Home » Blog » मोदींनी आधी स्वतःचे दौरे थांबवावेत, मग जनतेला सांगावे; राज ठाकरेंचा हल्लाबोल!

मोदींनी आधी स्वतःचे दौरे थांबवावेत, मग जनतेला सांगावे; राज ठाकरेंचा हल्लाबोल!

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray criticizes Modi

जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचं तेलाचा वापर कमी करण्याबाबत केलेल्या आवाहनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मोदींनी आधी स्वतःचे स्वतःचे दौरे आणि ताफे थांबवावेत अन् मग जनतेला सांगावे, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरें यांनी पंतप्रधानावर केला. तर जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी सर्व पक्षाची बैठक बोलावून देशाची सध्य परिस्थिती स्पष्ट करा, असे आव्हान केले आहे. (Raj Thackeray criticizes Modi)

 इराण-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीनी रविवारी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केल्यानंतर त्याला सर्व स्तरावरून टीकेची झोड उठली आहे. राज ठाकरे, शरद पवार व काँग्रेस नेते नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,सचिन सावंत आदींनी एक्सवर पोस्ट करीत टीकेची झोड उठवली आहे.

रोड शो तील इंधनाचा हिशोब कोण देणार?

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रातून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर, वाढत्या महागाईवर आणि इंधन दरांवर कठोर टीका केली. “सोनं खरेदी कमी करा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, परदेश दौरे टाळा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा, असं सांगताना स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी देशभर शेकडो वाहनांचे ताफे घेऊन रोड शो आणि मिरवणुका काढत आहेत. त्या खर्चाचा आणि इंधन वापराचा हिशोब कोण देणार?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. (Raj Thackeray criticizes Modi)

स्वस्त पेट्रोल डिझेल महाग दरात विकून कमावलेले लाखो कोटी रुपये कुठे आहेत?

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ९० ते १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याची ही पहिली वेळ नाही. “२००८, २०११-१२ मधील अरब स्प्रिंग, २०१३-१४ आणि २०२२-२३ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावरही गंभीर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी “जेव्हा कच्च्या तेलाचे दर ६० ते ६५ डॉलर होते, तेव्हाही नागरिकांना महाग पेट्रोल-डिझेल विकण्यात आलं. त्यातून सरकारने लाखो कोटी कमावले. तो पैसा नेमका कुठे गेला?”“देशाची आणि राज्यांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, मात्र त्याचं खापर केवळ इराण-इस्रायल युद्धावर फोडलं जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनावर बोलताना राज यांनी भाजपाच्या प्रचारसभांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देशभरातील निवडणुकांमध्ये लाखो लोकांना विमाने , बस आणि गाड्यांमधून नेण्यात आलं. रोड शोमध्ये कोट्यवधी लिटर इंधन खर्च झालं. तेव्हा इंधन बचतीची आठवण का झाली नाही?” असा सवाल त्यांनी केला.

 “जनतेला परदेश दौरे टाळा म्हणणारे पंतप्रधान स्वतः १५ मेपासून पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आधी हे दौरे रद्द करा आणि मग लोकांना आवाहन करा,” माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांचा संदर्भ देत, “शास्त्रीजींनी युद्धकाळात जनतेला केलेलं आवाहन स्वतः कृतीत उतरवले होतं. आजचं नेतृत्व ते करणार का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Raj Thackeray criticizes Modi)

इंधन दरवाढीचे उत्तर सरकारला द्यायला हवे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारनं आर्थिक वास्तव जनतेसमोर मांडावे अशी भूमिका घेतली. “महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढीच्या प्रश्नांवर सरकारनं उत्तर द्यायला हवे. फक्त जनतेला संयमाचे आवाहन करून चालणार नाही,” असे नमूद करीत त्यांनी संकटाच्या काळात सरकारने स्वतः उदाहरण घालून द्यावे, असा टोला लगावला.

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीनं बैठक घेऊन परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा व पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा, असंही पवारांनी नमूद केलं.

 काँग्रेस नेते नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,सचिन सावंत यांनीही सरकारवर टीका करत, “जनतेला काटकसर शिकवण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी जाहिराती, रोड शो, सुरक्षा ताफे आणि परदेश दौऱ्यांवरील खर्च कमी करावा,” असं म्हटले. “देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर असेल, तर त्यावर संसदेत चर्चा व्हावी आणि सरकारने स्पष्ट रोडमॅप द्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00