Home » Blog » संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध प्रकल्पाचे रविवारी लोकार्पण

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध प्रकल्पाचे रविवारी लोकार्पण

by प्रतिनिधी
0 comments
Inauguration of Keshavrao Bhosale Natyagriha

कोल्हापूर  : प्रतिनिधी : दोन वर्षापूर्वी जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आहे त्या रुपात नव्याने उभारणी झाली असून रविवारी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकाम, रंकाळ्यातील संगीत कारंजा, राजर्षी शाहू समाधीस्थळ सभागृहासह अनेक प्रकल्पाचे लोकार्पण आणि विविध प्रकल्पाचे भूमीपूजन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह तसेच प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी लोकार्पण कार्यक्रमांची माहिती दिली. (Inauguration of Keshavrao Bhosale Natyagriha. Kolhapur)

            या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर सौ. रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडीक, शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, अमल महाडीक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, पोलिस अधीक्षक निलोत्पल तसेच अन्य लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Inauguration of Keshavrao Bhosale Natyagriha. Kolhapur)

हॉकी स्टेडियम, शाहू समाधीस्थळ सभागृहाचे लोकार्पण

            या प्रसंगी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह,  मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील ॲस्ट्रोटर्फ मैदान, दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील बहुमजली पार्किंग इमारत, गोकूळ हॉटेलजवळील मेकॅनिकल पार्किंग, नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळावरील सभागृह,  रंकाळा तलावातील आकर्षक संगीत कारंज्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

४८४ कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन

            याच कार्यक्रमात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) अंतर्गत सुमारे रु. ४८४ कोटी खर्चाच्या महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून, या प्रकल्पामुळे कोल्हापूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

कागलमध्ये राजर्षी शाहू पुतळ्यांचे अनावरण

मंत्री हसन मुश्रीफ यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटनानंतर प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि जाहीर सभा होणार आहे. तसेच कागल येथे हिंदूराव घाडगे विद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या जीर्णोद्धार कामांचे उद्घाटन आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पणही याच दिवशी होणार आहे, अशी माहिती दिली. (Inauguration of Keshavrao Bhosale Natyagriha. Kolhapur)

You may also like

error: Content is protected !!