मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. चार ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी ५१२२ एमपीएससीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होणार आहेत. (Anukampa Job)
शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील ५१८७ अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. (Anukampa Job)
चार ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधी १०० दिवस आणि नंतर १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता. (Anukampa Job)
सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात
यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टंकलेखक श्रेणीतील ५१२२ उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण १०,३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३०७८ उमेदवार हे कोकण विभागातील असून, २५९७ हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात १६७४ नाशिक विभागात १२५०, तर मराठवाड्यातील १७१० उमेदवार आहेत. (Anukampa Job)