चांदोलीत आढळला दुसरा वाघ

सांगली; प्रतिनिधी : चांदोली राष्ट्रीय उद्यानात दुसऱ्या वाघाचे अस्तित्व आढळले आहे. नुकतेच अधिवास देखरेखीसाठीच्या कॅमेऱ्यात वाघाचे काही फोटो मिळाले असून, गस्तीदरम्यान वाघाच्या पावलांचे ठसेही मिळाले. व्याघ्र प्रकल्पाच्या टायगर सेलच्या संशोधन विभागाने या फोटोंचे विश्लेषण केल्यानंतर आधीच्या ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह टी-१’चे ते नसून दुसऱ्याच वाघाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे आता या नव्या वाघाचे ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह टी-२’ असे नामकरण केले आहे. सलग दोन वर्षांत राखीव क्षेत्रात दोन वाघांचे अस्तित्व दिसून आले आहे. चांदोली वन्यजीव विभागामध्ये २०१८ नंतर प्रथमच १७ डिसेंबर २०२३ रोजी वाघ आढळला होता. सह्याद्रीतील मुसळधार पावसातही या वाघावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष होते. गेले वर्षभर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्येच त्याचे वास्तव्य आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्थेकडून सह्याद्रीत वाघाचे पुन्हा अस्तित्व प्रस्थापित व्हावे यासाठी ही मोहीम सुरू असून, त्याला चांगले यश येत आहे. ताडोबा व्याघ्र राखीवमधून सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघ पुनर्स्थापनेसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच याची कार्यवाही सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी कॅमेरे लावून अस्तित्व निश्चित केले जात आहे.

वन्यजीव अभ्यासक व संशोधक गिरीश पंजाबी यांनी या वाघाची राधानगरी अभयारण्यमध्ये १३ एप्रिल २०२४ रोजी नोंद झाल्याचे सांगितले. राधानगरी अभयारण्यामधून उत्तरेस भ्रमण मार्गावाटे जवळपास १०० किलोमीटरचा प्रवास करीत हा वाघ सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मुक्कामी आल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही वर्षांत दक्षिणेस तिलारी ते राधानगरी या व्याघ्रभ्रमण मार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. एकूण १४ वाघांच्या नोंदी या भ्रमणमार्गात आत्तापर्यंत झाल्या आहेत. तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गातून हे दोन्ही वाघ उत्तरेस सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात नैसर्गिकरीत्या आले आहेत. यावरून हा भ्रमणमार्ग सुरक्षित असल्याचे सिद्ध होते. त्याचे चांगले परिणाम इथे नव्याने वाघ आल्यानंतर दिसतील, असा अंदाज पंजाबी यांनी व्यक्त केला.

क्षेत्रसंचालक रामानुजम, चांदोलीच्या उपसंचालक स्नेहलता पाटील, कोयनाचे उपसंचालक किरण जगताप, आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांनी या नव्या वाघाचे नामकरण केले.

” सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सलग दोन वर्षांत दोन वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. आता आढळलेला वाघ थोडा लहान आहे. दोन्ही नर आहेत. त्यांच्या अधिवासावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.”

– स्नेहलता पाटील, उपसंचालक, चांदोली वनक्षेत्र

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी