पावसाळा सुरू झाला की मशागतीची कामे सुरू होतात. कुठे पेरणी सुरू होते तर कुठे पेरणीसाठी मशागत सुरू असते. शेतीचे सर्व गणित पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्या नक्षत्राला कसा पाऊस पडेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. त्यानुसार शेकडो वर्षापासून पावसाच्या नक्षत्रावरील म्हणी आजही प्रचलित आहेत. त्यातील काही तर खूपमजेशीरअसतात. (Rain and proverbs)
- सतीशघाटगे
ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात मौखिक परंपरेतून लोकगीते, लोकसंगीत, म्हणी आणि वाक्प्रचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत प्रसवत राहतो. मराठीतील तर म्हणी मजेशीर असतात. त्यामध्ये कोकण, मराठावाडा, घाटावरच्या, विदर्भातील म्हणीही वेगवेगळ्या असतात. त्याठिकाणच्या बोली भाषेचा म्हणीवर प्रभाव असतो. अशा आहेत या मजेशीर म्हणी.(Rain and proverbs)
शरद ऋतुमध्ये मेघ केवळ गर्जना करतात पण थेंबभर पाऊस पडत नाही, तर वर्षाऋतूमध्ये आवाज न करणारे मेघ, म्हणजे मुके ढग जोरदार वर्षाव करून जातात. त्यामुळेच मराठी भाषेत म्हण आली ‘गर्जेल तो पडेल काय?’ अशा काही म्हणी आणि त्यांचा अर्थ.
- ‘सत्ताविसातून नऊ जाती तर बाकी धूळ देती।’
नक्षत्रांची संख्या एकूण २७ आहे. पण त्यातील केवळ नऊ नक्षत्रेच पावसाचा अनुभव देतात. ती वाया गेली तर शेतकऱ्याच्या वाट्याला शेतीतील मातीची धूळ राहते. (म्हणजे पिकाऐवजी दुष्काळ)
- ‘मृगाची लावणी आणि हस्ताची उगवणी।’
मृगनक्षत्रावर पेरणी करावी. साधारणपणे जून महिन्यात ते येते. तर पीक कसे आले याची पाहणी हस्त नक्षत्रावर म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात करावी.(Rain and proverbs)
- ‘आल्या, आल्या मघा आणि चुलीपाशी हगा (शौचाला बसा) नाही तर वरती बघा।’
मघा नक्षत्रात खूप पाऊस पाडते. अगदी नैसर्गिक विधीसाठीही बाहेर पडता येत नाही. तर हेच मघा नक्षत्र बरसले नाही तर आशाळभूत नजरेने ढगाकडे बघत बसावे लागते.
- ‘मृगाचे आधी पेरावे आणि बोंबेचे आधी पळावे।’
नेहमी पेरणी मृग नक्षत्राच्याआधी करावी. संकटात बोंब मारण्यापूर्वीच पळून जावे.
- ‘पडेल हत्ती तर पाडेल भिंती
हस्त नक्षत्राचा धोऽधो पाऊस अगदी पार घराच्या भिंती पाडून टाकील.
- ‘रोहिणी डागे, मृग गाजे, आर्द्रा वाहे पूर। सहदेव कहे भाडळी घरघर वाजे।’
रोहिणी नक्षत्रात उकाडा झाला, मृग नक्षत्रात गडगडाट झाला आणि आर्द्रा नक्षत्रात पूर आला तर सहदेव आपल्या भाडळी ग्रंथाला म्हणतो जर या क्रमाने नक्षत्रे फळे देतील तर घराघरात हाताला काम मिळेल, यश मिळेल.(Rain and proverbs)
- ‘पडेल हस्त तर कुळंबी मस्त’
हस्त नक्षत्राचा पाऊस रब्बी पिकाला उत्तम असतो, पोषक असतो. त्यामुळे हस्ताचा पाऊस झाला की, शेतकऱ्याचे जीवन आनंदी होईल.
- ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती, पण कापूस न मिळे वाती।’
असे म्हणतात स्वाती नक्षत्राच्या पावसामुळे शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. पण हाच स्वातीचा पाऊस कापसाचे पीक धुवून नेतो. अगदी देवापुढे समई लावायला वातीपुरताही कापूस मिळत नाही.
- ‘पडतील उत्तरा तर अन्न न खाई कुतरा’
उत्तरा नक्षत्राचा पाऊस चांगला झाला तर भाताच्या पिकाचे वाटोळे होते. म्हणजे पाळलेल्या कुत्र्याला घास भरविण्याइतका भातही घरात नसेल.
- ‘लागत नसे मघा तर आकाशाकडे बघा’
मघा नक्षत्र शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे, ते जर बरसले नाही तर आकाशाकडे डोळे लावून बघत बसा (आतुरतेने)
- ‘न पडतील चित्रा तर भात ना मिळे पितरा’
चित्रा नक्षत्राचा पाऊस (सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये) न झाल्यास पितरांच्या (भाद्रपदातील) श्राद्धाला पिंडासाठी भात कसा मिळणार?
- ‘चित्राच्या तापाने हरणांच्या पाठी काळ्या’
चित्रा नक्षत्र पावसाळ्याच्या शेवटी येते. पण येताना प्रचंड उष्णता घेऊन येते. त्यामुळे जंगलातील हरिणांची कोवळी कातडी काळी पडते
- ‘आर्द्रा आणि पाडी गरदाडा’
सत्तावीसातले पावसाळी सहावे नक्षत्र आर्द्रा. ते जोरदार पडले तर घरांच्या भिंतीना भगदाडे पाडून हाहाकार माजवते.
- ‘उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, अन हिवाळा भोगी’
उन्हाळ्यात आपण कमी कपडे वापरून उघडेच राहातो. (संन्यस्त वृत्तीने) पावसाळ्यात थंडी-ताप- खोकला-सर्दीने रोगी बनतो. तर हिवाळ्यात छान-छान खातो, पितो आणि भोगतोही. (Rain and proverbs)
- ‘धारण-मरण आणि पाऊस कोणाच्या हाती नाही’
बाजारभाव (चढउतार) केव्हाही येणारा मृत्यू आणि पाऊस हे कोणाच्याच हाती नसते एवढे मात्र खरे.
- ‘ वळवणी आले आणि तळवणी घेऊन गेले
वळवाचा पाऊस आला आणि तळ्यातले शिल्लक पाणीही घेऊन गेला.
- ‘पाऊस पडेल तर पाणी साचेल’
हिचा एक अर्थ पाण्याचा साठा करण्यासाठी पावसाची गरज असा आहे, तर दुसरा अर्थ मिळकत केली तर शिल्लक साठेल.
- ‘माहो आणि हिवाचा लाहो’
माघ महिन्याची थंडी ही अधिक कडाक्याची असते
- ‘पुस (पौष) आणि घरोघरी हुस्स’
पौष महिना लागला की, थंडीमुळे हुश्य करावे लागते.
- ‘पाऊस पडे आणि माती तुडे’
पाऊस पडला तर मातीचा चिखल होतो आणि तुडवला जातो.
- ‘थंडी गेली बंडी केली’
थंडीमध्ये जाड कपडे वापरतो. ती गेली की, उन्हाळ्याचे बंडीसारखे (मलमलचे बिना कॉलर, अर्ध्या बाह्याचे कपडे) कपडे वापरतो.
- ‘चैत्र गळे, कुणबी पळे’
चैत्रात सहसा पाऊस येत नाही. त्यावेळी मशागती उघड्यावर चालतात पण त्याचवेळी पाऊस कोसळला तर शेतकऱ्याला धावाधाव करावी लागते.
- ‘धोंडा आणि पिकाचा लोंढा’
धोंडा महिना म्हणजे अधिक महिना त्यामुळे शेतात पिकाला उत येतो.
- ‘दुष्काळात तेरावा महिना’
अधिक महिना वर्षात तेरावा महिना असतो. तो जर दुष्काळात आला तर सर्वांसमोरच संकट उभे राहते. (Rain and proverbs)
- सुना आल्या सळा-सळा, सासुबाई पळा
मघा आणि पूर्वा नक्षत्राचे नाते सून-सासूचे मानले जाते. त्यामुळे जर मघा (सुना) सळासळा आल्या तर पूर्व (सासू) पळापळा
- ‘म्हाताऱ्याने टेकली काठी, नाही तर साडेसाती
पुष्य नक्षत्र (म्हातारा) थांबले म्हणून साडेसातीचे संकट टळले.
- ‘गरजतो तो बरसतो का ?’
हस्त नक्षत्र केवळ गडगडाट करून गेले तर थेंबभर पाणी पडणार नाही.
लोकभाषेत नक्षत्रांना वेगळी नावे आहेत.
१) मृग : खरीप, मिरग, २) पुनर्वसु : तरणा, ३) पुष्य : म्हातारा, ४) आश्लेषा : आसळका, ५) मघा : सासूबाई, ६) पूर्वा : सूनबाई, ७) उत्तरा : रब्बी पाऊस ८) हस्त : हत्तीचा पाऊस