कोल्हापूर: शैक्षणिक क्षेत्रात ‘ए.आय.’ च्या प्रभावाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे आय.टी. तज्ञ व शिक्षणतज्ञ विवेक सावंत यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ वा स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ए.आय. आणि आपण’ हा व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. (Lecture by IT expert and educationist Vivek Sawant)
शिक्षण, तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठित समाजनिर्मिती या ध्येयाने प्रेरित होऊन शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी मोलाचे कार्य केले आहे. असे उदगार विवेक सावंत यांनी काढले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण, उद्योग, संशोधन आणि दैनंदिन जीवनातील वाढता प्रभाव त्यांनी व्याख्यानात स्पष्ट केला.
ए.आय. माणसाची जागा घेणार नाही….
तसेच “ए.आय. माणसाची जागा घेणार नाही; मात्र ‘ए.आय.’ चा प्रभावी वापर करणारा माणूस ‘ए.आय.’ चा वापर न करणाऱ्या माणसाची जागा घेऊ शकतो,” या आशयातून त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. केवळ माहिती मिळविणे पुरेसे नसून त्या माहितीचे विश्लेषण करणे, प्रश्न विचारणे, सर्जनशील विचार करणे आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे ही भविष्यातील गरज असल्याचे विवेक सावंत यांनी स्पष्ट केले. ‘ए.आय.’ मुळे काही पारंपरिक कामांचे स्वरूप बदलणार असले तरी त्याचबरोबर नवीन कौशल्ये, नवीन व्यवसाय आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा निष्क्रिय वापरकर्ता न बनता त्याचा सर्जनशील आणि जबाबदार वापर करणारा व्यक्ती बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सृजनशीलता, भावनिकता कमी होणार नाही यांची काळजी घ्यावी
अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या शिक्षणविचारांचा वारसा जपण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच ‘ए.आय.’ मुळे माणसातील सृजनशीलता, भावनिकता कमी होणार नाही याची काळजी घ्यावी असे विचार मांडले. (Lecture by IT expert and educationist Vivek Sawant)
देवांश गुरव, शरद कांबळेंचा सत्कार
यावेळी संस्थेच्या मिरज शाखेतील विद्यार्थी कु.देवांश गुरव आणि राजे विजयसिंह डफळे हायस्कूल,डफळापूरचे कला शिक्षक श्री. शरद शंकर कांबळे यांनी स्वामी विवेकानंद, डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे हस्तशिल्प तयार केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल,कोल्हापूर येथील विद्यार्थी कु. गोविंद बाबुराव गावडे याने तबला वादनात विश्वविक्रम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
समृद्धी बोळाजचा सत्कार
तसेच एस.एस.सी. परीक्षेत यश मिळवलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, रेंदाळची विद्यार्थिनी बोळाज समृध्दी सोमनाथ, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी तारे चैतन्य उदय, स्वामी रामानंद भारती विद्यामंदीर, तासगावची विद्यार्थीनी गायकवाड अनुष्का हणमंत, बारावीच्या परिक्षेत विवेकानंद कॉलेजची मनुश्री प्रसन्न, दीक्षीत आर्या वरद, संकपाळ अनिष आनंदा यांचाही सत्कार करण्यात आला.
सिद्धनाथ आणि शिवाजी हायस्कूल सर्वोत्तम शाळा
माझी शाळा – सर्वोत्कृष्ठ् शाळा पुरस्कार सिध्दनाथ हायस्कूल, आरवडे छत्रपती शिवाजी हायस्कूल, भोर यांना प्रत्येकी रोख रक्कम दोन लाख व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी प्रार्थना सादर केली. प्रास्ताविक संस्थेचे प्रभारी सचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील व डॉ. कविता तिवडे यांनी केले, तर आभार संस्थेच्या प्रशासन विभागाचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी यांनी मानले.
यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव कांबळे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, सर्व विभागप्रमुख, संस्थेचे आजीव सेवक, आजी माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. (Lecture by IT expert and educationist Vivek Sawant)