जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे दुःखद निधन ही भारतीय पर्यावरण क्षेत्रासाठी कधीही न भरुन येणारी हानी आहे. गाडगीळ सर सदैव समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांचा आदर करणारे दुर्मिळ निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ होते. ते या बाबत त्यांच्या बालपणीची एक आठवण नेहमी सांगत असत. ती अशी आहे. महाराष्ट्रातील एका जलविद्युत प्रकल्पाला त्यांनी बालवयात आपल्या वडिलांसोबत भेट दिली होती. त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू होती. भारत कोणती किंमत मोजून विकास करत आहे, यावर त्यांचे वडील,जे भारताचे एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ होते, ते माधवला म्हणाले ‘आपल्याला वीज हवी आहे, भारताला औद्योगिक प्रगती करायची आहे. पण त्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिक लोकांचे दुःख ही किंमत आपण मोजायला हवी का? त्यांच्यामुळे लोकांबद्दलची संवेदनशीलता आणि निसर्ग प्रेम माझ्या मनात अगदी लहानपणीच रुजले.”
लक्ष्मीकांत देशमुख
अशा अनुभवांनी गाडगीळ यांच्या पर्यावरणविषयक दृष्टिकोनाला आकार मिळाला. सहा दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या वैज्ञानिक कारकीर्दीत हार्वर्ड विद्यापीठापासून ते भारत सरकारच्या सर्वोच्च धोरणात्मक स्तरांपर्यंत, ते स्वतःला नेहमीच “लोकांचा वैज्ञानिक” मानत आले आहेत. त्यांच्या संशोधनामुळे वंचित समुदायांचे रक्षण झाले, जंगलांपासून ते दलदलीपर्यंत परिसंस्थांच्या ( Ecosystem ) समुदाय आधारित संवर्धनास चालना मिळाली आणि सर्वोच्च पातळीवरील धोरणनिर्मितीवर प्रभाव पडला.
माधव गाडगीळांनी सात पुस्तके आणि किमान २२५ वैज्ञानिक संशोधन लेख लिहिले. पण त्यांचे सर्वोत्तम लेखन म्हणजे पश्चिम घाट अहवाल ( Gadgil Report) होय. या अहवालात औद्योगिक विकास आणि हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील पश्चिम घाट पर्वत रांगांचे संरक्षण करण्यासाथी अनेक ठोस शिफारशी केल्या होत्या. पण त्या कस्तुरीरंगन समिती नेमून बऱ्याच शिथिल केल्या. पण त्याकडेही दुर्लक्ष करीत पर्यावरणाचा बळी घेत भ्रामक विकास बेगुमानपणे होत आहे. त्याची फार मोठी किंमत आपणास भविष्यात चुकवावी लागणार आहे. नव्हे, आज चुकवावी लागत आहे. (True lover of the Western Ghats)
या संदर्भात माझी एक आठवण आहे. २०१० ला मी कोल्हापूरला जिल्हाधिकारी होतो. तेंव्हा गाडगीळ सरांना स्थानिक लोकांचे पश्चिम घाट जैवविविधता बाबत प्रबोधन करण्यासाठी मी आमंत्रित केले होते. तेंव्हा त्यांनी अत्यंत सुबोध मराठी भाषेत उपस्थित्यांच्या सर्व शंका कुशकांचे निरसन केले. हा माझ्यासाठी सरांचा पर्यावरणावरचा मास्टर क्लास होता. आजही तो माझ्या स्मरणात आहे
माधव गाडगीळ यांना त्यांच्या पर्यावरण क्षेततील अतुलनीय कामाबद्दल २०२४ ला ” चॅम्पियन्स ऑफ द अर्थ ” हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान ( Lifetime Achievement Award ) या वर्गात प्रदान करण्यात आला. ते २०२४ सालच्या सहा मान्यवर पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये एक होते . त्यांच्या योगदानबद्दल संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक इंगर अँडरसन म्हणाले होते, “निसर्गाचा होत असलेला भीषण ऱ्हास थांबवण्यासाठी विज्ञान आपल्याला कसे उपयोगी सिद्ध होते, हे माधव गाडगीळ यांनी दशकानुदशके दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याने निसर्ग संवर्धनाला चालना मिळाली असून लोकांच्या ज्ञानाचा आणि सहभागाचा सखोल आदरही त्यांनी अधोरेखित केला आहे.” (True lover of the Western Ghats)
आज भारताच्या जवळपास एकतृतीयांश भूभागाची गुणवत्ता घसरली आहे, ज्यामुळे अनेक वर्गसमुहांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. २०२४ मध्ये केरळ राज्यात झालेल्या भूस्खलनात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही त्या भागातील अलीकडच्या वर्षांतील भीषण आपत्तींपैकी एक होती. वैज्ञानिकांच्या जागतिक गटाच्या अहवालानुसार, या भूस्खलनास कारणीभूत ठरलेला अतिवृष्टीचा प्रकार मानवनिर्मित हवामान बदलामुळे अधिक तीव्र झाला आहे तसेच दगडखाणी आणि जंगलतोड यांमुळे उतार कमकुवत झाले आहेत.
२०११ मध्येच गाडगीळ अहवालाने पश्चिम घाटातील अनियंत्रित विकासाच्या दुष्परिणामांबाबत स्पष्ट इशारा दिला होता. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने नेमलेल्या गाडगीळ समितीने पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांची ओळख करून देऊन विकास हा “पर्यावरणपूरक आणि लोककेंद्रित” असावा, अशी शिफारस केली होती. या अहवालामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि माध्यमांचे लक्ष वेधले गेले. पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देताना जागतिक वारसा समिती आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनांनीही या निष्कर्षांचा आधार घेतला होता. आजही या भागावर ताण आहे, मात्र पर्यावरण संरक्षण आणि पुनरुज्जीवनाविषयीची चर्चा अधिक व्यापक आणि समावेशक झाली असल्याचे गाडगीळ मानतात. त्यांच्या मते “समुदाय त्यांच्या जमिनीवर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरचे हक्क वापरत आहेत. ते संघटित होत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत काम केले पाहिजे. समावेशक विकास आणि संवर्धनाचा मार्ग आपण पुढे चालू ठेवला पाहिजे.” (True lover of the Western Ghats)
भारतीय विज्ञान संस्थेत (IISc) अनेक दशके कार्यरत असताना गाडगीळ यांनी वनवासी, शेतकरी, मच्छीमार, कार्यकर्ते आणि धोरणकर्त्यांसोबत जवळून काम केले. त्यांनी स्थापन केलेल्या “सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस “च्या प्रयत्नाने १९८६ मध्ये भारतातील पहिला जैवमंडल राखीव प्रदेश अस्तित्वात आला. तीन राज्यांतील पश्चिम घाट परिसरात त्यांनी पर्यावरणीय सर्वेक्षण केले. तेथील पवित्र वनांमध्ये त्यांनी स्थानिक आदिवासी समुदायांसोबत प्रवास केला, त्यांच्याशी आत्मीय संवाद साधला आणि काही काळ त्यांच्या गावात त्यांचे होऊन वास्तव्यही केले. आज निलगिरी जैवमंडल राखीव प्रदेश हा भारतातील सर्वात मोठा संरक्षित परिसर आहे. समुदाय-नेतृत्वाखालील संसाधन व्यवस्थापन आणि संवर्धन या त्यांच्या भूमिकेमुळे या भागातील जैवविविधता जपण्यास मोठी मदत झाली आहे. (True lover of the Western Ghats)
पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून तसेच विविध सरकारी समित्यांमध्ये काम करताना गाडगीळ यांनी जैवविविधता कायदा आणि वनहक्क कायदा तयार करण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. या कायद्यांमुळे स्थानिक समुदायांना त्यांच्या परिसंस्थांतील जैवविविधतेची नोंद ठेवण्यासाठी जैवविविधता नोंदवह्या तयार करता येऊ लागल्या. यामुळे बांबू, फळे, मासे आणि औषधी वनस्पतींसारख्या वनउत्पादनांचा शाश्वत वापर शक्य झाला. महाराष्ट्रातील एका गावात नदीत सोडल्या जाणाऱ्या विषारी रसायनांमुळे मासळी नष्ट होत असल्याचे आढळून आले, तेंव्हा त्यांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन ही रसायने बंद करण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केले आणि नदीतील जैवविविधता सुधारली. गाडगीळांना या कामासाठी कार्यासाठी पद्मश्री, पद्मभूषण, टायलर पर्यावरण पुरस्कार आणि व्होल्वो पर्यावरण पुरस्कार यांसारखे अनेक सन्मान मिळाले आहेत.
एका गावातील मुलाला त्यांनी वनस्पतींचे फोटो काढायला आणि स्मार्टफोनच्या साहाय्याने तिच्या प्रजाती ओळखायला शिकवले. त्या मुलाने पोस्ट केलेल्या एका दुर्मिळ ऑर्किडची नोंद शास्त्रज्ञांनी घेतली आणि त्या संशोधन लेखात त्या मुलाला सहलेखक म्हणून स्थान दिले. गाडगीळ यांचा विश्वास होता की, तंत्रज्ञान आणि मुक्त वैज्ञानिक ज्ञानामुळे अधिकाधिक समुदाय स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहतील, जे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत गरजेचे आहे. “लोकांप्रती संवेदनशील असलेला वैज्ञानिक म्हणून मी काही गोष्टी करू शकलो, ज्यामुळे घडामोडींची दिशा बदलण्यास मदत झाली, याचे मला समाधान आहे.मी एक धोकादायक आशावादी आहे आणि सुरु झालेला सकारात्मक बदल पुढेही वेग घेईल, अशी मला खात्री आहे.”
गाडगीळ सर हे १९६० च्या दशकापासून जेंव्हा संगणक अवाढव्य होते व एक पूर्ण वातानुकुलीत खोली लागायची तेंव्हापासून त्याचे अभ्यासक आहेत. ते संगणकावर मराठी लेख लिहीत असत. मराठी ज्ञानभाषा ही आयटी च्या द्वारे कशी होईल यावर त्यांचे गहन चिंतन होते. या बाबत त्यांच्या अनेकवेळा माझ्याबरोबर दीर्घ चर्चा झाल्या आहेत. त्यांची नवनवीन शिकण्याची वृत्ती शेवटपर्यंत टिकून होती. “सह्याचल आणि मी – एक प्रेमकहाणी” हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्याचे एक अनमोल लेणं ठरेल असे पुस्तक आहे. त्याच्या प्रकाशन समारंभास खास त्यांचे मित्र रामचंद्र गुहा आहे होते. तो कार्यक्रम दृष्ट लागवा एवढा सुंदर झाला होता.
माधव गाडगीळ सरांसाठी पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन इतिहासाले एक सुवर्ण पान राखीव असणार यात काही शंका नाही! आणि आयटी, एआय आणि मशिन लर्निंग आदींचा वापर करुन मराठी भाषा ज्ञानभाषा करण्याचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी गाडगीळ सर समस्त मराठी प्रेमी नागरिकांवर सोडून गेले आहेत, हे लक्षात ठेवून तुम्ही आम्ही काम केले पाहिजे. हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल!