पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला मायभूमीत चारली पराभवाची धूळ

पर्थ, वृत्तसंस्था : पर्थमध्ये झालेल्या वन-डे मालिकेतील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला आठ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा  वन-डे मालिकेत २-१ ने पराभव केला. यासह पाकिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१.५ षटकांत १४० धावा सर्वबाद झाला.  यात ऑस्ट्रेलियाच्या शॉन ॲबॉटने सर्वाधिक ३० धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीमध्ये पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना  पाकिस्तानने २६.५ षटकांत दोन फलंदाज गमावून हे आव्हान पार केले. फलंदाजीमध्ये सॅम आयुबने सर्वाधिक ४२ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून लान्स मॉरिसने दोन फलंदाज बाद केले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने १४० धावा केल्या. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना मैदानावर फार काळ टिकता आले नाही. यात त्यांच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यामध्ये जेक फ्रेझर मॅकगर्क (७), कर्णधार जोश इंग्लिस (७), कूपर कॉनोली (७), मार्कस स्टॉइनिस (८), ग्लेन मॅक्सवेल (०) आणि लान्स मॉरिस (०) यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाकडून शॉन ॲबॉटने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याच्यासह मॅथ्यू शॉर्ट (२२), ॲरॉन हार्डी (१२), ॲडम झाम्पा (१३), बाद झाले, तर स्पेन्सर जॉन्सन १२ धावांवर  नाबाद राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर हरिस रौफने दोन गडी बाद केले. मोहम्मद हसनैनला एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. सॅम अयुब आणि अब्दुल्ला शफीक यांनी ८४ धावांची सलामी दिली. शफीक ५३ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला, तर सॅम अयुब ५२ चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ४२ धावा करून बाद झाला. यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची धुरा आपल्याकडे घेत संघाला विजय मिळवून दिला. यात  रिझवान आणि बाबर  यांनी ५८ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत लान्स मॉरिसने दोन गडी बाद केले.

२२ वर्षांनी ऑस्ट्रेलियात मालिका विजय

पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पाकिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा मायभूमीत द्विपक्षीय वन-डे मालिकेत पराभव केला. याआधी पाकिस्तानने २००२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय वन-डे मालिका २-१ ने जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिकेत पाकिस्तानची कामगिरी

  • पाकिस्तान २-१ ने विजयी (२०२४)
  • ऑस्ट्रेलिया ४-१ ने विजयी (२०१७)
  • ऑस्ट्रेलिया ५-१ ने विजयी (२०१०)
  •  पाकिस्तान ३-२ ने विजयी (२००२)

Related posts

‌Bengal Record : बंगालचा विक्रमी धावांचा पाठलाग

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट