मुंबई : लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या कन्या कॉ. शांताबाई साठे-दोडके (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर कांदिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या मागे लहान बहीण शकुंतला आहे. (Shantabai sathe death)
कॉ. शांताबाई या त्यांची आई कॉ. जयवंताबाईं सोबत बालवयातच कम्युनिस्ट पक्षाच्या बाल संघाचे व तत्कालीन लाल बावटा कला पथकाचे कार्य करायच्या. त्यावेळी त्यांच्या सोबत कम्युनिस्ट नेते, कॉ डांगे यांची मुलगी रोझा, कॉ. आर. बी. मोरे यांची मुले सत्येंद्र, कमल, तसेच नंतर मुंबईचे तत्कालीन महापौर कॉ. मिरजकरांचा मुलगा प्रभाकर, प्रभाकर संझगिरी यांच्या पत्नी सुमन मोकाशी आदी सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असत.
नंतर त्या कम्युनिस्ट पक्षाचेही सक्रिय काम करीत होत्या. १९४९ साली कम्युनिस्ट पक्षावरील दडपशाहीच्या काळात काही महिने त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.(Shantabai sathe death)
कौटुंबिक बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी औषधी कंपनीत नोकरी करावी लागली. त्या आईसोबतच कुटुंबाची जबाबदारी सांभाळून कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनेचेही कार्य करायच्या. त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातील काही हिस्सा त्या दर महिन्याला वाटेगावातील कॉ अण्णा भाऊंच्या पहिल्या पत्नीला पाठवायच्या. त्यांचे अण्णा भाऊंची पहिली पत्नी कोंडाबाई व मुलगा मधुकर यांच्याशी प्रेमळ संबंध होते.(Shantabai sathe death)
कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या पहिल्या कथा, कादंबरी, लोकनाट्याच्या त्या व बहीण शकुंतला या पहिल्या वाचक होत्या. लाल बावटा कला पथकाचे प्रमुख शाहीर कॉ अमर शेख व शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या कलापथकात त्या कामही करीत असत. लोकशाहीर अमर शेख यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना गोरेगावच्या औद्योगिक वसाहतीत भाड्याने घर मिळाले होते.
सत्तरच्या दशकात त्यांनी कॉ. दत्ता गव्हाणकरांच्या ‘‘काई चालं न गा’’ या शाहीर नामदेव कापडे यांनी बसविलेल्या लोकनाट्यात भूमिकाही केली होती. तसेच आम्ही ‘‘लोकमंच’’ या संस्थेतर्फे ‘‘अकलेची गोष्ट’’ हे शेतकऱ्यांचा प्रश्नांवरील गाजलेले लोकनाट्य १९८६ साली रंगभूमीवर सादर केले होते. त्यामध्येही त्यांनी भूमिकाही केली होती. त्यांना उतारवयात कलावंतांना मिळणारी शासकिय पेन्शन मिळविण्यासाठी खूप त्रास सहन करावा. परंतु त्यांनी आपला स्वाभिमान व कष्टकरी चळवळीशी असलेली बांधिलकी शेवटपर्यंत जपली.
हेही वाचा :
अजित पवार आभाळातून पैसे आणतील का?
मी शहांचा राजीनामा मागितला असता