नवी मुंबई : प्रतिनिधी : एमपीएससीच्या पेपरफुटीवरुन राज्यात विद्यार्थी आक्रमक असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएसी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना आज शुक्रवारी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गुरुवारीच एमपीएससीच्या गट ब आणि क मुख्य आणि पूर्व परीक्षेची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करण्याची घोषणा केली असताना आज संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. (Sambhaji Brigade’s protest against MPSC)
राज्य सरकारकडून एमपीएससी अध्यक्षांची पाठराखण
नवी मुंबईतील कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन (एमपीएससी) कार्यालयात पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी गेले होते. चर्चा झाल्यानंतर एमपीएससीचे सचिव महेंद हरपाळकर यांच्या तोंडला काळे फासले. या घटनेने कार्यालयात एकच गोंधळ उडाला. एमपीएससी घेत असलेल्या परीक्षेचे पेपर फुटत असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आले असताना राज्य सरकार एमपीएससी अध्यक्षांची पाठराखण करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर आज संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. (Sambhaji Brigade’s protest against MPSC)
रोहित पवारांची प्रतिक्रीया
संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांनी पेपरफुटी, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निश्चित खेळ केला असून विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत आहेत. आम्ही संविधानिक मार्गाने विरोध करत आहोत आणि करत राहू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात मोठी ताकद असल्याने आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. संविधानिक मार्ग हाच राजमार्ग आहे. कुणाच्या अंगावर शाई टाकण्याला आमचे कदापी समर्थन नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. (Sambhaji Brigade’s protest against MPSC)