युद्धे क्रांतिकारी असतात. राजकारण, अर्थकारण हे तर झालेच, पण ती समाज बदलवतात. वैचारिक आस उलटेपालटे करतात. अनेक उदाहरणे आहेत त्याची. महायुद्धे घ्या. नाझिझम, फॅसिझम, कम्युनिझम यांस सुगीचे दिवस पहिल्या महायुद्धानंतर आले. दुसऱ्या महायुद्धाने जग वैचारिकतेच्या दोन ध्रुवांवर नेऊन ठेवले. अमेरिकेचा कल उजवीकडे वळला. तेथे ‘रेड स्केअर’ – साम्यवादाचे भय आधीपासून होतेच. ते या महायुद्धाने गडद केले आणि तेथे ‘मॅकार्थिझम’ अवतरला… (government surveillance and privacy)
- रवि आमले
प्रचंड असत्य, अपमाहिती, खोटे आरोप यांची राळ उडवायची. समोरील व्यक्तीचे चारित्र्यहनन करायचे. त्यास देशद्रोही ठरवायचे. समाजकंटक, धर्मशत्रू ठरवायचे, हे एकीकडे आणि दुसरीकडे लोकांसमोर सातत्याने एखादा शत्रू उभा करायचा. त्याच्यापासून आपल्याला, आपल्या राष्ट्राला, धर्माला धोका आहे, असे सांगायचे. त्यातून द्वेष आणि भयाचे वातावरण उभे करायचे. त्यामधून तयार होणाऱ्या भयग्रस्त, हिंस्र, उन्मादी झुंडींद्वारे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करायचे. हा ‘मॅकार्थिझम’, तो अतिरेकी उजवा. सध्या देशोदेशी दिसणारा ‘ट्रम्पिझम’ ही त्याची सुधारून विकृत केलेली आवृत्ती. (government surveillance and privacy)
डाव्यांवर डोळा
अशा काळात सरकारी पाळतशाहीला नेहमीच ऊत येतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकेत जे. एडगर हुव्हर यांच्या ‘एफबीआय’ने स्वतःची पाळतशाही प्रस्थापित केली होती. ‘डावे तेवढे देशद्रोही’ या कथनावर ती अमेरिका चालत होती. (government surveillance and privacy)
सर्वसामान्य शिक्षक, कामगार यांच्यापासून चार्ली चॅप्लीनसारखे बडे कलाकार आणि रॉबर्ट जे. ओपेनहायमर यांच्यासारखे वैज्ञानिक यांच्यापर्यंत असंख्य लोकांवर ‘एफबीआय’ची पाळत होती. त्यांचे दूरध्वनी चोरून ऐकणे, तारा फोडणे, त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवणे, त्यांचे नातेवाईक आणि इष्ट मित्र परिवाराला त्यांच्याविरोधात साक्ष द्यायला लावणे, असे प्रकार सर्रास केले जात असत. पूर्व जर्मनीतली स्तासी, सोव्हिएत रशियातील गेस्टापो आणि अमेरिकेतील एफबीआय, तसेच ‘हाऊस कमिटी ऑन अन-अमेरिकन अॅक्टिव्हिटीज’ नामक संसदीय समिती, या सर्वांचे रूप सारखेच भीषण होते. व्हिएतनाम युद्ध सुरू झाले आणि हे मॅकार्थीचे भूत उतरले.
याच काळात अमेरिकेची वैचारिक कूस बदलत गेली. ‘मायबाप सरकार’ ही अमेरिकेची संस्कृती कधीच नव्हती. तेथील मतदार कधीच ‘लाभार्थी’ नव्हते. सरकारला, लोकप्रतिनिधींना बिनदिक्कत प्रश्न विचारणे हा देशद्रोह नसतो, एवढी अक्कल असलेला देश तो. आपली गैरकृत्ये, भ्रष्ट आचार लपवण्यासाठी सत्ताधारी अनेकदा ‘राष्ट्रीय सुरक्षा’ नावाचा बुरखा घालतात, ही जाणीव असल्याने तेथील लोक सरकारला प्रश्न विचारण्यास आणि सरकारची लपवाछपवी चव्हाट्यावर आणण्यास कचरले नाहीत. (government surveillance and privacy)
एल्सबर्ग खटल्याचा सांगावा
साठ-सत्तरचे ते दशक म्हणजे, तर अशा ‘जागल्यां’च्या प्रभावाचा काळ म्हणावा लागेल. व्हिएतनाम युद्ध लढले जात असतानाच्या काळातच तेथे ‘पेंटॅगॉन पेपर्स’, ‘बॉटरगेट’ अशी प्रकरणे झाली. पेंटॅगॉन पेपर्स हा तर व्हिएतनाम युद्धाविषयीचा गोपनीय अहवाल. पण त्यातून आतापर्यंतच्या सरकारांनी अमेरिकी जनतेची कशी फसवणूक केली आहे, हे लक्षात येताच, तो अहवाल तयार करण्यात महत्त्वाचा सहभाग असलेले अर्थशास्त्रज्ञ आणि संरक्षण अभ्यासक डॉ. डॅनिएल एल्सबर्ग यांनी तो अहवाल फोडला. ज्यांचा सद्सद्विवेक, ज्यांचे ‘जमीर’ जागे असते अशी मंडळी करतात तसे. पेरी फेलवॉक हे त्यातलेच एक. अमेरिकी सरकारच्या पाळतखोरीचे रहस्योद्घाटन करणारा हा एडवर्ड स्नोडेनेचा पूर्वसुरी, एक आद्य ‘जागल्या’. (government surveillance and privacy)
‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ एनएसए या अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या आणि प्रभावी हेरसंस्थेत वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करीत होते ते. त्या साडेतीन वर्षांत तुर्कीए, पश्चिम जर्मनी आणि व्हिएतनाममधील एनएसएच्या ‘लिसनिंग पोस्ट’मधील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. या काळात एनएसए म्हणजे नेमके काय, हे त्यांच्या लक्षात आले. ‘एनएसएमधील अनेक लोक या ना त्या प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टींत सहभागी आहेत,’ ही संस्था ‘अश्लील पातळीवरची भ्रष्टाचारी’ आहे, हे त्यांना समजत गेले. वयाच्या पंचविशीत त्यांनी एजन्सीचा राजीनामा दिला. याच काळात बाहेर व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरू होत्या. ‘न्यू यॉर्क टाइम्स’चे पत्रकार नील शिहान यांनी ‘पेंटॅगॉन पेपर्स’वरील वृत्तमालिका सुरू केली होती. हे पेपर्स फोडणारे डॉ. डॅनिएल एल्सबर्ग यांनी स्वतःहून न्यायालयात येऊन स्वतःस अटक करून घेतली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय गुपिते फोडल्याप्रकरणी खटला सुरू झाला होता. त्यांना किमान ११५ वर्षांसाठी तुरूंगात पाठवण्याची निक्सन प्रशासनाची धडपड होती. त्या प्रयत्नांपायी या प्रशासनाने जे केले, त्यातून पुन्हा एकदा सरकारचा पाळतखोर चेहरा समोर आला होता.
सरकारपुरस्कृत घरफोडी
सत्ताधाऱ्यांना ज्या व्यक्तीपासून ‘धोका’ वाटतो, तिला नेस्तनाबूत करण्यासाठी सरकार ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या अस्त्राचा कसा वापर करते, त्याकरीता सुरक्षा यंत्रणांचा कसा वापर करते, ‘सव्हॅलन्स’ साधनांचा कसा वापर करते, हे समजून घ्यायचे असेल, तर एल्सबर्ग खटला पाहावा. त्याच्याशी निगडित असलेले ‘फिल्डिंग ब्रेक-इन’ प्रकरण पाहावे. (government surveillance and privacy)
म्हणाल तर साधी घरफोडी होती ती. रात्रीचा एकचा सुमार होता. लॉस एंजेलिसमधील ‘बेव्हर्ली हिल्स’ या उच्चभ्रू भागातील त्या इमारतीपासून काही अंतरावर एक कार थांबली. तिघे जण उतरले. सकाळीच ते त्या इमारतीची ‘रेकी’ करून गेले होते. सराईतपणे ते आवारात शिरले. तयारीने आले होते ते. सोबत ‘मास्किंग टेप’ आणि ‘ग्लास कटर’ आणला होता. खालच्या मजल्यावरील खिडकीची काच कापून त्यांनी इमारतीत प्रवेश केला. जिन्याने वरच्या मजल्यावर गेले. तिथं अनेक कार्यालये. त्यातील एकाच्या दरवाजाचे कुलूप त्यांनी फोडले. डॉ. लुईस जे. फिल्डिंग नामक मानसोपचार तज्ज्ञाचे ऑफिस होते ते. तेथील एका कपाटात ठेवलेली सुटकेस त्यांनी बाहेर काढली. त्यांचीच होती ती. त्या दिवशी रात्री नऊ वाजता ते त्या कार्यालयात आले होते. तिथे सफाई काम करणाऱ्या एका स्पॅनिश महिलेला पटवून ती बॅग तिथे ठेवायला लावली होती त्यांनी.
बॅगेत ३५ मिमीचा कॅमेरा, फिल्मरोल, स्पॉट लाइट असे साहित्य होते. दोघांनी त्याची मांडामांड केली. तेवढ्यात एकाने तिथल्या फाइलींचे कपाट फोडले. त्यातली कोणती फाइल हवी आहे, याची कल्पना त्यांना आधीच देण्यात आली होती. थोड्या शोधानंतर फाइल सापडली. पण त्यात त्यांना हवे होते, ते कागद काही मिळाले नाहीत. तरीही त्यांनी त्या फाइलची छायाचित्रे घेतली. मग त्यांनी त्या फाइली अस्ताव्यस्त फेकून दिल्या. तेथील अन्य कपाटे क्रो-बारने फोडली. त्यातील सामान बाहेर भिरकावून दिलं. औषधाच्या गोळ्या सापडल्या. त्याही इतस्ततः टाकल्या. एकूण चित्र असे उभे केले, की जणू कोणी भुरटे चोर ‘ड्रग्ज’ साठी घुसले होते.
यामुळे पोलिसांनीही ती घरफोडी फार काही गांभीर्याने घेतली नाही. कालांतराने बेव्हर्ली हिल्समधल्या अन्य एका प्रकरणात पोलिसांच्या हाती एक भुरटा चोर लागला. अशा वेळी जगभरातले पोलिस अनेकदा जे करतात, तेच त्यांनी केले. ‘यूसीएल लॉ जर्नल’मधील या प्रकरणाविषयीच्या लेखात तत्कालीन डेप्युटी डिस्ट्रिक्ट टर्नी स्टीफन ट्रॉट सांगतात, पोलिसांनी त्या भागातल्या सगळ्या घरफोड्यांचे खापर त्या चोराच्या माथ्यावर फोडले. खरे घरफोडे मोकळेच राहिले. (government surveillance and privacy)
हे प्रकरण असेच निकाली राहिले असते. पण तसे व्हायचे नव्हते. यानंतर १७ जून १९७२ रोजी अशीच एक घरफोडी
झाली. ती झाली वॉशिंग्टन डीसीमध्ये ‘वॉटरगेट’ नामक इमारत संकुलातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या ‘राष्ट्रीय समिती’च्या मुख्यालयात. पण त्यातले घरफोडे रंगेहाथ पकडले गेले. छान बिझनेस सूटात, हातात सर्जिकल मोजे घालून घुसले होते ते. त्यांच्याकडून पोलिसांनी वॉकीटॉकी, पेनाएवढी टीअरगॅस गन, कुलुपे उघडण्याची हत्यारे जप्त केली. याशिवाय त्यांच्याकडे होते, दोन ३५ मिमी कॅमेरे, ४० फिल्मरोल आणि टेलिफोनबरोबरच खोलीतील सर्व संभाषण ऐकू शकणारी अशी अत्याधुनिक ‘सव्हॅलन्स’ साधने. डेमोक्रॅटिक पक्षाच्या त्या मुख्यालयातील बोलणे ऐकायचे, त्यातून काही भलते सलते हाती लागले तर त्याचा उपयोग निवडणूक प्रचारात करायचा, या हेतूने तेथे ‘बगिंग’ साधने बसवण्यासाठी त्यांचा तो सारा खटाटोप होता.
‘वॉटरगेट’ च्या दणक्याने पाळतखोर सटपटले
सत्ताधारी सत्ता टिकवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, याची असंख्य उदाहरणे जगभरात आहेत. त्यातले हे एक. ‘वॉटरगेट प्रकरण’ म्हणून ते गाजले. त्यावरून पुढे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना जावे लागले. सर्वज्ञात इतिहास आहे तो. येथे प्रश्न हा, या की वॉटरगेट संकुलापासून चार हजार ४०० किमी अंतरावर आणि ९ महिन्यांच्या अंतराने घडलेल्या बेव्हली हिल प्रकरणाशी याचा काय संबंध ? (government surveillance and privacy)
संबंध आहे. वॉटरगेट प्रकरणाच्या खटल्याने त्या रात्री मानसोपचार तज्ज्ञाच्या कार्यालयात घडलेल्या घरफोडीच्या घटनेलाही वेगळी कलाटणी मिळाली. ‘वॉटरगेट’ खटल्यातून उघडकीस आले, की त्या पाच जणांमधील दोघांचा बेव्हलीं हिल्समधील घरफोडीतही सहभाग होता. त्यांच्यावरच हे काम सोपवले होते, ‘व्हाइट हाऊस’मधील ‘स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह युनिट’ने. हे युनिट स्थापण्याची कल्पना होती, ‘व्हाइट हाऊस स्पेशल कौन्सिल’ चार्ल्स कॉल्सन यांची. हा निक्सन यांचा -माफिया डॉनचे ‘कॉन्सिलिअरी’ असतात, तसा उजवा हात. एगिल क्रो हे त्या युनिटचे कारभारी. हेन्री किसिंजर यांचे माजी
सहायक डेव्हिड यंग, माजी एफबीआय एजंट जी. गॉर्डन लिडी, तसेच माजी सीआए अधिकारी आणि हेरकादंबरीकार ई. हॉवर्ड हंट हे या गटाचे प्रमुख सदस्य. ‘प्लंबर्स’ म्हणून ओळखले जाई त्यांना. सत्ताधारी निक्सन प्रशासनास बाधक असलेल्या माहितीची गळती रोखणारे ते प्लंबर्स. फक्त या वेळी, म्हणजे प्रगल्भ लोकशाही देश असलेल्या अमेरिकेत विरोधकांना संपवण्याचे कारस्थान रचणारी अंत्यस्थ यंत्रणा सदा कार्यरत असते. पेंटगॉन पेपर्स प्रकरणात तिचा सहभाग पट्टीच्या खलनायकांनाही लाजवणारा होता… (government surveillance and privacy)
१९७१च्या त्या काळात माहिती आधीच फुटली होती. साधी नव्हती ती. ‘पेंटॅगॉन’चे व्हिएतनाम युद्धासंबंधीचे गोपनीय अहवाल होते, ते.
१३ जून १९७१पासून ‘न्यू यॉर्क टाइम्स ने ती मालिका सुरू केली आणि निक्सन प्रशासन हादरले. ४७ खंड मिळून सात हजार कागदपत्रे ती. त्यातले कोणते कागद बाहेर येतात, त्याची चिंता त्यांना लागून राहिली. ती प्रसिद्ध होऊ नयेत, यासाठी त्यांनी आकाशपाताळ एक केले. त्याचवेळी आणखी गळती होऊ नये, यासाठी व्हाइट हाऊसमधील ‘प्लंबर्स’ कामाला लागले. संशयाची सुई एल्सबर्ग यांच्यावर येऊन थांबली. ते भूमिगत झाले होते. आपल्याकडील सर्व महत्त्वाची कागदपत्रे विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला, की आता न्यायालयात शरण जायचे. त्यांना अटक झाली. राष्ट्रीय गुपिते फोडल्याबद्दल खटला सुरू झाला.
अशा प्रकरणांमध्ये सरकारचा एक हातखंडा प्रयोग दिसतो. तो म्हणजे, समोरील व्यक्तीच्या चारित्र्यावर, नैतिकतेवर, हेतूंवर शंका निर्माण करणे. सर्वत्र हा प्रकार दिसतो. याचे आपल्याकडचे ताजे उदाहरण म्हणजे, सोनम वांगचूक. लडाखमधील पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे काम चालवलेल्या वांगचूक यांनी सरकारविरोधात आंदोलन करताच, त्यांना अटक करण्यात आली आणि अटकेनंतर पहिल्यांदा सरकारच्या पाठीराख्यांनी काय सुरू केले, तर त्यांची बदनामी. ते ‘डीप स्टेट’चे एजंट आहेत, देशद्रोही आहेत, अशा आरोपांची चिखलफेक करण्यात आली. पेंटॅगॉन पेपर्स खटल्यातही हेच करण्यात आले. माजी सीआए अधिकारी हॉवर्ड हंट यांनी कॉल्सन यांना पाठवलेला एक ‘मेमो’ या संदर्भात लक्षणीय आहे. त्या मेमोचा विषय होता
‘न्यूट्रलायझेशन ऑफ एल्सबर्ग’ एल्सबर्ग यांना संपवणे, प्रभावहीन करणे.
‘सिक्रेट्स’ या आपल्या आत्मकथनात एल्सबर्ग यांनी हा मेमो उद्धृत केला आहे. त्यात हंट यांनी लिहिले होते-‘एल्सबर्गवर एक फाइल तयार करण्यासाठीची एक प्राथमिक कार्ययोजना मी प्रस्तावित करीत आहे. एल्सबर्गविषयी उपलब्ध असलेली सर्व प्रकारची उघड, गोपनीय आणि बदनामी करणारी माहिती या फाइलमध्ये असेल. त्याची समाजातली प्रतिमा आणि विश्वासार्हता नष्ट करण्यासाठी हे आवश्यक प्राथमिक साधन आहे.’ ही माहिती कशी गोळा करायची? हंट यांनी बरेच उपाय सुचवले होते. त्यातला एक होता एल्सबर्ग यांचे गुप्तपणे मानसिक मूल्यांकन वा चाचणी करण्याची विनंती सीआयएला करणे. आणि दुसरा उपाय होता त्यांच्या मानसोपचार तज्ज्ञाने त्यांचे जे विश्लेषण केले आहे ती फाइल मिळवणे, बेव्हर्ली हिल्समधील घरफोडी करण्यात आली होती, ती त्यासाठी. केवळ मानसोपचार तज्ज्ञाच्या कार्यालयातून एल्सबर्ग यांच्याविषयीची फाइल पळवण्यापुरताच हा विषय मर्यादित नव्हता. एफबीआयकडून एल्सबर्ग यांचे दूरध्वनी संभाषणही चोरून ऐकले जात होते, ‘टॅप’ केले जात होते. न्यायालयासमोर ही माहिती आली आणि हा सगळा खटलाच फिरला. या सरकारी गैरकृत्यांमुळे न्यायालयाने एल्सबर्ग यांच्यावरील तो खटला निकाली काढला.
पेरी फेलवॉक हे तेव्हा पंचविशीतले तरूण होते. व्हिएतनाममध्ये हेरगिरी केलेल्या फेलवॉक यांना त्या युद्धाचे खरे स्वरूप चांगलेच माहीत होते. आता एल्सबर्ग यांनी फोडलेले ‘पेंटेंगॉन पेपर्स’ त्यांच्यासमोर होते आणि प्रशासनाप्रमाणेच देशातील ‘इंटेलिजन्स कम्युनिटी’ ही कसा भ्रष्ट आचार करते, हेही ते जाणून होते. त्यांनी ठरवले, की ही माहिती लोकांसमोर आणायची. एनएसएचा पर्दाफाश करायचा. त्यातून समोर आले, जागल्यांच्या त्या काळातील एक अत्यंत स्फोटक प्रकरण…
(रवि आमले हे ज्येष्ठ पत्रकार-संपादक, प्रथितयश लेखक आणि भाष्यकार आहेत. त्यांची प्रोपगंडा, रॉः भारतीय गुप्तचर संस्थेची गूढ गाथा, मॅनहंट (अनुवादित), परकीय हात, वरुण ते बहिर्जी आदी पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत.)