हॅमिल्टन : न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावामध्ये ९ बाद ३१५ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे कर्णधार टॉम लॅथम आणि मिचेल सँटनर यांनी अर्धशतके पूर्ण केली. (Newzealand)
या मालिकेतील अगोदरच्या दोन कसोटी जिंकून इंग्लंडने अगोदरच विजयी आघाडी घेतली आहे. शनिवारी तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि विल यंग यांनी संघाला १०५ धावांची सलामी दिली. यंग ४२ धावांवर बाद झाला. तिसऱ्या स्थानावरील केन विल्यमसनने ४४ धावा केल्या. आश्वासक खेळणारा विल्यमसन बाद होण्याबाबत कमनशिबी ठरला. खेळलेला चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात विल्यमसनने चुकून स्वत:च्याच पायाने चेंडू स्टंपवर नेला. लॅथमने १३५ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ६३ धावांची खेळी केली. (Newzealand)
लॅथम बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने न्यूझीलंडच्या विकेट पडत राहिल्या. आठव्या क्रमांकावरील सँटनरच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत सँटनरने अर्धशतक पूर्ण केले. तो ५४ चेंडूंमध्ये ७ चौकार व २ षटकारांसह ५० धावांवर खेळत आहे. इंग्लंडतर्फे मॅथ्यू पॉट्स व गस ॲटकिन्सन यांनी प्रत्येकी ३, तर ब्रायडन कार्सने २ विकेट घेतल्या. (Newzealand)
कारकिर्दीतील अखेरची कसोटी खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदीला सामन्यापूर्वी मानवंदना देण्यात आली. हॅमिल्टनमधील सेडन पार्क स्टेडियमच्या एका स्टँडला साउदीचे नाव देण्यात आले. त्याने दहाव्या स्थानी फलंदाजीस येत १० चेंडूंमध्ये १ चौकार व ३ षटकारांसह २३ धावा फटकावल्या. या छोट्याशा खेळीदरम्यान साउदीने कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथे स्थानही पटकावले. साउदीने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलशी बरोबरी केली असून हे दोघे ९८ षटकारांसह या यादीत संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी आहेत. (Newzealand)
हेही वाचा: