Home » Blog » ‘वंदे मातरम’ गात लोक फासावर चढत असताना फडणवीसांची पूर्वजांची इंग्रजांना साथ 

‘वंदे मातरम’ गात लोक फासावर चढत असताना फडणवीसांची पूर्वजांची इंग्रजांना साथ 

by प्रतिनिधी
0 comments
Harshvardhan Sapkal criticizes Fadnavis

जमीर काझी : मुंबई : वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध आहे असे चित्र रंगवणाऱ्या भाजपाला यावर बोलण्याचा अधिकारच नाही. वंदे मातरम गात गात स्वातंत्र्य सैनिक देशासाठी फासावर चढले, गोळ्या झेलल्या त्यावेळी फडणविसांचे पूर्वज इंग्रजांचे तळवे चाटत होते व स्वातंत्र्यचळवळीपासून कोसो दूर होते. वंदे मातरमला काँग्रेस पक्षानेच राष्ट्रगिताचा दर्जा दिला. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरु यांनी वंदे मातरमची दोनची कडवी गायली जावीत हा निर्णय घेतलेला आहे. आता भाजपाच्या मोदी, शाह व फडणवीस या विद्वानांना मात्र ते मान्य नाही कारण हे महाशय स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजू लागले आहेत. वंदे मातरम वरून सोनियाजी गांधी यांच्याबद्दल खोटे आरोप करणे भाजापाने थांबवावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. (Harshvardhan Sapkal criticizes Fadnavis)

राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या छात्रों की गुंज अभियानाची प्रचंड धास्ती भारतीय जनता पक्ष व राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी घेतली  आहे. छात्रों की गुंज वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी मागील १३ वर्षात मोदी व फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर सांगावे, असे आव्हानही सपकाळ यांनी दिले.

फडणवीसांच्या फेकाफेकीवर तरुणाई विश्वास ठेवणार नाही

भाजपाच्या पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,’ त्यांच्या सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीत जंतरमंतरसह देशभरात तरुणाई रस्तावर उतरली नसती. आता भाजपाला ‘पळता भूई थोडी झाली’ असल्याने भाजपा अपप्रचार करत आहे परंतु भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कितीही फेकाफेकी  केली, राहुल गांधी व काँग्रेसला बदनाम करण्य़ाचा प्रयत्न केला तरी तरुणाई त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. राहुल गांधी यांनी भाजपाची झोप उडवली असून त्यांना, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, राहुल गांधींच दिसू लागले आहेत.

छात्रो की गुंजला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाजपच्या पोटात गोळा

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ हा विद्यार्थीनी विशेष कार्यक्रमाला मुलींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हे पाहून भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे. राहुल गांधी यांनी वर्मावरच घाव घातल्याने देवेंद्र फडणवीस ‘छात्रों की गुंज’ वर तोंडसुख घेत आहेत. पुण्यातील समाजसुधारणेचे दाखले देताना  फडणवीस हे विसरले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात मुलींसाठी पहिली शाळा ज्या पुण्यात काढली, त्या सावित्रीबाईंना धर्म बुडवणारी असा आरोप करत त्यांच्यावर दगडगोटे, शेणाचे गोळे फेकणारे फडणवीस यांचेच वैचारिक पूर्वज होते. ‘कौन राहुल?’ म्हणणारेही आज दिवसरात्र राहुल गांधी यांचाच जप करत आहेत. (Harshvardhan Sapkal criticizes Fadnavis)

फडणवीस राहूल गांधींवर खोटे आरोप करत आहेत

 भाजपा सरकारला एकही परीक्षा व्यवस्थित घेता आलेली नाही, नीट पेपरफुटी, सीबीएसी, तलाठी, टीईटी, कोर्टातील लिपिक परिक्षा, पुणे महानगरपालिकेतील भरती परिक्षा, एमएमआरडीए मधील परीक्षा, एमपीएससीची एफडीएचा पेपर  यासह अनेक परिक्षांचे पेपर फुटले, यामुळे प्रामाणिक व मेहनती विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले, भाजपा सरकार व देवेंद्र फडणवीस यांना यावर उत्तर देता येत नाही म्हणून ते राहुल गांधी व काँग्रेसवर खोटे आरोप करत आहेत.,असेही सपकाळ यांनी सांगितले.

डिलिमिटेशन विधेयक आणण्याचा डाव

   महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्ष विरोध करत आहे, हा  फडणवीस यांचा आरोप धादांत खोटा व हास्यास्पद आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारा काँग्रेस हाच पहिला पक्ष आहे व विधानसभा व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण द्यावे ही मागणीही सोनियाजी गांधी यांनीच लावून धरली होती. आता फडणवीस व भाजपा काँग्रेस व विरोधकांना महिला विरोधी ठरवत आहेत. महिला आरक्षण विधेयकाला कोणाचाच विरोध नाही, विरोध आहे तो भाजपाच्या मानसिकतेला, कारण भाजपाला महिला आरक्षण नाही तर डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून देशाचे दक्षिण व उत्तर असे दोन तुकडे करायचे आहेत. हा देशविरोधी मनसुबा विरोधी पक्षांनी उधळून लावला आहे म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे.

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या

महिला आरक्षणावरून काँग्रेसला प्रश्न विचारत प्रियंका गांधींना संधी द्या, असा सल्ला देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी त्यांच्यात पक्षातील पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देऊन महिलांना संधी देण्याचा आदर्श घालून द्यावा, त्यानंतर काँग्रेसला उपदेशाचे डोस पाजावे. पंकजा मुंडे यांचे पक्षात कोणी व कसे खच्चीकरण केले हे जाहीरपणे सांगायची आमच्यावर वेळ आणू नका, असेही सपकाळ म्हणाले. (Harshvardhan Sapkal criticizes Fadnavis)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!