rajya natya : ताणलेल्या कॅनव्हासवरील ‘फर्सिकल इव्हेंट’

प्रा. प्रशांत नागावकर : दुधात पाणी किती घालावे यालाही काही प्रमाण असते. ते प्रमाणापेक्षा जास्त झाले तर दुधातील आवश्यक सत्व निघून जाते. चवही मिळमिळीत होते. राज्य नाट्य स्पर्धेत गायन समाज देवल क्लब यांनी सादर केलेल्या ‘म्याडम’ या नाटकाच्या संदर्भात काहीसे असेच झाले.
नाटकात नाट्याविष्काराचा भाग खूप कमी होता. सध्या सुरू असलेल्या ‘कॉमेडी शो’चा बराचसा प्रभाव जाणवला. एकूणच ‘ताणलेल्या कॅनव्हासवरील ‘फार्सिकल इव्हेंट’ असंच त्याला म्हणता येईल. (Madam)

ऋषिकेश तुराई हे नाटकाचे लेखक. मुळात ही एकांकिका म्हणून सुरुवातीला सादर झाली. या एकांकिकेचा विस्तार करून दोन अंकी नाटकात रूपांतर करण्यात आहे. विस्तरीकरणामुळे नाटकाच्या विषयातील आत्माच हरवून गेला आहे. शिक्षण हा अत्यंत गंभीर विषय. अत्यंत सजगतेने आणि जागरूकतेने त्याच्याकडे पाहणे गरजेचे आहे. पण नाटक विनोदी करण्याच्या हव्यासापोटी लेखक विषयापासून भरकटत गेल्याचे दिसून आले. हे मान्य आहे की, विनोदी नाटकातूनही गंभीर विषय तितक्यात ताकदीने हाताळला जाऊ शकतो. पण नाटकातील संवादातून निर्माण होणारा चुटकुल्या स्वरूपातला विनोद आणि संपूर्ण नाटक झाल्यानंतर समग्र विनोदाची येणारी अनुभूती ही वेगळी असते.(Madam)

या नाटकाचे सादरीकरण अतिशय उत्कृष्ट झाले. पण क्षणाक्षणाला टाळ्या आणि हंशा प्राप्त होणे हे काही नाटकाच्या यशस्वीतेचे निकष नाहीत. लेखन पातळीवर विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत मूळ विषय हरवून गेला आहे. ज्या गांभीर्याने नाटक विषयाकडे जायला हवे होते ते तसे गेले नाही. हे जे लिखाणाच्या पातळीवर झाले आहे तसेच ते सादरीकरणाच्या पातळीवरही झाले आहे. एका कष्टकरी कामगार वर्गातल्या स्त्रीला आपल्या मुलीने दहावी पास होऊन तिने उच्च शिक्षण प्राप्त करावे असे वाटणे साहजिकच आहे. त्यासाठी तिची चाललेली धडपड, ती करत असलेला संघर्ष तीव्रतेने सादरीकरणाच्या पातळीवर येत नाही. पहिल्या अंकात मुलीला दहावीची परीक्षा अवघड वाटत असते. त्यात इंग्रजी विषयाचा पेपर देणे ही तर खूपच अवघड गोष्ट आहे, अशी तिची धारणा असते. दुसऱ्या अंकातही हाच मुद्दा वारंवार येत जातो आणि या नाटकाचा आशयाचा जो केंद्रबिंदू आहे तो दोन तासानंतर शेवटी येतो. आईने आपल्या मुलीने पेपर द्यावा, ती का देत नाही? तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे? हे समजून घेऊन तिने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने स्वतः शिकून मग आपल्या मुलीला शिकवण्याचा निर्णय घेते आणि तो निर्णय प्रत्यक्षात अमलात ती कसा आणते, कसा संघर्ष करते. हा या नाटकाच्या दुसऱ्या अंकाचा केंद्रबिंदू झाला असता तर सुरुवातीला विनोदी वाटणारे नाटक गंभीर विषयाकडे सरकले असते. आणि ते जास्त अपील झाले असते.(Madam)
सादरीकरणातील जमेची बाजू म्हणजे कलाकारांची अभिनयातील सहजता, आत्मविश्वास आणि उत्स्फूर्तपणा. वैष्णवी पोतदार आणि त्रिवेणी ठाकूरदेसाई यांनी अक्षरश: दंगा घातला. त्यांनी निर्माण केलेला ‘कल्लोळ’ नियंत्रित आणि सकारात्मक असता तर नाटक आणखी एका वेगळ्या उंचीवर गेले असते. कौतुक आहे ते त्रिवेणी ठाकूरदेसाईचे. तिचे रंगमंचावरील पहिले पाऊल, पहिले नाटक. पण ज्या आत्मविश्वासाने ती रंगमंचावर वावरली ते कौतुकास्पद आहे. वैष्णवी पोतदारने नेहमीप्रमाणे बाजी मारली. यापूर्वी तिला एकांकिका, पथनाट्य या प्रकाराचा चांगलाच अनुभव आहे. असावरी नागवेकर रंगभूमीवरील एक अनुभवी व्यक्तिमत्व. कमालीचा सहजपणा हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य. रंगमंचावरील त्यांच्या हालचाली, संवादफेक सहज आणि तितकीच नैसर्गिक स्वरूपाची होती. एवढ्या सगळ्या सकारात्मक बाजू असतानाही त्या व्यक्तिरेखा उभी करण्यात अयशस्वी ठरल्या.
दिग्दर्शनाच्या पातळीवर अनुपम दाभाडे हे अयशस्वी ठरले आहेत. नाटकातल्या गंभीर विषयाला ते न्याय देऊ शकले नाहीत. एकांकिकेचे नाटकात रूपांतर होत असताना दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून लेखकाला सूचना देणे गरजेचे होते. तसेच बदल करून घेणे अपेक्षित होते, पण झाले नाही. नेपथ्य छान झाले. याचा अर्थ ते केवळ ‘सुंदर’ दिसले. पण संहितेनुसार एका मोलकरणीचे घर असा उल्लेख आहे. काही ठिकाणी झोपडी असेही संवादातून स्पष्ट होते. पण रंगमंचावर मांडलेल्या रचनेतून कुठूनही ती झोपडी वाटत नव्हती.
प्रकाशयोजनेत सफाई जाणवत होती. पण प्रकाश योजनाही रोषणाईकडे अधिक झुकत होती. घराच्या फ्लॅटच्या मागे असलेली इंग्रजी अक्षरे मागच्या प्रकाशातून रिफ्लेक्ट होत होती. नाटकातील प्रसंगांना साजेसे असे पार्श्वसंगीत होते. पण बहुतांशी ८० च्या दशकातील गाजलेल्या गाण्यांचे प्रयोजन लक्षात आले नाही.
सादरीकरण उत्कृष्ट झाले असले आणि नाटक बऱ्यापैकी रंगले असले तरी त्यातला विषय आणि आशय मात्र हरवून गेला. गायन समाज देवलने आत्तापर्यंत सादर केलेल्या नाटकाच्या परंपरेशी हे नाटक मात्र फटकून होते.

(छायाचित्र : अर्जुन टाकळकर)

 

  • नाटक : म्याडम
    लेखक : ऋषिकेश तुराई
    सादरकर्ते : गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर.
    दिग्दर्शक : अनुपम दाभाडे
    नेपथ्य : गायत्री कुंभार, ओंकार मासारणकर
    प्रकाशयोजना : अर्जुन पिसाळ
    संगीत संयोजन : प्रथमेश बारस्कर
    वेशभूषा : श्वेता खटावकर
    रंगभूषा : अवधूत सावंत
  • भूमिका आणि कलावंत
    रुक्मिणी : गायत्री कुंभार
    चिंगी : त्रिवेणी ठाकूरदेसाई
    सुमन : वैष्णवी पोतदार
    मंगल : आसावरी नागवेकर

Related posts

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड