जमीर काझी : मुंबई : देशातील भाजपशासित २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी माहिती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून गेली २५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजपाच्यावतीनं १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत देशभरात महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. असेही सांगितले.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकाराशी संवाद साधून केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. (Uniform Civil Code to be implemented in 21 states)
मोदींच्या वाढदिवसापासून सेवा अभियान
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य राबविण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती देताना काँग्रेस व विरोधकांच्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले,’ भाजपाने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने अनेक ठोस निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली आहे. समान नागरी कायदा लागू करणे हे आमचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.२०२९ पूर्वी देशातील भाजपाशासीत २१ राज्यांमध्ये ते लागू केले जाणार आहे. मोदी हे आधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर गेली १२ वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. सलग २५ वर्षे प्रमुख म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद झाला आहे. त्यांच्या कार्याची माहिती देशभरात १७ सप्टेंबरपासून महिनाभरात सेवा अभियान राबविले जाणार आहे. (Uniform Civil Code to be implemented in 21 states)
काही घटक जाणीवपूर्वक राज्यात आणि देशात विकासाच्याआड येत आहेत. फेक नेरेटिव्ह पसरवून जनतेच्या मनात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र देशात व राज्य पातळीवरील नेतृत्व या सर्व गोष्टींवर योग्य तो उपाय काढायला पूर्णपणे सक्षम आहे”, असा विश्वास केंद्रीय व्यक्त केला.
२५ कोटी लोकांची गरिबीवर मात
ते म्हणाले की, २०१४ च्या आधी देश भ्रष्टाचार, घराणेशाही आणि जातिवाद यामुळे ग्रस्त झाला होता. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मार्ग काढून मोठी प्रगती केली आहे. गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केली असून, १६ कोटी लोकांना स्वतःचं घर मिळालं आहे. तसंच, १६ कोटी शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’ योजनेतून प्रत्येकी ६६०० रुपये मिळाले असून, ११ कोटी लोकांना ‘उज्वला’ योजनेतून गॅस जोडणी मिळाली आहे. याचसोबत, ७ कोटी लोकांना वीज मिळाली असून, देशभरात रस्ते आणि रेल्वेचे मोठे पायाभूत (इन्फ्रास्ट्रक्चर) जाळं निर्माण झालं आहे. या सर्व विकासकामांच्या जोरावर मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मोठा विकास साधला आहे, तसंच आपण नक्षलवादावरही पूर्णपणे अंकुश आणला आहे.
आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत नाही
‘जेन झी’ आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘आपण सर्व जण एका महान लोकशाही देशामध्ये राहत आहोत. भारतीय लोकशाही आणि लोकशाही मूल्यांविषयी आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. काँग्रेस पक्षाप्रमाणे आम्ही कोणत्याही प्रकारे आणीबाणीच्या मानसिकतेचे मुळीच नाही आहोत. जनतेला असलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा आम्ही नेहमीच पूर्ण आदर करतो. लोकशाही मार्गाने होणाऱ्या कोणत्याही आंदोलनाचा आवाज दडपण्याचा आमचा प्रयत्न नसतो. (Uniform Civil Code to be implemented in 21 states)