कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमाला शिवसेना युवासेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसह संविधान युवा प्रतिष्ठानने जोरदार आक्षेप घेतला. शिवाजी विद्यापीठाचा राजकीय अड्डा करु नका असा इशारा विद्यापीठाला दिला. असे कार्यक्रम होणार असतील तर भविष्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षही कार्यक्रम घेईल असा स्पष्ट केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Shiv Sena and MNS oppose ABVP’s event)
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात गुरुवारी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले हाते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विकास मंच आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असा फलक लावला होता. या फलकावर शिवाजी विद्यापीठ, अभाविप आणि विकास मंचचा लोगो होता. ‘विद्यार्थ्यांची उपस्थिती, वास्तव,आव्हाने आणि उपाययोजना’ असा परिषदेचा विषय होता. या कार्यक्रमासाठी अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री देवदत्त जोशी, शिक्षण सहसंचालक प्रकाश बच्छाव हे प्रमुख अतिथी होते. कुलगुरू डॉ.आर.के. कामत हे अध्यक्ष तर ज्योती जाधव आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सिद्धार्थ शिंदे यांची उपस्थिती दर्शवणारा फलक व्यासपीठावर होता. अभाविपचे महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील गुरव, व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. स्वागत परुळेकर यांनी संयोजन केले होते. (Shiv Sena and MNS oppose ABVP’s event)
विद्यापीठात राजकीय अड्डा सुरू असल्याचा आरोप
या कार्यक्रमाला शिवसेना, मनसे, संवेद संघटनेने आक्षेप घेतला. कुलगुरू डॉ. आर.के कामत यांची शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष मंजित माने, मनसे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अभिजीत राऊत, मनसे विद्यार्थी शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे, संविधान सन्मानचे निलेश बनसोडे, विकी कांबळे, गौरव कांबळे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. अभाविप ही भाजपची यूथ विंग असून हा कार्यक्रम घेत असताना कोणत्याही विद्यार्थी संघटनांना आयोजकांनी आमंत्रित केले नव्हते. यावरुन शिवाजी विद्यापीठात राजकीय अड्डा सुरू आहे असा आरोप यावेळी केला. तसेच संबधित कार्यक्रमाच्या निमंत्रित पत्रिकेबाबतही कुलगुरु कामत यांच्याकडे विचारणा केली. या पत्रिकेबाबत मला कोणतीही माहिती नाही असे उत्तर कुलगुरुंनी दिल्याचे शिवसेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप केला.
भविष्यात शिवाजी विदयापीठ व युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे, मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे आणि संवेद विद्यार्थी संघटनेचे सुजात आंबेडकर यांना घेऊन विद्यार्थी हिताचा कार्यक्रम केला जाईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Shiv Sena and MNS oppose ABVP’s event)