कोल्हापूर; प्रतिनिधी : मुख्यमंत्री तीर्थ योजनेची सुरुवात काल (दि,२८) दक्षिण काशी असलेल्या करवीरनगरीतून मंगलमय वातावरणात झाली. जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांचा जथ्था विशेष रेल्वेने अयोध्येला (Ayodhya special train) रवाना झाला. राजर्षी शाहू रेल्वे स्थानकावर यावेळी भाविकांनी रामनामाचा जयघोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृश्यप्रणालीद्वारे या उपक्रमांचा शुभारंभ केला तर कोल्हापूर रेल्वेस्थानकावर वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफांनी अयोध्येच्या विशेष रेल्वेला झेंडा दाखवला. यावेळी खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्हिडिओ संदेशातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तीर्थ दर्शन योजनेचा शुभारंभ दक्षिण काशी, आई अंबाबाईच्या करवीर येथून होतो आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली आहे. (Ayodhya special train)
शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ कोल्हापुरातून होतोय याचा आनंद झाल्याचे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जातेय हे माझे भाग्यच आहे. यात्रेकरूंना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता आपले अधिकारी घेत आहेत. पहिली रेल्वे अयोध्येला जाताना व त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना फार मोठं समाधान होत आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी, विभागीस उप आयुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त दिपक घाटे, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, संशोधन अधिकारी संभाजी पवार उपस्थित होते.
हेही वाचा :