बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय

रावळपिंडी

पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दहा गडी राखून पराभव करून बांगलादेशने क्रिकेट इतिहासात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. दुसऱ्या डावात १४६ धावांवर पाकिस्तानचा संघ आटोपल्यानंतर बांगलादेशला विजयासाठी फक्त तीस धावांचे आव्हान मिळाले. बांगलादेशने अखेरच्या दिवशी चहापानाआधीच ६.३ षटकांत बिनबाद तीस धावा करून पाकिस्तानविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली. बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध चौदा कसोटी सामन्यांतील हा पहिलाच विजय आहे.

बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना एकापाठोपाठ तंबूत पाठवले. फिरकीपटू मेहदी हसन मिराज (४/२१) आणि शाकिब अल हसन (३/४४) यांनी पाकिस्तानच्या सात फलंदाजांना बाद केले. पाकिस्तान संघाने आपला पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात ५६५ धावा करत ११७ धावांची आघाडी घेतली होती.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात एक बाद २३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात करणा-या पाकिस्तानचे फलंदाच ठराविक अंतराने बाद होत राहिले. पहिल्या डावात १७१ धावांचा डोंगर उभारणा-या मोहम्मद रिझवाननेच दुसऱ्या डावातही सर्वाधिक ५१ धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांची साथ त्याला मिळाली नाही. रिझवानसह पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफीक (३७), बाबर आझम (२२) व कर्णधार शान मसूद (१४) या फलंदाजांनी खेळपट्टीवर थोडाफार तग धरला. मिराज व शाकिबशिवाय बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज शोरफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी प्रत्येकी एक गडी बादकेला. पाकिस्तानने २०२१ मध्ये रावळपिंडी येथे दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते, त्यानंतर घरच्या मैदानावर कोणताही कसोटी सामना जिंकलेला नाही.

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत