गणेश विसपुते
रंगमंचावर पाठीमागे नेपथ्यात रस्त्यावरच्या भिंतींवरची ग्राफिटी दिसते. बॅन्स्कीचं लोकप्रिय झालेलं ‘गर्ल विथ बलून’ हे म्यूरलचित्र दिसतं. त्याचं उपशीर्षक आपल्याला मनातल्या मनात आठवतं- देअर इज ऑल्वेज होप. वरच्या बाजूला कोपऱ्यात जॉन लेनन दिसतो आणि “यू मे से आय अॕम अ ड्रीमर। बट् आयम् नॉट द ओन्ली वन् । आय होप सम डे यूईल जॉईन अस । अॕड द वर्ल्ड वील बी अॕज वन…” या ओळी स्मृतीत ऐकल्या जातात. (Marx in Soho)
डाव्या बाजूच्या लाकडी बेंचवर कार्ल मार्क्स येऊन बसतो. वर्तमानात कार्ल मार्क्स. मग लेनन, बॅन्स्की आणि विसाव्या शतकातल्या अनेक गोष्टी आणि एकोणिसाव्या शतकातला मार्क्स हा अॕनॉक्रॉनिझम- कालविपर्यय प्रत्यक्षात यावासा वाटत असताना मंचावर ते होताना पाहूनच सूक्ष्म उत्तेजना आणि ऊर्जावान वाटण्याचा अनुभव येतो. (Marx in Soho)
‘मार्क्स इन सोहो’ पहायचंच होतं. ते पाहिल्यावरचा अनुभव विलक्षण होता. पाहणाऱ्या प्रत्येकाचा तो स्वतंत्रपणे वेगळा आणि खास असणार. मार्क्ससारख्या एका तत्त्वज्ञाबरोबरचा आपापलाही खासगी प्रवास असतो. त्यातल्या अनेक गोष्टी इथं दृश्यमान होतात. मार्क्सची तळमळ, संघर्ष, जिद्द, कुटुंबातल्या प्रत्येकावर असलेलं प्रेम, विपरित परिस्थितीत जगण्यासाठी करावी लागलेली धडपड आणि भल्या जगासाठी त्यानं पाहिलेली स्वप्नं— हे सगळं अतिशय हृद्य रीतीनं ह्या दोन अंकी नाटकात येतं. (Marx in Soho)
डॉ. शरद भुताडियांचा मार्क्स आपल्यापर्यंत पोहचतो. भिडतोच. ‘प्रत्यय थिएटर’ गेली तीनेक दशकं सातत्यानं वेगळी आणि अर्थपूर्ण नाटकं करत आहे. एखाद्या संस्थेनं हे खरोखरीनं नाटकासाठी काम करणं आहे. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात नाटक हेच सर्वोपरी असतं. डॉ. भुताडिया यांनी केलेले आईन्स्टाईन, किंग लिअरचे प्रयोग आठवतात. केवळ अफलातून होते.
‘मार्क्स इन सोहो’मध्ये वृद्ध मार्क्सशिवाय तरुण मार्क्स, जेनी, फ्रेडरिक एंगल्स, मुलगी एलिनॉर, मिखाईल बाकुनिन ही पात्रं प्रामुख्यानं आहेत. ती अतिशय नेमकेपणानं रंगवली गेलेली आहेत. आदित्य खेबुडकरांनी रंगवलेला तरुण मार्क्स त्याच्या जगण्यातली उत्कटता, धडपड, जिद्द, निष्ठा, तगमग, स्वप्नं पाहण्यातला आशावाद सगळ्याच छटा नेमकेपणानं दाखवतो. जेनीची भूमिका रसिया पडळकर यांनी केली आहे. मार्क्सच्या धडपडीत खंबीरपणे साथ देणारी, त्याच्या बौद्धिक कामातली वाटेकरीण, त्याची टीकाकार आणि जिवलग सखी या रंगच्छटा त्या भूमिकेत सहजपणे दिसतात. हॉवर्ड झिनच्या एकपात्री नाटकाचं साहिल कल्लोळींनी रूपांतर करताना बरीचशी पात्रं मंचावर आणली. हे रूपांतर दाद देण्यासारखं आहे.
नाटकाच्या अखेरीला सगळी पात्रं एकत्र येऊन लेननचं ‘इमॅजिन…’ गाऊ लागतात आणि पहिल्या दृश्यातून सुरु होणारी वर्तुळरेघ पूर्ण होते. हे जग सगळ्यांचं आहे, त्यात सगळ्यांचा सारखा वाटा आहे, ते जोडलेलं, जुळलेलं, एक होईल, भलं होईल ही आशा जागते. (Marx in Soho)
आज आणि आत्ताच्या काळात हे नाटक होणं आवश्यकच आहे. ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ ह्या कादंबरीत रोगाच्या काही साथी येतात. निद्रानाश आणि स्मृतिभ्रंशाची एक साथ येते. सारामागोच्या ‘ब्लाईंडनेस’मध्ये अंधत्वाची सार्वत्रिक साथ येऊन लोकांच्या मनातले विकार, विखार बाहेर वाहू लागतात. काम्यूच्या ‘ल पेस्त’मध्ये उंदरांबरोबर माणसं पटापटा मरू लागतात. समकालात नेमकं नाव सांगता येणार नाही अशी महामारी पसरलीये आणि जगभर लोक विलक्षण क्रौर्य, रानटीपणाची उदाहरणं दाखवताहेत असं वाटतं. जगभरात चाललेली युद्धं, हिंसा, घराघरात पसरलेला द्वेष, घृणा, संशय, भय, विकृती हेच फक्त आहे की काय असं वाटू लागतंय. सगळ्या व्यवस्था सडल्या आहेत, माणसं विकृती-विकारांनी किडली आहेत असं चित्र दिसत असताना ह्या नाटकाचं मंचन ही अर्थपूर्ण गोष्ट आहे. (Marx in Soho)
त्यासाठी ‘प्रत्यय’च्या टीमचे आभार.