Home » Blog » मॅकॉलेचे भूत अजूनही भारताचा गाडा हाकतेय

मॅकॉलेचे भूत अजूनही भारताचा गाडा हाकतेय

by प्रतिनिधी
0 comments
  • सतीश झा

चला, एक अस्वस्थ करणारे सत्य उघडपणे बोलूया. मात्र त्यामुळे मला देशातील प्रत्येक देशभक्त व्हॉट्सअप ग्रुपमधून हद्दपार केले जाईल. आजचा आधुनिक भारत त्याच इंधनावर चालतो, जे १८३५ मध्ये थॉमस बॅबिंग्टन मॅकॉलेने आपल्या रक्तात सोडून दिले. (Macaulay’s Ghost)

आज भारताला आफ्रिकेतील गरीब राष्ट्रांच्या श्रेणीत घसरण्यापासून रोखणाऱ्या गोष्टींपैकी ८० टक्के गोष्टी एका ३४ वर्षांच्या ब्रिटीश उदारमतवादी माणसाने आखून दिल्या होत्या. त्यात आय़टी, औषध निर्मिती, वैज्ञानिक संशोधन, परदेशी चलन उत्पन्न, इंग्रजीत युक्तिवाद करणारे विद्वान वकील वगैरे गोष्टी येतात. तर हा मेकॉले भारतात फक्त चार वर्षे राहिला होता.

मॅकॉलेला असा प्रशासकीय वर्ग हवा होता — जो रक्ताने आणि रंगाने भारतीय असेल. पण बुद्धीने, मतांनी, नैतिकतेने इंग्रज असेल.

मेकॉलेची मुले (Macaulay’s Ghost)

तो नेमका वर्ग त्याने निर्माण केला. त्याला तुम्ही “मॅकॉलेची मुले” म्हणू शकता. आज हा वर्ग म्हणजेच आपल्या मेंदूच्या पिरॅमिडमधील वरची १५–२० टक्के लोकसंख्या. आज भारताचे बहुतेक कर उत्पन्न, परदेशी चलन, वैज्ञानिक संशोधन, कुस्ती सोडून इतर ऑलिंपिक पदके, आणि जवळजवळ संपूर्ण “सॉफ्ट पॉवर” निर्मिती हाच वर्ग करतो.

देशातील उरलेली ८० टक्के लोकसंख्या मेहनती आणि प्रामाणिक आहे. मात्र ते अशा देशात राहतात ज्याचे दरडोई उत्पन्न बोत्स्वाना किंवा गॅबॉनपेक्षा कमी आहे. काही देश तेल आणि हिऱ्यांच्या महासागरावर बसलेत. आपण मात्र जगातील सर्वाधिक वापर न झालेले बुद्धीचे आणि शक्तीचे भांडार घेऊन बसलो आहोत.

कारकून तयार करणारी व्यवस्था? (Macaulay’s Ghost)

गांधीजींपासून ते आजच्या सरकारपर्यंत मॅकॉलेचे टीकाकार एक मुद्दा वारंवार मांडतात. तो म्हणजे – त्याची शिक्षणव्यवस्था कारकून तयार करण्यासाठी होती. ती शिक्षण व्यवस्था नवोन्मेषक नाही. तिने प्रादेशिक भाषेतील प्रतिभा मारून टाकली. शिक्षणाला प्रतिष्ठेचा व्यापार बनवला, आणि पिढ्यान्पिढ्या पश्चिमेकडे मान डोलवणारी मानसिकता तयार केली.

हे सर्व खरे आहे. पण हे टीकाकार वाक्याचा उरलेला भाग क्वचितच बोलतात. (Macaulay’s Ghost)

मॅकॉलेची ही व्यवस्था नसती, तर १९४७ मध्ये २८ राज्ये आणि ५६५ संस्थानांना एकत्र बांधणारा प्रशासकीय कणा भारताकडे नसता. आपल्याकडे कल्पक अभियंते नसते. १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट घडवणारे वैज्ञानिक नसते. १९९१ मध्ये उदारीकरणाचा आराखडा तयार करून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पटवणारे अर्थशास्त्रज्ञ नसते.

प्रजासत्ताक दिनी अनेक गोष्टींचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. त्या जवळपास प्रत्येक मोठ्या कामगिरीमागे मॅकॉलेच्या शिक्षणव्यवस्थेतून तयार झालेले लोक होते. (Macaulay’s Ghost)

आता विरोधी परिस्थिती पाहूया.

आफ्रिकेकडे भारतापेक्षा दहा पट खनिजसंपत्ती, दोन पट सुपीक जमीन, आणि इंग्रजीकरणाचा कमी हस्तक्षेप होता. तरीही सहारा-पुढील आफ्रिकेचे सरासरी उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे.

का?

कारण त्यांच्याकडे विपुल नैसर्गिक साधने आहेत.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, नैसर्गिक संसाधने लुटता येतात; पण मानवी भांडवल लुटता येत नाही. भारताचे एकमेव न-लुटता येणारे संसाधन म्हणजे —इंग्रजी जाणणा-या, विश्लेषणक्षम, थोड्या पण प्रखर बुद्धिमान लोकांचा थर. ज्यांना मॅकॉलेने जन्म घ्यायला मदत केली. बाकी सर्व — कोळसा, नद्या, धातू सारे आपणच भ्रष्टाचाराने, अकार्यक्षमतेने किंवा लालफितशाहीने वाया घालवले.

आणि मॅकॉलेच्या या भेटीचे आपण काय केले?

७८ वर्षे आपण ती संपवण्याचा प्रयत्नच करत आलो आहोत.

मेकॉलेचे भूत गाडण्याची भाषा (Macaulay’s Ghost)

शिक्षणावरचा खर्च जीडीपीच्या फक्त ४.६% वर अडकलेला आहे. त्यातलाही बहुतेक पैसा पगारावर खर्च होतो. शिक्षणावर नव्हे. भारतातील फक्त ५% मुलांना जागतिक पातळीचे शिक्षण मिळते. विद्यापीठांपेक्षा त्यांना नियंत्रित करणारे नियामक जास्त आहेत. आणि ठराविक वर्षांनी एखादा राजकारणी “मॅकॉलेचा भूत गाडण्याची” घोषणा देऊन मते मिळवतो.

जर पंतप्रधान मोदींना खरोखर मॅकॉलेला गाडायचे असेल,तर त्यांनी आधी काही करून दाखवायला पाहिजे. ज्या व्यवस्थेचा ते द्वेष करतात तेवढे तरी करून दाखवायला हवे.

१८० वर्षांपासून चालणारी मॅकॉलेची यंत्रणा आहे. सतत तिरस्कारली गेली. निधीअभावी मार खाल्ला. तरीही तग धरून आहे. एवढेच नव्हे, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचवणारे अंतराळ वैज्ञानिक आणि सिलिकॉन व्हॅली चालवणारे अभियंते ती तयार करते.

स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांत काय झाले?

आणि स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली तरी भारत आपल्या अर्ध्या मुलांना पाचवीपर्यंत नीट वाचायला शिकवू शकलेला नाही. (Macaulay’s Ghost)

म्हणून आपण रस्त्यांची नावे बदला, नवी पाठ्यपुस्तके छापा, आणि छाती ठोकून घोषणाबाजी करा असले उद्योग करतो. यात काहीच वावगे नाही. पण लक्षात ठेवायला हवे- जेव्हा एखादी भारतीय कंपनी ब्रिटिश फुटबॉल क्लब विकत घेते, जेव्हा एखादा भारतीय-अमेरिकन अमेरिकेच्या एखाद्या राज्याचा गव्हर्नर बनतो, जेव्हा एखादी भारतीय लस आफ्रिकेतील एखाद्या मुलाचे प्राण वाचवते, तेव्हा मॅकॉले कबरीतून हसतो.

आणि जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये आपले एकही विद्यापीठ नसते. आयआयटीचा प्रतिभावान विद्यार्थी अमेरिकेत निघून जातो कारण भारताला त्याचा काही उपयोग होत नाही — तेव्हा मॅकॉले पुन्हा जिंकतो.

आपण मॅकॉलेला स्वीकारायचे की १८३५ मध्ये “मेलेली” कथित स्वच्छ, पवित्र भारतीय शिक्षणपद्धती पुन्हा उभी करायची, हा खरा प्रश्न नाही.

मॅकॉलेविरोध निरर्थक

खरा प्रश्न आहे — आपण मॅकॉलेच्या व्यवस्थेपेक्षा अधिक चांगली शिक्षणव्यवस्था तयार करणार आहोत का? की आपण फक्त मॅकॉलेचे पुतळे जाळत राहणार आहोत. आणि आपली स्वतःची मुले त्या “कोचिंग फॅक्टरींमध्ये” पाठवत राहणार आहोत. जी त्याच्याच शिकवणुकीला पुढे नेतात.

जोपर्यंत आपण हा निर्णय घेत नाही, तोपर्यंत “मॅकॉलेविरोधी” भाषणे निरर्थक आहेत. (Macaulay’s Ghost)

कारण आजही भारताचे बिल ही मॅकॉलेची मुलेच भरताहेत. आणि बाकीचे आपण — डावे, उजवे, भगवे, लाल किंवा तिरंगा —अशा बुद्धीच्या भांडवलावर जगतोय, जे आपण कधी पुन्हा निर्माणच केले नाही.

हे आरोपपत्र मेकॉलेवर नाही.

हे आपल्यावरचेच आरोपपत्र आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. जनसत्ता या हिंदी दैनिकाचे सहसंस्थापक तसेच टाइम्स ग्रूपच्या दिनमान साप्ताहिकाचे माजी संपादक आहेत.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00