बिहार कोकिळा

लता मंगेशकर यांच्यानंतर गानकोकिळा या उपाधिने ज्या गायिकेला संबोधले जाते, अशा एकमेव गायिका म्हणजे शारदा सिन्हा. ७२ वर्षांच्या शारदा सिन्हा बिहारसह उत्तर भारतातील अत्यंत लोकप्रिय गायिका होत्या. छटपूजा उत्सवात शारदा सिन्हा यांनी गायिलेली गाणीच गाजत असतात आणि त्याद्वारे त्या घराघरात पोहोचल्या आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे छटपूजेशी संबंधित लोकप्रिय गायिकेने छटपूजेच्या काळातच या जगाचा निरोप घेतला. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रादेशिक भाषेतील गायिकांना मोठे कर्तृत्व असूनही राष्ट्रीय पातळीवर म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळत नाही. शारदा सिन्हा यांच्याबाबतीतही तसेच घडताना दिसते. त्या भोजपुरी, मैथिली आदी भाषिक प्रदेशातच अधिक लोकप्रिय राहिल्या.

शारदा सिन्हा यांचा जन्म बिहारच्या मिथिला प्रदेशातील सुपौल जिल्ह्यातील हुलास गावात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शारदा सिन्हा यांचे वडिल सुखदेव ठाकूर बिहार सरकारच्या शिक्षण विभागात अधिकारी होते. आपल्या मुलीचे संगीतावरील प्रेम वडिलांनी लहानपणीच ओळखले होते आणि त्यांना त्यासंदर्भातील शास्रशुद्ध प्रशिक्षण सुरू केले होते. घरातच त्यांना शिक्षण मिळू लागले आणि त्याचबरोबर शालेय शिक्षणही सुरू राहिले. पटना विद्यापीठातून शारदा सिन्हा यांनी कला शाखेतील पदवी मिळवली.

कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात लग्नानंतर बदल होत असतात. लग्नाआधीचे शिक्षण पुढे सुरू ठेवता येत नाहीत किंवा आधीचे छंदही जोपासता येत नाहीत. शारदा सिन्हा यांच्याबाबतीतही तसेच काहीसे घडण्याची शक्यता निर्माण झाली. सासरच्या लोकांचा त्यांच्या गाण्याला विरोध होता. परंतु त्यांच्या पतीने त्यांची पाठराखण केल्यामुळे गाणे पुढे सुरू ठेवता आले. दरम्यानच्या काळात शारदा सिन्हा या समस्तीपूरमध्ये राहात होत्या आणि एका महाविद्यालयात संगीत शिक्षक म्हणूनही काम करीत होत्या. ऐंशीच्या दशकात मैथिली, भोजपुरी, मगही भाषेतील पारंपरिक लोकगीते गाणारी गायिका म्हणून त्यांना लोकप्रियता मिळू लागली.

शारदा सिन्हा यांनी गायलेले गीत हिंदी पडद्यावर आले तेव्हा ते सुपरहिट झाले. `हम आपके है कौन` या चित्रपटातील `कहे तो से सजना` या गीतामुळे शारदा सिन्हा यांचे नाव देशभरात गाजले. अनुराग कश्यप यांच्या `गँग्ज ऑफ वासेपूर` चित्रपटात शारदा सिन्हा यांनी गायिलेले पारंपरिक गीत `हमारे पिया बहुत पसंद कइल गइल…` बहुचर्चित ठरले होते. छठ पूजेशी संबंधित त्यांनी गायिलेली गीते दीर्घकाळ लोकांच्या ओठांवर राहतील आणि त्याद्वारे त्यांचे स्मरणही राहील. संगीत क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन भारत सरकारन त्यांना पद्मश्री सन्मान बहाल केला होता, तसेच बिहार सरकारने बिहार कोकिळा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील अनेक मान-सन्मान त्यांना लाभले होते. त्यांना भावपूर्ण आदरांजली!

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम