Ashwin Retirement : “अपमान झाल्यानेच अश्विनची निवृत्ती?”

चेन्नई : अश्विनच्या निवृत्तीमागे त्याचा झालेला अपमान हेसुद्धा एक कारण असू शकते, असा दावा त्याचे वडील रविचंद्रन यांनी केला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. (Ashwin Retirement)

गुरुवारी अश्विनचे चेन्नईमध्ये आगमन झाले. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अश्विनच्या अचानक निवृत्तीमुळे क्रिकेटविश्वातील अनेकांसह चाहत्यांनाही धक्का बसला होता. कुटुंबियांसाठीसुद्धा ही घोषणा तितकीच धक्कादायक होती, असे रविचंद्रन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. “मला अखेरच्या क्षणी ही गोष्ट समजली. त्याच्या मनात काय चालले होते, ते मला माहीत नाही. मात्र, मी आनंदाने त्याच्या निर्णयाचे स्वागत केले. निवृत्त होणे ही त्याची इच्छा होती. मी त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, त्याने ज्याप्रकारे ही घोषणा केली, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याचा झालेला अपमान हेसुद्धा त्यांपैकी एक कारण असू शकते,” असे रविचंद्रन म्हणाले.

“निवृत्तीची घोषणा धक्कादायक असली, तरी कुठे ना कुठे आम्हाला ते अपेक्षित होते. कारण, त्याचा अपमान होत होता. आणखी किती काळ त्याने अपमान सहन करायचा? बहुधा त्याने स्वत:हूनच त्याबाबत निर्णय घेतला असावा,” असे रविचंद्रन यांनी सांगितले. रविचंद्रन यांच्या विधानानंतर त्यांचा रोख नेमका कोणावर आहे, याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी वाद झाल्यामुळेच अश्विनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याचीही चर्चा आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेतील आतापर्यंत झालेल्या तीनपैकी दोन कसोटींत अश्विनचा अंतिम संघामध्ये समावेश नव्हता. केवळ ॲडलेड येथील दिवस-रात्र कसोटीसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले. या कसोटीत त्याला फक्त एक विकेट घेता आली होती. (Ashwin Retirement)

वडिलांच्या वक्तव्याबाबत अश्विनची सारवासारव

वडिलांनी अश्विनचा अपमान झाल्याचा दावा केल्यानंतर काही वेळातच स्वत: अश्विनला याबाबत ट्विट करून सारवासारव करावी लागली. “माझ्या वडिलांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे प्रशिक्षण आणि अनुभव नाही. क्रिकेटपटूंच्या वडिलांनी वादग्रस्त विधाने करण्याची समृद्ध परंपरा तेसुद्धा सुरू ठेवतील, असा विचार मी केला नव्हता. त्यांना क्षमा करून एकटे सोडावे, अशी मी विनंती करतो,” अशी मिश्किल प्रतिक्रिया अश्विनने दिली आहे. या ट्विटमधून अश्विनने युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनाही अप्रत्यक्ष कोपरखळी मारली आहे.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत