Home » Blog » ओसामा बिन लादेनच्या बायका, मुलं सध्या कुठं आहेत?

ओसामा बिन लादेनच्या बायका, मुलं सध्या कुठं आहेत?

by प्रतिनिधी
0 comments

अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्याला २५ वर्षे झाली आहेत. हा हल्ला अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनने घडवून आणला होता. २०११मध्ये लादेनला ठार करण्यात आले. मात्र ९/११च्या हल्ल्याला पंचवीस वर्षे झाल्यानंतर पुन्हा एकदा लादेन चर्चेत आला आहे. ओसामा बिन लादेनचे कुटुंब सध्या कुठे आहे? असा प्रश्न वेळोवेळी समोर येतो.

ओसामा बिन लादेनला जग सोडून १५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र बिन लादेनचे नाव आजही चर्चेत राहते, कारण त्याने जगातील सर्वांत शक्तिशाली देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी हल्ला केला. अमेरिकेला अशी खोल जखम दिली होती, जी विसरणे आजही अमेरिकेसाठी शक्य झालेले नाही. आजही जग त्याला ९/११ या घटनेमुळेच ओळखते.

९/११ रोजी अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी दोन विमाने न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सवर आदवली. त्यामुळे दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या. तिसरे विमान पेंटागॉनवर आदळले. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवळपास ३ हजार लोकांचा मृत्यू झाला. हजारो लोक जखमी झाले.

हेही वाचाः India in UNSC: पाकिस्तान दहशतवादात बुडालेला देश; भारताने तोंडावर सुनावले

या हल्ल्याच्या दहा वर्षांनंतर, २ मे २०११ रोजी, अमेरिकेने पाकिस्तानातील अॅबटाबाद येथे रविवारी रात्री घरात घुसून लादेनला ठार केले. या कारवाईत लादेनच्या कुटुंबातील काही लोकांचाही मृत्यू झाला. त्यानंतर ओसामा बिन लादेनचे कुटुंब सध्या कुठे आहे? असा प्रश्न चर्चेत आहे.

लादेनला वीसहून अधिक मुले

बिन लादेनला त्याच्या पाच पत्नींपासून २०हून अधिक मुले होती. काही वृत्तांमध्ये त्याला २४ मुले असल्याचा दावा केला जातो. अॅबटाबादमध्ये लादेनसोबत त्याचा एक मुलगाही मारला गेला.

सीएनएनचे दहशतवादविषयक विश्लेषक पीटर बर्गन यांनी बिन लादेनच्या विवाहांबद्दल आपल्या The Osama bin Laden I Know: An Oral History of al-Qaeda’s Leader या पुस्तकात लिहिले आहे, ‘त्याचा पहिला विवाह वयाच्या १७व्या वर्षी नजवा घनेम हिच्याशी झाला. ती कदाचित त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. त्यांना ११ मुले होती. मात्र ९/११च्या काही दिवस आधी नजवाने त्याला सोडले.’

हेही वाचाः Abu Saiullah : दहशतवादी अबू सैउल्लाह ठार

बिन लादेनची दुसरी पत्नी खदीजा शरीफ होती. ती त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी आणि शिकलेली होती. दोघांनी १९८३मध्ये विवाह केला. त्यांना तीन मुले झाली आणि अखेरीस १९९०च्या दशकात सुदानमध्ये राहत असताना त्यांचा घटस्फोट झाला. खदीजा नंतर सौदी अरेबियात परतली, असे मानले जाते.

तिस-या लग्नासाठी पहिल्या पत्नीची मदत

बिन लादेनची पहिली पत्नी नजवाने त्याचा तिसरा विवाह खैरिया साबर हिच्याशी होण्यासाठी मदत केली होती. तीही शिकलेली महिला होती आणि तिच्याकडे इस्लामिक शरियामध्ये डॉक्टरेटची पदवी होती. तिने १९८५मध्ये बिन लादेनशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगा झाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००१मध्ये अफगाणिस्तानवर झालेल्या बॉम्बहल्ल्यांत ती वाचली की नाही, याची माहिती नाही.

त्यानंतर सिहाम साबर हिने १९८७मध्ये बिन लादेनशी विवाह केला. त्यांना चार मुले होती. खैरियाप्रमाणेच अफगाणिस्तानवरील हल्ल्यानंतर तिच्याबद्दलही कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बिन लादेनचा पाचवा विवाह अमल अल-सदाह हिच्याशी झाला. दोघांना सफिया ही एक मुलगी होती. अमलला बिन लादेनपासून आणखी पाच मुले झाली.

मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षण

बिन लादेनच्या बहुतांश मुलांबद्दल सार्वजनिकरित्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. CNNच्या वृत्तानुसार, बिन लादेन आपल्या मुलांना आपल्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रशिक्षण देत होता. त्याला काही मुलीही होत्या.

अॅबटाबादमधील कारवाईत लादेनचा २३ वर्षीय मुलगा खालिदही मारला गेला. अमल अल-सदाह सील्सच्या गोळीने जखमी झाली होती आणि लादेनची मुलगी सफियाने आपल्या वडिलांना मरताना पाहिले. त्यानंतर पाकिस्तानने या तीन पत्नी आणि मुलांना ताब्यात घेऊन सौदी अरेबियात पाठवून दिले.

हेही वाचाः रॉ ने पाकिस्तानात घुसून कसा केला दहशतवाद्यांचा खात्मा?

२००९मध्ये त्याचा आणखी एक मुलगा साद बिन लादेन याचाही अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता.

बिन लादेनचा सर्वांत मोठा मुलगा अब्दुल्ला ओसामा बिन लादेन. तो त्याची पहिली पत्नी नजवा घनेम हिचा मुलगा आहे. अब्दुल्ला आठ वर्षांचा असताना बिन लादेन त्याला अफगाणिस्तानात घेऊन गेला होता. तेथे बिन लादेनच्या कठोर वागणुकीमुळे तो त्रस्त झाला. अब्दुल्लाने लग्न केल्यानंतर १९९५मध्ये तो जेद्दाहला आला. त्यानंतर त्याचा आपल्या वडिलांशी कोणताही संपर्क राहिला नाही.

लादेनचा उत्तराधिकारी हमजा

बिन लादेनच्या मुलांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव होते—हमजा बिन लादेन. हमजा हा त्याची तिसरी पत्नी खैरिया साबर हिचा मुलगा होता. बिन लादेनने हमजाला आपला उत्तराधिकारी म्हणून तयार केले होते. बिन लादेनच्या मृत्यूनंतर हमजाच अल-कायदाचे काम पाहत होता. २०१७मध्ये अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले. २०१९मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमजा मारला गेल्याचा दावा केला. मात्र त्यानंतरही अनेकदा हमजा जिवंत असल्याच्या बातम्या येत राहिल्या.

त्याच्या पहिल्या पत्नीचा चौथा मुलगा उमर बिन लादेन हाही चर्चेत राहिला. उमरने एका मुलाखतीत सांगितले होते की, वयाच्या १४व्या वर्षापासून त्याने अल-कायदाच्या छावण्यांमध्ये प्रशिक्षण घेतले होते. निष्पाप लोकांच्या हत्येत सहभागी व्हायचे नसल्याने आपण २०००मध्ये अल-कायदा सोडल्याचा दावा त्याने केला होता.

२०१०मध्ये ABC न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, लहानपणी तो मोठ्याने हसत असताना त्याच्या वडिलांनी—बिन लादेनने—त्याला खूप मारले होते.

उमर बिन लादेन सर्वाधिक चर्चेत

उमर बिन लादेन सर्वाधिक चर्चेत राहिला. सप्टेंबर २००६मध्ये त्याने ब्रिटिश महिला जेन फेलिक्स-ब्राउनीशी विवाह केला. सुरुवातीला दोघे जेद्दाहमध्ये राहत होते. त्यानंतर ते फ्रान्समध्ये राहू लागले. वृत्तसंस्था APनुसार, तो २०१६पासून आपल्या पत्नीसोबत फ्रान्समध्ये राहत होता आणि कलाकार म्हणून काम करत होता.

नंतर फ्रान्सने त्याच्या वास्तव्यावर बंदी घातली. २०२३मध्ये फ्रान्समधून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली. २०२४च्या BBCच्या वृत्तानुसार, फ्रान्समधून बाहेर पडल्यानंतर उमर कतारला गेला होता.

बिन लादेनला ११ मुलगे होते; मात्र त्यातील बहुतांश जणांनी त्याला साथ दिली नाही. हमजा बिन लादेन जागतिक दहशतवादी बनला आणि कदाचित २०१९मध्ये मारला गेला असावा. लादेनच्या मुलींबद्दल मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

लादेनच्या मुलींबद्दल त्याचा अंगरक्षक अबू जंदल यालाही माहिती नव्हती. अबू जंदलने २००५मध्ये कुद्स अल-अरबीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, बिन लादेनला किती मुली आहेत, हे त्यालाही माहीत नाही. त्याने मुलाखतीत असेही सांगितले होते की, बिन लादेनला एकूण ११ मुलगे होते आणि त्यातील काहींनी आपल्या वडिलांची साथ सोडली होती.

You may also like

error: Content is protected !!