Home » Blog » ‘संघी-राम’ आणि ‘राजाराम’ !

‘संघी-राम’ आणि ‘राजाराम’ !

by प्रतिनिधी
0 comments
  • डॉ. विवेक कोरडे

एकीकडे संसदेच्या सभागृहात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करायचे, दुसरीकडे स्वहस्ते अयोध्येतल्या राम मंदिराची धर्मध्वजा उंचवायची… एकीकडे श्रीरामाच्या सात्विक रुपाचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे समर्थकांनी रंगवलेल्या आक्रमक रामाला मूक संमती द्यायची… असा लोकशाहीच्या मुळाशी उठणारा खेळ सध्या सर्वोच्च पदावरून सुरू आहे. त्यात प्रातःस्मरणीय गांधीजींचा राम नेमका कसा होता, हे समजण्याची साधी तसदी देखील घेण्याची गरज विद्यमान नेतृत्वाला भासलेली नाही. न पेक्षा, महात्मा गांधी हे नाव जनतेच्या स्मृतितून पुसले जावे, असा अश्लाघ्य प्रयत्न राष्ट्रीय रोजगार योजनेला असलेले त्यांचे नाव वगळून केला जातो आहे… (Angry Ram and Hanuman)

‘जेव्हा लोकांना त्यांची कृती दैवी किंवा धार्मिकदृष्ट्या मंजूर आहे याची पूर्ण खात्री असते, तेव्हा ते विशेष उत्कट आणि अटळ उत्साहाने वाईट कृत्ये करण्यासाठी सिद्ध होतात, असे फ्रेंच तत्त्ववेत्ता ब्लेज पास्कल यांनी म्हटले आहे. पास्कल यांच्या या विधानाचा प्रत्यय आपण गेली अनेक वर्षे घेत आहोत. देव आणि धर्म हा जोपर्यंत मनुष्याच्या वैयक्तिक श्रद्धेचा आणि अध्यात्मिक समाधानाचा विषय असतो, तोपर्यंत फारसा नुकसानकारक नसतो.

परंतु, धर्माला जेव्हा वैयक्तिक श्रद्धा आणि अध्यात्मिक समाधानाच्या कक्षेतून बाजूला काढून राजकारणासाठी वापरायला सुरुवात केली जाते, तेव्हा धर्म आणि देवाच्या नावे लोक कोणत्या नीच पातळीला जाऊ शकतात, आपले मनुष्यत्व विसरून, पशु बनून किती क्रूरपणा करू शकतात याचा अनुभव साऱ्या जगाने गेली अनेक शतके घेतला आहे.’ (Angry Ram and Hanuman)

धार्मिकता म्हणजे नेमके काय ?

धारयती इति धर्मः याचा अर्थ, जो धारण केला जाऊ शकतो तोच धर्म होय. धर्माची ही एक मौलिक व्याख्या आहे. याचा अर्थ तोच धर्म आहे, जो कोण्या व्यक्तीला वा समाजाला धारण करण्यास, टिकवून ठेवण्यात, वारसा देण्यात योग्य आहे. धर्माच्या लक्षणांमध्ये धैर्य, क्षमा, शौच्य, इंद्रिय निग्रह आणि सत्य अशा गोष्टी सामील असतात आणि हे जे सर्व गुण आहेत, त्यांना धारण करणे आवश्यक असते.

या अर्थाने ईश्वराधना वा धर्माचरण करणाऱ्या व्यक्ती खऱ्या अर्थाने धार्मिक असतात व त्यांच्यापासून समाजाला उपद्रव होण्याची शक्यता नगण्य स्वरूपाची असते. अशा व्यक्ती बहुदा आपला देवधर्म आपल्या वैयक्तिक आचरणापुरताच मर्यादित ठेवून त्याच कक्षेत राहण्यात समाधानी असतात. बऱ्याचदा आपल्या असमाधानी चित्तवृत्तींचे शांतवन करण्याच्या खटपटीत असतात. याला सोप्या शब्दात धार्मिकता असे म्हटले जाते.

समाजात ज्याप्रमाणे निरूपद्रवी धार्मिक माणसे असतात, त्याचप्रमाणे लोकांच्या धार्मिकतेचा, त्यांच्या ईश्वरावरील श्रद्धेवरचा गैरफायदा घेणारे, लोकांच्या श्रद्धांचा उपयोग करून आपला चरितार्थ चालवणारे, त्यांच्या शोषणावर स्वतःचे पोषण करणारे भोंदूबाबाही जागोजागी असतात. या भोंदूबाबांचीही एक कक्षा असते, एक अवाका असतो. बऱ्याचदा अशांना संत-महंत, साधू असेही संबोधले जाते. अशा संत-महंत, साधू, योगी, बाबांच्या आहारी गेलेली माणसे, एक वेळ देवाचा

अपमान सहन करतील, पण त्यांच्या बाबा व तथाकथित योग्या विरुद्ध उच्चारलेला चकार शब्दही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत भक्त नसतात. परंतु, अशा भोंदू मंडळींचा उपद्रव त्यांच्या भक्तांना होत असला तरी त्या कक्षे बाहेरच्या लोकांचे ही मंडळी फारसे नुकसान करू शकत नाहीत.

केवळ मुखी राम (Angry Ram and Hanuman)

देवाधर्माला न मानणारी, पण धार्मिकतेचा बुरखा पांघरून लोकांच्या मनात असलेल्या देवाधर्मावरच्या श्रद्धेचा वापर नि व्यापार करून राजकारण करणारी जमातही अस्तित्वात असते. विशेषतः ज्या राजकारणाच्या प्रवाहाला लोकांच्या अंधश्रद्धा दूर करायच्या नसतात, उलट लोकांच्या श्रद्धांचा वापर आपल्या गलिच्छ राजकारणासाठी करायचा असतो, असे प्रवाह हेच कार्य करत असतात. त्यांच्या मुखात राम असतो आणि बगलेत नथुराम असतो. जेव्हा राम सोयीचा असतो तेव्हा राम आणि अन्यवेळी नथुराम हेच त्यांचे ब्रीद असते. (Angry Ram and Hanuman)

दुर्दैवाने, आज आपल्याला अशाच मंडळींचे शासन सहन करावे लागत आहे. अशी वृत्ती अंगी बाणवलेले लोक भक्तांच्या झुंडी निर्माण करतात. या अंधभक्त झुंडीच त्यांचा आधार असतात आणि तेच त्यांचे शस्त्र असते. या झुंडीच्या बळावरच ही मंडळी राज्यकर्ती बनतात आणि त्यांच्या बळावरच राज्य टिकवतात. (Angry Ram and Hanuman)

आज जो पक्ष सत्तेवर आहे, तो पक्ष एकेकाळी साडेतीन टक्क्यांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. या पक्षाने जेव्हा प्रभू रामचंद्राच्या नावाचा उपयोग बाबरी मज्जिद की राम मंदिर या इतिहासातल्या वादावर राजकारण करण्यास सुरुवात केली, देशात उन्माद माजविण्यास सुरुवात केली, देशात विद्वेष पसरवून हिंदू विरुद्ध मुसलमान असे ध्रुवीकरण घडवून आणले तेव्हाच त्यांना सत्तेचा सोपान चढता आला. निवडणुकीत साक्षात प्रभू रामचंद्रांना उतरविण्यात आल्यावर, ज्या देशात प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारी करोडो माणसे आहेत, अशी माणसे रामाला मत देणार हे सांगायला कुणा पंडिताची गरज नाही.

‘राम राम’च्या जागी ‘जय श्रीराम’

राम हे कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. माणसे एकमेकांना भेटली की अभिवादन ‘राम राम’ म्हणून करत असतात आणि निरोपही ‘राम राम’ म्हणूनच घेतला जातो. आता मात्र ‘राम राम’ची जागा ‘जय श्रीराम’ने घेतली आहे. जणू युद्धावर निघाले आहेत असे भासून रामनामाला उन्मादी बनवून टाकले आहे. म्हणूनच रामाच्या नावे राजकारण करणाऱ्यांचा संघी-राम आणि महात्मा गांधींचा राजाराम यातील फरक स्पष्टपणे सांगणे आवश्यक झाले आहे. हा तर रामद्रोह

रामायणात वर्णित रामाचे आदर्श दिव्य असे प्रभामंडळ आहे. राजारामाला मर्यादा पुरुषोत्तम समजले जाते. राम केवळ एका धर्माचे वा संस्कृतीचे प्रतीक नाहीत. जगात सोळाहून अधिक देशांमध्ये या ना त्या रूपाने प्रभू रामाला पूज्य मानले जाते. यात मुख्य रूपाने नेपाळ आणि मॉरिशससारखे देश तर आहेतच, पण त्याचबरोबर इंडोनेशिया मलेशिया थायलंड, कंबोडिया, फिलिपिन्स आणि लावोससारख्या दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्येही रामायण आणि प्रभू रामाच्या चरित्राचा सखोल प्रभाव आहे. म्हणूनच कवी अजहर इक्बाल लिहून जातात,

दया अगर लिखने बैठू, होते है अनुवादित राम

रावण को भी नमन किया, ऐसे थे अनुशासित राम

अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या प्रत्येक वचनाचा संघीय मंडळींनी अवमान करून आपल्या अधर्माचा परिचय दिला आहे.

या तथाकथित राम भक्तांनी राम मंदिर निर्माणसाठी बाबरी मशीद पाडली. धैर्य हा धर्माचा महत्त्वाचा गुण आहे. पण या बाबरी मशीद पाडणाऱ्यांकडे ‘आम्ही पाडली’ असे म्हणण्याचे धैर्य नव्हते. (ही मशीद परग्रहवासीयांनी पाडली असावी.) केले कृत्य कबूल करायचे धैर्य ज्यांच्याकडे नसते, ती मंडळी केवळ भेकडच नसतात, तर असत्याचे आचरण करणारी धर्मभ्रष्ट असतात. बृहदारण्यक उपनिषदातील

असतो मा सद्गमय

तमसो मा ज्योतिर्गमय

मृत्योर्मा अमृतम् गमय

ही प्रार्थना धर्माने काय साधावे हे सांगते. मनुष्याने असत्याकडून सत्याकडे, तिमिराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे जावे असे ही प्रार्थना सांगते. मात्र या धर्मवीरांनी उलटा प्रवास करून आपले अधार्मिकत्व प्रमाणित केले आहे. (Angry Ram and Hanuman)

रघुवंशाची दिलेला शब्द पाळण्याची परंपरा अखंडित राहिली आहे. प्राण गेला तरी चालेल पण दिलेले वचन तुटता कामा नये.

रघुकुल रीत सदा चली आई

प्राण जाय पर वचन न जाये

याचसाठी राजा दशरथाने अत्यंत कठीण असतानाही कैकेयीला दिलेले वचन निभावले होते. मात्र या तथाकथित रामभक्तांनी बाबरी मशिदीला धक्काही लावला जाणार नाही, असे वचन सर्वोच्च न्यायालयाला देऊनही बाबरी मशीद पाडून रामद्रोह केला होता.

आश्चर्यकारक पोपटपंची

या पार्श्वभूमीवर नॉन बायोलॉजिकल विश्वगुरूजी पंतप्रधान मोदींनी, श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण प्रसंगी केलेल्या भाषणात केलेली पोपटपंची शिकवलेल्या पाळीव पोपटालाही तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. ते म्हणतात, हा धर्मध्वज आवाहन करेल, ‘सत्यमेव जयते नानृतं !’ म्हणजे सत्याचाच विजय होतो. असत्याचा नाही. हा धर्मध्वज उद्घोष करेल, ‘सत्यम् एकपदम् ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः !’ अर्थात सत्य ब्रह्माचे स्वरूप आहे. सत्य धर्मस्थापित आहे, हा धर्मध्वज ‘प्राण जाय पर वचन न जाये’ या वचनाची प्रेरणा बनेल. अर्थात, जे बोलले जाईल तेच केले जाईल. हा धर्मध्वज ‘बैर न ब्रिग्रह आस न त्राता ! सुखमह ताहि सदा सब आसा!’ म्हणजे भेदभाव पीडा क्लेशांपासून मुक्ती मिळून समाजात शांती आणि सुख असू दे, असा आशीर्वाद देत राहील.

बोलणे मायावी

जे विरोधी पक्षात असतात, तेव्हा एक भूमिका घेतात आणि सत्तेत आल्यावर एकदम उलट भूमिका घेतात, भारत-पाकिस्तान हिंदू-मुसलमान आणि स्मशान-कब्रस्तान या भाषेत बोलून जे कपड्यांवरून माणसे ओळखायला सांगतात, मटन, मछली, मंगळसूत्र, मुजरा या म-कारी भाषेत बोलून जे सामाजिक सद्भावनांची ‘ऐसी की तैसी’ करतात, जे कट्टा नि कनपट्टीच्या गोष्टी करत ‘कटप्पाची’ भूमिका निभावतात, ज्यांच्या कार्यकाळात हजारो निष्पाप नागरिक दंग्यांमध्ये बळी पडतात व ज्यांना राजधर्माचे पालन करा असा उपदेश दिला जातो,

त्यांच्या तोंडी ही भाषा किती मायावी आहे, यावर वेगळे भाष्य करायची गरज नाही. ही मंडळी मुखी रामनाम जपत अंतरी नथुरामाची भक्ती करतात, हे सांगण्याची आता गरजच राहिलेली नाही. यांची वृत्ती आणि वक्तव्ये बोलकी आहेत. परंतु यांच्या वक्तव्यांनी सर्वसामान्य लोकांच्या आणि खऱ्या रामभक्तांच्या मनात हे खरेखुरे रामभक्त आहेत असा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी गांधीजींचा राम सांगणे भाग आहे. शिवाय हीच संघी मंडळी रामराज्याच्याही गोष्टी करू लागली आहेत. (Angry Ram and Hanuman)

गांधीजींचा सत्यरुपी राम

गांधीजींचा राम हजारो भारतीयांच्या अंतःकरणात वसत आलेला राजाराम आहे. म्हणूनच गांधीजींचा राम हजारो भारतीयांच्या अंतःकरणात वसत आलेला राजाराम आहे. म्हणूनच ते ईश्वर अल्ला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान, असं म्हणू शकतात.

रामनामाबद्दल गांधीजी म्हणतात, ईश्वराचा सर्वोच्च गुण आणि नाव सत्य आहे, हे जरी माझ्या विवेकाने आणि हृदयाने पुष्कळ दिवसांपूर्वी मान्य केले असले, तरी सत्याला मी रामाच्या नावे ओळखतो. माझ्या परीक्षेच्या अत्यंत कठीण प्रसंगी याच नावाने माझे रक्षण केले आहे आणि आजही करत आहे. याचा संबंध बालपणाशी असू शकतो किंवा तुळशीदासांबद्दल असलेल्या माझ्या आकर्षणाशी.

तो संबंध काही असो, पण गांधीजी सत्यालाच राम मानत होते. ते पुढे लिहितात, परंतु एक गोष्ट पूर्णपणे खरी आहे आणि या ओळी लिहीत असताना माझ्यासमोर माझ्या बालपणीच्या आठवणी उभ्या राहतात. जेव्हा मी माझ्या घराजवळील रामाच्या मंदिरात नित्य दर्शनाला जात असे. माझा राम तेव्हा तेथेच राहत होता. त्याने मला अनेक भीतींपासून आणि पापांपासून वाचवले.

माझ्याकरता ती अंधविश्वासाची गोष्ट नव्हती. शक्य आहे, की त्या मंदिराचा पुजारी वाईट माणूस असेल. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. शक्य आहे, की त्या मंदिरात कुकृत्ये होत असतील. मला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे माझ्यावर त्यांचा काहीही प्रभाव नाही जी गोष्ट माझ्या बाबतीत खरी आहे तीच करोडो लोकांकरता ही खरी आहे. (हरिजन दिनांक १८.३.१९३३ पृ.६)

गांधीजींची हत्या

रामाची म्हणजेच सत्याची उपासना अविरत करत राममय झालेल्या महात्म्याची ३० जानेवारी १९४८ रोजी नथुरामने हत्या केली, त्या नथुरामचे प्रशंसक देशात रामराज्य आणायचे म्हणतात. गांधीजींनाही रामराज्य हवे होते असे म्हणतात. म्हणून गांधीजींची रामराज्याची कल्पनाही नीट समजून घेतली पाहिजे. रामराज्याबद्दल गांधीजी म्हणतात,

माझ्या रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा नाही. रामराज्य म्हणजे दैवी राज्य वा ईश्वरी साम्राज्य. माझ्या दृष्टीतून राम आणि रहीम एकच आहेत. मला एकच ईश्वर माहीत आहे, तो आहे सत्य आणि सदाचरणाचा ईश्वर.

माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीतलावर कधी राहिले असतील व नसतील, परंतु रामराज्यांचा प्राचीन आदर्श एका खऱ्या लोकशाहीचा आदर्श आहे, यात काही संशय नाही. या राज्यपद्धतीत क्षुद्रतम नागरिकालाही लांबलचक आणि महाग प्रक्रियेशिवाय ताबडतोब न्याय मिळू शकतो. (यंग इंडिया, १९ सप्टेंबर १९२९, पृ. ३०५)

गांधीजी पुढे लिहितात, माझ्या स्वप्नातील रामराज्यात राव आणि रंक या दोघांनाही समान अधिकार असतील. (अमृत बाजार पत्रिका, २ ऑगस्ट १९३४)

सुज्ञांस अधिक सांगणे नको. वाट चुकवलेल्या भक्तांना प्रभू रामचंद्र सद्बुद्धी देवो, एवढीच प्रार्थना. (Angry Ram and Hanuman)

………………………

(डॉ. विवेक कोरडे यांची ‘जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ’, ‘गांधीची दुसरी हत्या’, ‘शहीद भगतसिंग’, ‘वैचारिक बंदुकांचे शेत’, ‘गांधीहत्येचे राजकारण’, ‘आरएसएस आणि नथुराम गोडसे’, ‘भगतसिंग, गांधी आणि सावरकर अपप्रचारामागचे वास्तव’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

ई मेल: drvivekkordeg@mail.com

(साभारः समतावादी मुक्त संवाद पत्रिका)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00