच” हा शब्द काही तरुणांनी उलट प्रतिकाराचं प्रतीक बनवला. आठवत असेल, राहुल गांधींनी चौकीदार चोर है ची घोषणा दिली, त्यावर नरेंद्र मोदी समर्थकांनी मै भी चौकीदार मोहीम चालवली होती. तसंच इथं घडलं. आणि सरन्यायाधीशांच्या वक्तव्यातून पुढे आली — कॉक्रोच जनता पार्टी.
हा पारंपरिक अर्थानं राजकीय पक्ष नव्हता. ना तिच्याकडे मोठे नेते होते. ना कार्यालयं. ना निवडणूक चिन्ह. पण तिच्याकडे होतं, सोशल मीडियाचं प्रचंड नेटवर्क आणि जोडीला बेरोजगार तरुणांचा संताप.
आजची पिढी रस्त्यावर उतरण्याआधी इंस्टाग्रामवर उतरते. पूर्वी आंदोलनं सभा-मोर्च्यांतून उभी राहत होती. आता आंदोलनं मीम्स, रील्स आणि हॅशटॅगमधून जन्म घेतात. CJP ने हाच फॉर्म्युला वापरला. त्यांनी गंभीर राजकीय भाषेऐवजी उपरोध वापरला. मीम्स वापरले. विडंबन वापरलं. “जर व्यवस्था आम्हाला कॉक्रोच समजत असेल… तर आम्हीच कॉक्रोच!” हा संदेश तरुणांमध्ये झपाट्याने पसरला. विशेषतः स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, पेपरफुटीमुळे त्रस्त तरुण, भरती प्रक्रियेत अडकलेले उमेदवार — हे मोठ्या प्रमाणावर या मोहिमेशी जोडले गेले.
CJP एवढी व्हायरल झाली-
यामागे तीन मोठी कारणं दिसतात.
१) बेरोजगारीचा गंभीर प्रश्न, २) पेपरफुटी तसेच परीक्षा व्यवस्थेवरील अविश्वास आणि ३) पारंपरिक राजकारणाकडून झालेली निराशा. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)

कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरचे निर्बंध, तिचा संस्थापक अभिजीत दीपके याला दिल्या गेलेल्या धमक्या यामुळंही तिची चर्चा वाढली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आतापर्यंत इतक्या वेगानं कुणाचेही फॉलोअर्स वाढले नव्हते. पाच दिवसांत दोन कोटी फॉलोअर्स ही कुणालाही अचंबित करणारी बाब होती. त्यामुळंच सगळे माध्यमकर्मी, विशेषतः यूट्यूबर्स वगैरे अभिजीत दीपकेच्या मुलाखतींच्या मागे लागले. देशभरातील अनेक पत्रकार, समाजसेवकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. या सगळ्याचा अविष्कार म्हणजे ६ जून रोजीचं दिल्लीच्या जंतर-मंतरवरचं आंदोलन. त्याबाबत देशभरातच नव्हे तर जगभरात उत्सुकता होती. पण प्रत्यक्षात हा फ्लॉप शो ठरला असं म्हणावं लागेल.
मी व्यक्तिशः कॉक्रोच जनता पार्टी आणि तिच्या वाटचालीबाबत आधीपासून साशंक होतो. गेली चाळीस वर्षे गाव पातळीपासून देशपातळीपर्यंतची अनेक आंदोलनं बघितलीत. त्यांची ताकद बघितलीय. अनेक आंदोलनांचा परमोच्च बिंदू बघितलाय. मोठ्या आंदोलनांचा फज्जा कसा उडाला हेही पाहिलंय. अण्णा हजारेंचं आंदोलन टिपेला असतानाही जवळून बघितलंय. आणि त्याची वेगानं झालेली घसरणही बघितलीय. त्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीची वाटचाल सुरुवातीपासून काळजीपूर्वक पाहात होतो. त्याबद्दल आजपर्यंत मी एक ओळीचीही टिपणी केली नाही. कारण याबाबत बोलणारे एकतर बाजूने बोलत होते नाहीतर विरोधात. दोन्ही बाजू कुणी कुणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. मी तटस्थ निरीक्षक म्हणून त्याकडं पाहात होतो.
सहा जूनचा कार्यक्रम महत्त्वाचा होता कारण…
आतापर्यंत CJP फक्त सोशल मीडियावर दिसत होती.
पण दिल्लीतील आंदोलनाने प्रश्न निर्माण केला — “ही फक्त इंटरनेटवरील हवा आहे की प्रत्यक्ष जनआंदोलन?” कार्यक्रमात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि विविध राज्यांतून आलेले तरुण सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. ते सगळं आपण टीव्हीवर, सोशल मीडियावर पाहिलं.
दिल्लीतल्या आंदोलनाचा पहिला शो फ्लॉप झाला असं म्हणता येतं. कारण सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स…पण मैदानात तुलनेनं गर्दी खूपच कमी होती. काही शेकडा तरुण होते. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)
यामागे अर्थात काही कारणं होती:
डिजिटल सपोर्ट आणि प्रत्यक्ष संघटन यात फरक असतो. आंदोलन अचानक उभं राहिलं. देशभरातील तरुणांना दिल्लीत आणणं कठीण होतं आणि नियोजनाच्या मर्यादा होत्या. याचा अर्थ ही संपूर्ण चळवळ फसली असं मी म्हणणार नाही. संबंधितांना ही चळवळ खरंच पुढं न्यायची आहे की, ट्रेंडिंगच्या लाटेवर स्वार होऊन हवा करायची आहे, हे स्पष्ट व्हायला वेळ लागणार आहे.
एका नव्या डिजिटल चळवळीनं लाखो तरुणांना एकत्र आणलं. पण त्यांना रस्त्यावर उतरवण्यासाठी पुरेसं नियोजन आणि संघटन नव्हतं, हे इथं लक्षात घ्यावं लागेल.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे, ही चळवळ पुढे टिकणार का? कारण सोशल मीडिया ट्रेंड फार काळ टिकत नाहीत.
CJP ला पुढे टिकायचं असेल तर: संघटन उभं करावं लागेल. ठोस नेतृत्व द्यावं लागेल. केवळ मीम नव्हे तर धोरणात्मक भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा ही चळवळ काही दिवसांची इंटरनेट सेन्सेशन ठरू शकते. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)
कॉक्रोच जनता पार्टी हा आजच्या तरुणांच्या मनातील नैराश्य आणि संतापाचा अविष्कार आहे, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. ही चळवळ यशस्वी होईल की नाही हे भविष्यात कळेल, पण एक गोष्ट निश्चित आहे— भारतामध्ये आता राजकारण मीम्स, रील्स आणि हॅशटॅगच्या माध्यमातूनही करता येऊ शकतं.
अण्णा आंदोलनाशी तुलना
सर्वात महत्त्वाचा मुद्दा. या आंदोलनाची तुलना सातत्यानं अण्णा हजारेंच्या २०११ मधील आंदोलनाशी केली जात होती. काहीही नवीन वाजायला लागलं की त्याच्यामागं धावत जाणारा एक मोठा वर्ग देशात आहे. पिढ्या बदलल्या तरी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून ते कॉक्रोच जनता पार्टीपर्यंत अनेकांच्या मागे धावत जाणारा हा वर्ग एकच आहे.
अवघ्या पाच दिवसांत दोन कोटी फॉलोअर्समुळे अनेकांना कॉक्रोच जनता पार्टीमध्ये अण्णा आंदोलन दिसत होतं. कुठलंही जनआंदोलन लोकशाही मजबूत करीत असतं, त्यामुळं अनेकजण याकडं आशेनं पाहात होते. पण ज्यांनी अनेक आंदोलनं पाहिलीत त्यांना कळत होतं, की अशा रितीनं चळवळ उभी राहात नाही. भावनिक लाटेवर स्वार होऊन एका मेणबत्ती मोर्चाला हजारो लोक येऊ शकतील. पण सातत्यपूर्ण चळवळीत तसे पाठबळ मिळत नाही.
कॉक्रोच जनता पार्टीची सगळी हवा सोशल मीडियावरच होती. पार्टीनं जे प्रवक्ते नेमले होते, त्यांचाही रस्त्यावरच्या लढाईचा, सामाजिक आंदोलनांचा असा काही अनुभव दिसत नव्हता. आणि जे अभिजीत दीपके अमेरिकेतून माध्यमांना मुलाखती देत होते, ते विमानातून उतरून थेट आंदोलन स्थळी आले. अशा रितीनं आंदोलन उभं राहात नाही.
अण्णा आंदोलनाचे सूत्रधार होते अरविंद केजरीवाल. सामाजिक क्षेत्रातला मोठा अनुभव होता. मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देशभरातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा पाठिंबा मिळवला होता. त्या काळात नैतिक अधिष्ठान असलेला अण्णांचा चेहरा आंदोलनासाठी उभा केला होता.
डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं-
त्यामुळं माध्यमं मुक्त होती. टीव्ही चॅनल्सवर सरकारचा दबाव नव्हता. त्यामुळं सगळ्या चॅनल्सनी चोवीस तास आंदोलनाच्या बातम्या चालवल्या. सरकारविरोधात मोहीम चालवली. आंदोलन सुरू करण्याआधी देशभरात वातावरण निर्मिती केली होतीच. त्यातून परिवर्तन घडलं होतं. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)
कॉक्रोच जनता पार्टीकडं सोशल मीडियावरच्या समर्थकांखेरीज काहीच नव्हतं. अण्णा आंदोलनाच्या तुलनेत पाच टक्केही तयारी नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की तरुणांच्या संतापातून उभं राहिलेलं एक आंदोलन उभं राहण्याआधीच कोसळताना दिसलं. प्रत्यक्ष मैदानात फुग्याला टाचणी लागली. फुगा फुटला.
तरुणांच्यात मोठी नाराजी आहे, संताप आहे ही गोष्ट या आंदोलनानं चव्हाट्यावर आणली. तेच सूत्र पुढं नेऊन नीट संघटनात्मक बांधणी केली असती तर वेगळं चित्र दिसलं असतं. अर्थात अजूनही संघटनात्मक बांधणीकडं लक्ष दिलं तर भविष्यात आंदोलन उभं राहू शकतं. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी अशा आंदोलनाची गरज आहे. परंतु कॉक्रोच जनता पार्टीतील अननुभवी लोकांकडून ते होईल याबाबत शंका वाटते. (Cockroach Janta Party protest @ Jantar Mantar)
आतापर्यंत विषय ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीला प्रसिद्धी मिळाली. ही हवा ओसरल्यानंतर पर्यायी माध्यमंही त्याला किती महत्त्व देतील हा प्रश्न आहेच.