आयपीएल लिलावात दुसरा दिवस गोलंदाजांचा

जेद्दा, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी सुरू असणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये दुसरा दिवस गोलंदाजांचा, विशेषत: वेगवान गोलंदाजांचा ठरला. यामध्ये, सध्या संघाबाहेर असणारा भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने तब्बल १०.७५ कोटी रुपयांची किंमत मोजली.

भुवनेश्वरखालोखाल भारताच्या दीपक चहारला मुंबई इंडियन्स संघाने ९.२५ कोटी रुपयांना करारबद्ध केले. दीपक मागील मोसमात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळला होता. याशिवाय, आकाशदीपला लखनौ सुपर जायंट्सने ८ कोटींना, मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने ८ कोटींना, दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनला पंजाब किंग्जने ७ कोटींना, तर तुषार देशपांडेला राजस्थान रॉयल्सने ६.५० कोटी रुपयांना करारबद्ध केले. रविवारी, या लिलावाच्या पहिल्या दिवशी पंजाब किंग्जने ‘राइट टू मॅच’ कार्डचा वापर करत तब्बल १८ कोटी मोजून अर्शदीप सिंगला आपल्याच संघात ठेवले होते. यावर्षी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये हरियाणाकडून खेळताना डावात दहा विकेट घेण्याचा पराक्रम करणारा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला चेन्नईने ३.४० कोटींना करारबद्ध केले.

वेगवान गोलंदाजांप्रमणेच कृणाल पंड्या आणि नितीश राणा या अष्टपैलू खेळाडूंनाही चांगली किंमत मिळाली. कृणालसाठी आरसीबीने ५.७५ कोटी, तर नितीश राणासाठी राजस्थान रॉयल्सनी ४.२० कोटी इतकी किंमत मोजली. मागील वर्षी मुंबईकडून खेळलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू टीम डेव्हिड याला आरसीबीने ३ कोटी मोजून आपल्या संघात घेतले. गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरला ३.२० कोटींना करारबद्ध केले. मागील वर्षी चेन्नईकडून खेळलेला न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर मुंबई संघात दाखल झाला असून त्याच्यासाठी मुंबईने २ कोटी इतकी किंमत मोजली.

दरम्यान, अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा शार्दुल ठाकूर, केन विल्यमसन, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ यांसारख्या दिग्गज खेळाडूंसाठी कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती. पृथ्वी शॉची मूळ किंमत ७५ लाख इतकी कमी असतानाही त्याच्यासाठी बोली लागली नाही. सर्फराझ खानची मूळ किंमत ७५ लाख असूनही तो कराराविना राहिला. मागील वर्षीसुद्धा त्याला कोणत्याही संघाने करारबद्ध केले नव्हते.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत